

डॉ. प्राजक्ता पाटील
उष्णकटिबंधातील देश असूनही भारतीय नागरिकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्चाची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळते. विशेषतः नोकरी करणार्या महिलांमध्ये ती जास्त आढळते, असे पाहण्यांमधून दिसून आले आहे. यामुळे इनफर्टिलिटीचा (वंध्यत्वाचा) धोका लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे, पण अनेकांना याची कल्पनाच नसते.
ड जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य असल्यास स्त्रीबीज म्हणजेच एग फॉर्मेशनची प्रक्रिया उत्तम प्रकारे होते, तर पुरुषांमध्ये या जीवनसत्त्वामुळे शुक्राणूंची गुणवत्ता म्हणजेच स्पर्म क्वालिटी सुधारण्यास मदत होते. शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठीदेखील व्हिटॅमिन ‘डी’ आवश्यक असते. हे जीवनसत्त्व शरीरातील सूज कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.
तज्ज्ञांच्या मते, ज्या महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ची पातळी पुरेशी असते, त्यांच्यामध्ये गर्भधारणेची शक्यता इतर महिलांच्या तुलनेत चार पटीने जास्त असते. हे जीवनसत्त्व शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता निर्माण होते, तेव्हा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांसारख्या आवश्यक हार्मोन्सचे संतुलन बिघडून ओव्ह्युलेशनच्या म्हणजेच स्त्रीबीज तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यात अडचणी निर्माण होतात. लक्षात घ्या, आयव्हीएफसारख्या उपचारांच्या यशासाठीही शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ची पातळी योग्य असणे गरजेचे मानले जाते.
भारतात पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमच्या समस्येमुळे महिलांमधील इनफर्टिलिटीचे प्रमाण वाढले आहे. व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढून ही समस्या अधिक गंभीर बनते. पुरुषांमध्येही व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे टेस्टोस्टेरॉन या हार्मोनची पातळी खालावून शुक्राणूंची संख्या आणि त्यांची गतिशीलता कमी होते. हे टाळण्यासाठी दररोज दहा ते तीस मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे हा सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय आहे.
यासोबतच आहारात सॅल्मनसारखे मासे, अंड्याचा बलक, फोर्टिफाईड दूध किंवा फोर्टिफाईड अन्नपदार्थांचा समावेश करावा. आहारातून आणि उन्हातून ही कमतरता भरून निघत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी-3 च्या सप्लिमेंटस घेणे गरजेचे आहे. गर्भधारणेचा प्रयत्न करणार्या जोडप्यांनी आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ‘डी’ची पातळी तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे.