'योग निद्रा'मुळे मेंदूत काेणते बदल हाेतात? जाणून घ्‍या नवे संशोधन

काही मिनिटांमध्‍ये मिळते अनेक तासांची शारीरिक-मानसिक विश्रांती
Yoga Nidra
प्रातिनिधिक छायाचित्रFile photo
Published on
Updated on

पुढार ऑनलाईन डेस्‍क : योग निद्रा हा एक प्राचीन ध्यान प्रकार आहे. जागृत अवस्‍थेत शरीराला जाणीवपूर्वक दिलेली विश्रांती प्रकाराला जागे असतानाचे झोपणे, असेही म्हणतात. काही मिनिटांमध्‍ये अनेक तासांची विश्रांती देणार्‍या योग निद्राचे शारीरिक आणि मानसिक आरोग्‍यासाठीचे फायदे यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले आहेत. आता भारतीय संशोधकांनी प्रथमच योग निद्राचा सराव करणाऱ्यांच्‍या मेंदूचे MRI केले. यावेळी शरीरातील रक्ताभिसरणात हाेणार्‍या बदलाचे निरीक्षण केले. दिल्लीच्या आयआयटी आणि 'एम्स'च्या संशाेधनात याेग निद्रा करत असताना मेंदूत नेमके काेणते बदल हाेतात हे स्‍पष्‍ट झाले आहे. जाणून घेवूया या नव्‍या संशाेधनाविषयी...

असे झाले संशोधन

आयआयटी दिल्‍लीच्‍या संशोधकांच्‍या टीमने ६० जणांवर एक प्रयोग केला. यामध्‍ये ३० जण नियमित योग निद्रा ध्‍यान प्रकाराचा सराव करणारे होते. तर ३१ जण प्रथमच योग निद्रा करत हाेते. ६० जणांच्‍या मेंदूचे फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (fMRI) करण्‍यात आले. सहभागींच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्कचे (व्‍यक्‍ती शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'असे नाव दिले आहे) निरीक्षण केले.

जागृत अवस्‍थेत मिळते पूर्ण विश्रांती 

इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, आयआयटी दिल्ली, एम्स दिल्ली आणि महाजन इमेजिंगच्या संशोधकांना असे आढळून आले की, ध्यान करणाऱ्यांमध्ये योग निद्रा दरम्यान एक मज्जासंस्था सक्रिय होते, ज्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारची शांतता मिळते. योग निद्रा तंत्रामुळे मन शांत होते. योग निद्रा करणाऱ्या लोकांचा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो. जेव्हा आपण सामान्यपणे कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करतो किंवा करत नाही तेव्हा आपल्या मेंदूचा एक भाग खूप सक्रिय असतो. मात्र योग निद्रा करणाऱ्यांमध्ये हा भाग कमी सक्रिय असल्‍याचे आढळले. यामुळे त्यांना भरपूर शारीरिक व मानसिक विश्रांती मिळते; पण त्याचबरोबर ते पूर्णपणे जागृत राहतात.

योग निद्रा' करताना मेंदूत काेणते बदल हाेतात?

संशोधकांना नव्याने योग निद्रा करणार्‍यांच्‍या अवस्थेच्या तुलनेत अनुभवी ध्यानकर्त्यांच्या डीफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये कमी कनेक्टिव्हिटी आढळली. डीफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे सामान्यत: भूतकाळ किंवा भविष्याबद्दल विचार करणे, आत्मचरित्रात्मक प्रक्रिया, इतरांबद्दल विचार करणे, मनात कल्‍पना करणे या संबंधित आहे, असे स्पष्ट करत संशोधक सोनिका ठकराल यांनी 'पीटीआय'ला सांगितले की, "योग निद्रा करत असताना डिफॉल्ट मोड नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये झालेली घट ही मनाची भटकंती, भूतकाळ किंवा भविष्याबद्दल विचार करणे आणि सध्याच्या क्षणी अधिक असण्याशी संबंधित प्रक्रिया कमी करते. आमचे निष्कर्ष योग निद्राच्या सर्व टप्प्यांवरील नवशिक्यांच्या तुलनेत नियमित योग निद्रा करणार्‍यांच्‍या डीफॉल्ट मोड नेटवर्क फंक्शनल कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय घट दर्शवितात," असेही संशाेधकांनी म्‍हटलं आहे.

याेगासनानंतर शरीराचे तापमान पूर्ववत हाेण्‍यास मदत

'एमआरआय' स्कॅनमध्ये असे दिसून आले की, जेव्हा ध्यानकर्ते योग निद्रा निर्देशांचे पालन करतात, तेव्हा अपेक्षेप्रमाणे भाषा प्रक्रिया आणि हालचालींशी संबंधित मेंदूचे क्षेत्र सक्रिय हाेतात. तसेच या संशाेधनातील एक उल्लेखनीय शोध म्हणजे, मेंदूतील भावना प्रक्रियेचे सक्रियकरण आणि झोपेच्या नियमनात महत्त्‍वाची भूमिका बजावणार्‍या मेंदूच्या थॅलेमस भागात एक विशेष प्रकारची मज्जासंस्था सक्रिय बजावते. योग निद्रेमध्ये आपण जागृतपणे आपले लक्ष शरीराच्या विविध अवयवांकडे नेतो. यामुळे त्या अवयवात असलेल्या नसांना चालना मिळते. तसेच याचा आणखी एक फायदा असा होतो की, योगासने केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. अचानक उष्णता खाली जाणे हे शरीरासाठी हितकारक नाही. त्‍यामुळे योगासने केल्यानंतर केलेल्‍या याेग निद्रा शरीराचे तापमान पूर्ववत करते. योगासनांच्या परिणामांना शोषून घेण्यासाठी चेतासंस्थेला कार्यांवित करते.

योग निद्रा कशी करावी...?

सर्वप्रथम शवासनात पाठीवर सरळ झोपा. संपूर्ण शरीर शिथिल करा. दीर्घ श्‍वसन करा. आसन जास्त आरामदायी होण्यासाठी पायाखाली उशी घेऊन जरा पायांना थोडे वर ठेवा. यानंतर हळुवारपणे आपले लक्ष संपूर्ण शरीरावर करा. एक खोल श्वास घ्या आणि शरीरातील संवेदनांबाबत जागृत करा. यानंतर शरीरातील प्रत्‍येक अवयवांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्‍या. या अवस्थेत काही मिनिटे आराम करा. आता आपले शरीर आणि आसपासचा परिसर याबाबत जागृत व्हा, आपल्या उजव्या कुशीवर वळा आणि काही मिनिटे तसेच पडून रहा. यानंतर हळुवारपणे आणि सावकाश डोळे उघडा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news