आपत्कालीन स्थितीत आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम हा सर्वसामान्यांसाठी एक मोठा आधार मानला जात आहे. वैद्यकीय उपचाराचे वाढते खर्च आणि अस्थिर परिस्थितीमुळे अशा प्रकारचे विमा कवच असणे काळाची गरज बनली आहे. याचे भान राखून कार्पोरेट कंपन्या किंवा वैयक्तिक पातळीवर कुटुंबाचा, कर्मचार्याचा आरोग्य विमा उतरवला जातो. परिणामी आरोग्य विम्याच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु आरोग्य विमा उतरवले की काम झाले, असे समजणे चुकीचे आहे. आरोग्य विम्यातील खर्चाची मर्यादा, मिळणारे फायदे याची माहिती घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे आपला आरोग्य विमा कोणत्या रुग्णालयास लागू आहे, हेही पाहणे गरजेचे आहे. ऐनवेळी उडणार्या गोंधळाला ही एक गोष्ट कारणीभूत ठरू शकते. आरोग्य विमा समजून घेणे किंवा त्यातील बारकावे माहिती करून घेणे प्रत्येक विमाधारकाचे कर्तव्य आहे. यासाठी एजंट किंवा विमा कंपनीची मदत घ्यायला हवी. विमा हप्ता वेळेवर भरला नाही तर त्या पॉलिसीचे फायदे मिळण्यास अडचणी येतात आणि ठराविक वर्षानंतर मेडिक्लेमचे फायदे विमाधारकाला मिळतात. जर विमाधारकाने कंपनीच्या नियमाप्रमाणे क्लेम किंवा दावा केला नाही तर दवाखान्याचा खर्च मिळण्यास अडचणी येतात त्यासाठी काही गोष्टी पाहणे गरजेचे आहे.
आपत्कालीन किंवा नियोजन : दवाखान्यात आपण दोनच वेळी जातो. एकदा आपत्कालीन स्थितीत किंवा दुसर्यांदा नियोजन, अपॉइंटमेंट घेऊन जातो. अपघात किंवा हदयविकारसारखी दुदैवी घटना घडली तर आपण आपत्कालीन स्थितीत दवाखान्यात भरती होतो. याशिवाय दुसर्या स्थितीत नियोजित ऑपरेशन, बाळंतपण यांसारख्या गोष्टीसाठी आपण वैद्यकीय उपचारासाठी भरती असतो. या दोन्ही स्थितीची कल्पना आणि कंपनीला देऊ शकतो.
आगावू सूचना देणे : रुग्णालयात भरती होण्यापूर्वी आपण विमा कंपनीला आगावू सूचना देऊ शकतो. नियोजित वैद्यकीय उपचाराचा लाभ घेण्यासाठी आपण न विसरता कंपनीच्या संकेतस्थळावर किंवा फोन करून सूचना देऊ शकतो. आपत्कालीन स्थितीत अशा प्रकारची सूचना देण्याची गरज नसते. केवळ चोवीस तासानंतर कंपनीला याबाबत माहिती दिल्यास कंपनी पॉलिसीच्या नियमानुसार विमाधारकास सुविधा देणे बांधील असते. काही कंपन्या कॅशलेस सुविधा देतात तर काही कंपन्या उपचारासाठी केलेल्या खर्चाची कागदपत्रे जमा केल्यानंतर काही दिवसानंतर उपचाराचा खर्च देतात. कंपनीला वैद्यकीय उपचारांची आगावू माहिती देणे कधीही श्रेयस्कर ठरू शकते. कंपनीला आणखी काही कागदपत्रांची गरज असेल तर आपण त्या कालावधीत ती जमा करून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. आरोग्य विमा उतरवल्यानंतर काही आजारांवर काही टक्क्यांपर्यंत खर्च कंपनी देते आणि कालांतराने तीन-चार वर्षांनंतर शंभर टक्के खर्च प्रदान करते. याबाबत पॉलिसी उतरवताना कंपनीकडून संपूर्ण माहिती घेणे विमाधारकाला महत्त्वाचे ठरते. एजंटामार्फत विमा उतरवला असेल तर त्याला फोन करून वैद्यकीय स्थितीची माहिती द्यावी तसेच कोणत्या हॉस्पिटलला कॅशलेस मेडिक्लेम लागू आहे, हेही अवगत करून घ्यावे.