World Heart day : हार्ट अटॅकच्या भीतीपोटी धावणे, जिम बंद केलंय? तुम्हाला 'कार्डिओफोबिया' तर नाही ना? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

हृदयविकाराच्या झटक्याची भीती असणारे शारीरिक बदलांना धोक्याची चिन्हे समजू शकतात
World Heart day
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on: 
Updated on: 
Summary

२९ सप्टेंबर रोजी 'जागतिक हृदय दिन' (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयविकाराशी संबंधित समस्यांचे वाढते प्रमाण तसेच 'कार्डिओफोबिया' यावर जाणून घेऊया हृदयविकारतज्ज्ञांचे मत...

World Heart day 2026 : तुम्ही दररोज लवकर उठून नियमित व्यायामाचा संकल्प करत असाल. यासाठी धावण्याचा किंवा जिममध्ये जाण्याचे प्लॅनिंग करत असतानाच मनात एक विचार येतो, "धावताना मला हृदयविकाराचा झटका आला तर?". हा विचार मनात येण्याचे कारण म्हणजे मागील काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याचे शेकडो व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असे व्हिडिओ पाहून मन व्यायामाबाबत भयग्रस्त होते. आपल्याबरोबरही असे काही घडेल का, अशी चिंता मनात घर करून राहते. अलीकडच्या काळात लोकांमध्ये ही भीती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वैद्यकीय भाषेत या भीतीला 'कार्डिओफोबिया' असे म्हणतात.

तज्ज्ञ काय सांगतात?

'कार्डिओफोबिया'बाबत वृत्तवाहिनी 'आज तक'शी बोलताना 'मेदान्ता - द मेडिसिटी हॉस्पिटल'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य हृदयविकारतज्ज्ञ (सर्जन) डॉ. नरेश त्रेहान म्हणाले की, व्यायाम करताना हृदयाचे ठोके वाढणे, श्वास वेगाने चालणे, घाम येणे आणि शरीरात उष्णता जाणवणे या सामान्य गोष्टी आहेत; परंतु ज्यांच्या मनात हृदयविकाराच्या झटक्याची भीती असते, ते लोक या सामान्य शारीरिक बदलांचा चुकीचा अर्थ लावून त्यांना धोक्याची चिन्हे समजू शकतात.

World Heart day
World Heart Day 2025 | दीर्घायुष्य हवे? मग हृदय निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा हे गोल्डन रुल्स!

फोबिया (Phobia) म्हणजे काय?

फोबिया म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा परिस्थितीबद्दल वाटणारी तीव्र आणि अनेकदा नियंत्रणाबाहेरची भीती; यात वाटणारी भीती ही त्या परिस्थितीतील वास्तविक धोक्याच्या तुलनेत खूपच जास्त असते.

कार्डिओफोबिया असेल तर काय होते?

तुम्हाला कार्डिओफोबिया असेल, तर मानसिक तणाव जाणवताच तुमचे लक्ष सतत हृदयाकडे केंद्रित होते. विशेष म्हणजे, वैद्यकीय चाचण्यांमध्ये काहीही दोष आढळत नाही तरीही तुम्हाला खरोखरच हृदयाचा काहीतरी आजार झाला आहे, तुम्हाला हृदयविकार जडला नाही ना किंवा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार नाही ना, असे भय वाटत राहते. व्यायामामुळे हृदयाचे ठोके वाढल्यास हृदयाला धोका निर्माण होईल अशी भीती वाटणे (जरी प्रत्यक्षात तसे काहीही नसते), या स्थितीला 'कार्डिओफोबिया' (हृदयाशी संबंधित भीती) असे म्हणतात.

World Heart day
World Heart Day 2023 : भारतीय तरुणांची हृदये होताहेत कमकुवत

कार्डिओफोबियावर उपचार कसे केले जातात?

इतर फोबियांप्रमाणेच कार्डिओफोबियावरही उपचार केले जातात. डॉक्टर यासाठी तुम्हाला मानसोपचार (सायकोथेरपी), औषधे किंवा या दोन्हीचा एकत्रित वापर करण्याचा सल्ला देऊ शकतात. सर्वात योग्य उपचारपद्धती ही तुमच्या लक्षणांची तीव्रता, तुमची जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला यांवर अवलंबून असते. काही रुग्ण मानसोपचार घेतात. यामुळे या भीतीशी संबंधित विचारपद्धती आणि वागणूक बदलण्यास मदत होऊ शकते. 'कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी' (CBT) हा उपचारांचा एक अत्यंत प्रचलित प्रकार आहे; कालांतराने, CBT (किंवा इतर उपचारपद्धती) तुम्हाला तुमच्या भीतीचा आणि चिंतेचा सामना करण्यास व त्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करू शकतात.

हृदय निरोगी ठेवण्‍यासाठी खालील टिप्‍स ठरतील फायदेशीर

डॉ. नरेश त्रेहान यांच्या मते, "हृदय निरोगी राखण्यासाठी तणाव कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; मानसिक तणाव जितका कमी असेल, तितके ते आरोग्यासाठी चांगले असते. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. मसालेदार पदार्थ टाळावेत याचा अर्थ असा नाही की खाऊ नयेत, मात्र त्याचे प्रमाण कमी ठेवा. तेलकट पदार्थ रोज खाणे टाळा. आठवड्यातून एकदा-दोनदा किंवा पंधरवड्यातून एकदाच तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करण्याची आणि योगासने करण्याचीही सवय ठेवणे हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news