वारंवार होणारे ‘जंत’अर्थात कृमी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

काही रुग्णांमध्ये विशेषत: लहान मुलांमध्ये अनेक विकारांचे त्रासांचे कारण "जंत झाले आहेत" असे सांगितले जाते. "जंताचे औषध" अथवा "कोर्स" केला असता, तक्रारी कमी होतात. काही जणांमध्ये मात्र पूर्ण आराम मिळत नाही अथवा पुन्हा जंताचा त्रास होत असतो. या "कृमी" ची कारणे, कृमींचे प्रकार, कृमींमुळे कोणता त्रास होऊ शकतो? आणि याच्याच बरोबर कृमींवर आयुर्वेदीय उपचार याची ही माहिती.

कृमींचे प्रकार :- सर्वसाधारणपणे "जंत" असे व्यावहारिक सर्वच कृमींना एकच नाव संबोधले जात असले तरी त्यांचेही विविध प्रकार असतात.

बाह्य कृमी – शरीर व वस्त्रांची योग्य स्वच्छता न घेणे, अंघोळ न करणे, अशुद्ध, अस्वच्छ पाण्याने अंघोळ करणे, घामट कपडे न धुता रोज वापरणे या कारणांमुळे उवा व लिखा उत्पन्‍न होतात. त्यांचा आकार बारीक काळ्या पांढर्‍या तिळाप्रमाणे असतो. डोक्यांचे केस, शरीरावरील केस, आणि कपडे यांना चिकटून राहात असतात. उवा लिखांमुळे डोक्यात, जांघेत खाजणे, पुरळ किंवा बारीक फोड येणे, दाह, आग होणे, त्वचेवरील खवडे पडणे, त्वचेवरील खवडे पडणे, केस गळणे या तक्रारी उत्पन्‍न होतात.

अभ्यंतर कृमी-शरीराच्या आतील कृमी-

शरीरामध्ये, आतड्यामध्ये, पचनसंस्थेमध्ये, रक्‍तामध्ये, रक्‍तांच्या शिरांमध्ये, मलामध्ये उत्पन्‍न होणार्‍या कृमींना अभ्यंतर कृमी म्हणतात.

जंत अथवा कृमी उत्पन्‍न होण्याची करणे-

कृमींवरील उपचार करताना ते लवकर बरे होण्यासाठी तसेच पुन्हा कृमी होऊ नयेत म्हणून ही कृमींची कारणे "टाळणे" ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही काणे प्रत्येकाने लक्षात ठेवावीत. आयुर्वेदाच्या मते- पचन ठीक नसतानाही जेवण करणे, आहारात आंबट, गोड, खारट पदार्थ जास्त वारंवार खाणे, म्हणजेच लहान मुलांत चॉकलेट, गोळ्या, कॅटबरी, बिस्किटे, आईस्क्रीम इत्यादींचा अतिरेक किंवा काही लहान मुले गोड पदार्थाशिवाय इतर काहीही खात नाहीत यामुळे, शिळे, उघड्यावरील, बिघडलेले पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, न पचणार्‍या पदार्थांचे वारंवार सेवन करणे, पालेभाज्या पूर्ण स्वच्छ न धुता खाणे, फ्रूट सॅलेड वारंवार खाणे, अशुद्ध  मटण, चिकन, धाब्यावरील शिळे पदार्थ, गुळ, दही, दुध एकत्र खाणे, माती ही कृमी    उत्पन्‍न होण्याची मुख्य कारणे असतात. पचनशक्‍ती कमी असताना म्हणजेच "अग्‍निमांघ" झाले असताना ही

 कारणे घडल्यास कृमीची उत्पत्ती अधिक होते.

कफज कृमी – यांच्या आकारात विविधता असते. पांढर्‍या रंगाचे,स्नायूप्रमाणे चपटे, गोल, गांडुळाप्रमाणे लांब, बारीक ठिपक्याप्रमाणे, धाग्यांप्रमाणे, दिसणारे लहान अथवा मोठे लांबडे अशा विविध प्रकारात असतात. पचन संस्थेच्या पहिल्या (वरच्या) भागात असतात. अति वाढल्यास तोंडाकडे अथवा खालच्या बाजूला पसरतात, मळमळणे, तोंडाला पाणी सुटणे, पचन न होणे, चव कमी होणे, उलटी होणे, बारीक ताप, पोट फुगणे, काही वेळा शिंका सर्दी या तक्रारी होत असतात. लहान मुलांत पोट मोठे दिसणे, पातळ भसरट संडास होणे, कधी कधी उलटी, अंग खाजणे, चेहर्‍यावर पांढरे डाग, संडासची जागा खाजणे, खाणे नको वाटणे, तर काही जणात सारखी खा खा होणे, तब्येत न सुधारणे या तक्रारी आढळतात.

रक्‍तज कृमी – आकाराने खूप बारीक, गोल अनेक सूक्ष्म स्वरूपी हे कृमी रक्‍तामध्ये उत्पन्‍न होत असतात. जखमेमध्ये यांचा संपर्क झाल्यास, वेदना, सुजणे, दाह, खाजणेे, पू उत्पन्‍न होणे, जखम चिघळणे, अशा तक्रारी आढळतात. चिघळलेल्या जखमांमध्ये हे कृमी कालांतराने त्वचा, मांस, स्नायू यांचाही नाश करू शकतात.

आतड्यातील/मलातील कृमी- शिळे, नासलेले, बिघडलेले, अन्‍न खाणे, माती खाणे, अशुद्ध पाणी, या मुख्य कारणांनी उत्पन्‍न होतात. आतड्यामध्ये राहत असतात, थोडे मोठे, लांब असतात. यांचा रंग काळा, पिवळा, सफेद, निळा असतो. काही अतिसूक्ष्म असतात.संडासला पातळ होणे किंवा अजिबात साफ न होणे, पोटात दुखत राहणे, भूक  कमी लागणे, बारीक अगं खाजणे, निरुत्साह त्वचा निस्तेज रूक्ष होणे, रक्‍ताची टक्केवारी कमी होणे, संडासच्या जागेची खाज या तक्रारी होतात. काही जणात वजन कमी होते. या कृमींकडे दुर्लक्ष केल्यास यातूनच अ‍ॅनिमिया, लिवर वाढणे, पोटात पाणी होणे, अंगावर सूज येणे, हृदयविकार हे आजार हे उपद्रव होऊ शकतात. कृमींवरील आयुर्वेदीय उपचार- शरीरातील कृमी काढून टाकणे म्हरजेच 'कृमीपातन'  कृमी मारून निर्जीव करणे आणि कृमींच्या कारणामधील गोष्टी टाळणे या तत्त्वाप्रमाणे आयुर्वेदीय उपचार केले जातात. कृमी पाडून टाकण्यासाठी कपिला, पलाशबीज, एरंड, निशोत्तर, कुटकी, कपिकच्छू यांचा उपयोग करावा लागतो. कृमीविनाश करण्यासाठी विडंग, पपईबीज, इंद्रवय,किराततिक्‍त भल्‍लातक यांचा वापर केला जातो, कज्जली, पर्पटी यांच्या संयोगाने केेलेली विविध संयुक्‍त औषधे चिकाटीने काही काळ घ्यावी लागतात. कृमींचे प्रमाण अधिकच असल्यास पंचकार्म उपचारदेखील काही वेळा गरजेप्रमाणे केले जातात.

आहाराची काळजी- शेवगा, कारले, पडवळ, लसूण, ओवा, नारळ, ताक, तूप, लोणी, मध, कवठ, दुधातून वेखंड, मिरी, हळद यांचा नियमित वापर करावा. मांसाहार शक्यतो टाळावा, नेहमी शुद्ध स्वच्छ पाणी प्यावे.

लक्षात घ्यावे- अनेक पालक आपल्या मुलांना ठराविक दिवसांनी आधुनिक "जंताचे" औषध देत असतात. काही प्रमाणात कृमी पडतात तर काहींना पुरेसा उपयोग होत नाही. अशा मुलांना आयुर्वेदीय पद्धतीने 2 ते 3 महिने शास्त्रीय उपचार केल्यास अतिशय चांगला उपयोग होतो. आधुनिक जंताचे औषधे देऊनही तक्रारी पूर्ण कमी होत नसल्यास शास्त्रीय आयुर्वेद उपचारांचा जरूर उपयोग करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news