‘जीवन ज्योती’ आणि ‘सुरक्षा विमा योजना’

सत्यजित दुर्वेकर

2015 मध्ये केंद्र सरकारने जन धन सुरक्षा योजनेंतर्गत माफक हप्त्यात पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय नावाने दोन योजना सुरू केल्या. यापैकी पीएमजेजेबीवाय ही कोरोनाच्या काळात पीडित कुटुंबाला मदत करू शकते. 

आपण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप किंवा अन्य सोशल मीडियवर सक्रिय असाल, तर आपल्याला पंतप्रधान योजना – 'पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना' आणि 'पंतप्रधान सुरक्षा विमा योजना' या देशातील दोन लोकप्रिय विमा योजनांबाबतचे संदेश आले असतील. या संदेशानुसार एखाद्याच्या मृत्यूस कोव्हिड आजार कारणीभूत असेल तर वारसदारांना दोन्ही योजनांवर भरपाईसाठी दावा करता येतो. एवढेच नाही, तर चार लाख रुपयांच्या दाव्यासाठी एका आर्थिक वर्षात 12 रुपये किंवा 330 रुपये  हप्‍ता भरल्याचा पुरावा विमा कंपनीला दाखवावा लागेल. यासाठी वारसदार किंवा नातेवाईक हे पॉलिसीधारकाच्या खात्याचे पासबुक विवरण तपासू शकतात आणि ते भरपाईसाठी दावा करू शकतात.  

2015 रोजी सरकारने बचत खाते असणार्‍या देशातील प्रत्येक नागरिकांसाठी परवडणार्‍या हप्त्यात सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी जन धन सुरक्षा योजनेंतर्गत दोन योजना सुरू केल्या. यापैकी एक असलेल्या पीएमजेजेबीवायने कोव्हिडसंबंधी मृत्यूला पात्र धरले असून त्यानुसार दावा करता येणे शक्य आहे. त्याचवेळी पीएमएसबीवाय योजना वेगळी आहे. ती 18 ते 70  वयोगटातील लोकांचा आकस्मिक मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाखांचे विमा कवच प्रदान करणारी आहे. कोरोनामुळे झालेला मृत्यू हा आकस्मिक मृत्यू म्हणून समजला जात नाही. त्यामुळे 'पीएमएसबीआय'नुसार त्यावर दावा करता येत नाही. एवढेच नाही, तर कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात जर बँक खातेदाराने पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवायचा लाभ घेतला असेल तर त्याच्या वारसदारास कमाल दोन लाख रुपयांचा दावा करता येतो. मात्र पीएमजेजेबीवाय ही 18 ते 50 वयोगटातील लोकांसाठी आहे.

यानुसार विमा पॉलिसीत सामील होण्यास आणि ऑटो डेबिट करण्यासाठी परवानगी देणार्‍या नागरिकांना पीएमजेजीबीवाय पॉलिसी घेता येते. याशिवाय व्यक्‍तिगत विमा पॉलिसीच्या कागदपत्रांप्रमाणे या पॉलिसीची कोणतीही कागदपत्रे नसतात. त्यामुळे अनेक खातेदारांना या पॉलिसीची माहितीदेखील ठाऊक नसते. त्याचबरोबर पॉलिसी विवरण अनुसार या दोन लाख रुपयांचे जीवन कवच एका वर्षाच्या कालावधीत (1 जून ते 31 मे) साठी वैध आहे आणि नंतर त्या पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते. या योजनेनुसार विमाधारकाच्या मृत्यूच्या प्रकरणात दोन लाख रुपयांची जोखीम कव्हर करते आणि त्याचा वार्षिक हप्‍ता हा 330 रुपये आहे. ही पॉलिसी खातेधारकास वयाच्या 55 वर्षापर्यंत उपलब्ध आहे. त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्‍तीला ही पॉलिसी दिली जात नाही.  याचाच अर्थ असा की, एखाद्या खातेधारकांचे वय 55 असेल आणि तो दुर्दैवाने कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडला असेल, तर या पॉलिसीचा लाभ मिळणार नाही आणि ते दावादेखील करू शकणार नाहीत.

सरकारने सामाजिक विमा आणि पेन्शन योजनांची माहिती https://jansurksha.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. जर एखादी व्यक्‍ती पॉलिसी योग्य असेल तर बँक खात्यात उल्लेख असलेल्या नॉमिनीला संबंधित बँक शाखेत दावा करण्याची गरज असते. अशा ठिकाणी खातेधारकाच्या मृत्यूनंतर 30 दिवसांच्या आत खाते सक्रिय असते. ज्या लोकांनी आपल्या नातेवाईकांना कोव्हिडमुळे गमावले आहे, त्यांना या योजनेतंर्गत दावा करण्यावर विम्याचा लाभ मिळतो का? असा प्रश्‍न आहे. 

पीएमजेजेबीवायचे संचलन भारतीय जीवन विमा मंडळाकडे केले जाते. त्यामुळे दाव्याबाबत कोणतीही शंका राहण्याचे कारण नाही. मात्र दावा करताना आवश्यक असणारे कागदपत्रे विशेषत: खातेधारकाचा वारसदार हा बँक खात्यावर उल्लेख केलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अडचणी येऊ शकतात. शेवटी नॉमिनी आणि कुटुंबाच्या सदस्यांनी पॉलिसीचा दावा करण्याऐवजी खातेदाराचा मृत्यू झाल्याने संबंधिताचे खाते बंद करण्याची सूचना बँकेला दिल्यास वारसदाराला आपोआपच भरपाई मिळू शकते. ही मदत संकटकाळात उपयुक्‍त ठरते. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news