-डॉ. दीपककुमार पुजार, मुख्य कार्डिओलॉजिस्ट, वेणूग्राम हॉस्पिटल
सध्या माणसाचे जीवन धावपळीचे बनले आहे. बदलत्या काळानुसार प्रत्येकाचे राहणीमान, खानपान बदलत असून ताणतणावही वाढत आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. अलिकडील काळात तरूणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जीवनशैली बदलण्याबरोबर वेळीच लक्षणे लक्षणे ओळखून खबरदारी घेतली तर हृदयरोग टाळता येतो. गुरुवार दि. 29 रोजी जागतिक हृदयरोग दिन आहे. यानिमित्त…
अलिकडील काळात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. सर्वसाधारणपणे छातीत दुखणे, पाठदुखी, हातदुखी, श्वास घेण्यात अडचण असा त्रास सुरु झाल्यास तातडीने हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार बळावतो आणि जीवावर बेतू शकते. यासाठी प्राथमिक टप्प्यात थ्रेडमिल चाचणी ही महत्त्वाची असून ब्लॉकेज होण्याचा धोका किती आहे, हे या चाचणीतून समजून येते. ही एक महत्त्वाची स्क्रीनिंग चाचणी आहे. हृदयाला पुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचाझटका येतो.
ब्लॉकेज होण्यामागे मधुमेह, उच्चर क्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, ताणतणाव ही कारणे आहेत. ब्लॉकेजची तीव्रता 70 टक्क्यापेक्षा जास्त झाली की, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका तीव्र होत जातो. ब्लॉकेज झाले तरी हृदयाच्या स्नायूंच्या नुकसानीबरोबरच हृदयाची कार्यक्षमता कमी होत जाते, आणि हदयविकाराचा झटका येण्याची शक्यता तीव्र बनते. त्यामुळे आपल्या जीवनपध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. टीएमटी चाचणी करुन संभाव्य धोक्यांची माहिती घेता येऊ शकते. तसेच मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि वार्षिक हृदय तपासणी केल्यास धोका काय आहे, याची माहिती मिळू शकते.
टीएमटी चाचणी पॉझिटिव्ह असल्यास ब्लॉकेजची तीव्रता जाणून घेण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राम केला जातो. अडथळे किरकोळ असल्यास (60 टक्क्यापेक्षा कमी) औषधे पुरेशी आहेत. जर ब्लॉकेज मोठे (मोठ्या रक्तवाहिनीमध्ये 70 टक्क्यापेक्षा जास्त) असेल तर सध्यस्थिती आणि ब्लॉकेजची संख्या याचा विचार करुन अँजिओप्लास्टी किंवा सीएबीजी करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपण हृदयविकाराचा झटका टाळू शकतो.याउलट, हृदयविकाराचा मोठा झटका आलेल्या रुग्णांवर अँजिओग्राम, अँजिओप्लास्टी केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो.