डॉ. भारत लुणावत
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हिवाळा आला आहे. मधल्या ऑक्टोबर हीटने पोबारा केला आणि थेट थंडी उगवली असली, तरी पावसाने अखेर निरोप घेतला हेच काय ते समाधान. हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम ऋतू असतो. या काळात थंडी असल्याने थोडे पौष्टिक, उष्ण पदार्थ खावेत, असे डॉक्टरही सांगतात; पण हिवाळ्यात एक समस्या बिकट होते, ती म्हणजे केस गळण्याची. केस गळती कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय.
हिवाळा तसा उत्तम ऋतू आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम, उष्ण पदार्थांचे सेवन आदी केले जाते; पण एक गोष्ट तितकीच काळजीची असते, ती म्हणजे गळणारे केस. तमाम स्त्रीवर्ग गळणार्या केसांकडे पाहून हळहळत असतात. केसगळती कशी रोखायची, हा एक मोठ्ठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यासाठी काही सहज उपलब्ध होणार्या गोष्टी वापरू शकतो, जसे आवळा, मेथीदाणे.
आवळा ः आवळ्याचे चूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आवळा आरोग्यासाठी चांगला आहेच; पण केसांसाठीही चांगला आहे. आवळा सेवन करण्याबरोबर आवळ्याचा गर लिंबाच्या रसासोबत मिसळून ते केसांना लावून ठेवावे आणि रात्रभर तसेच ठेवावे. केस एखाद्या कपड्याने झाकून ठेवावे आणि सकाळी केस धुवून टाकावे.
मेथी ः केसांची काळजी घेण्यासाठी मेथीदाण्याचा वापर करू शकतो. केसाला मेथी लावण्यासाठी मेथीदाणे रात्रभर भिजवून ठेवावे. त्यानंतर सकाळी ते उपसून, वाटून लेप तयार करावा. हा लेप केसांवर 40 मिनिटे लावून ठेवावा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून टाकावेत.
कोरफड ः केसांच्या उत्तम वाढीसाठी कोरफडीचे जेल किंवा रस लावावा. अर्धा तास ते केसांवर ठेवावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोरफड केसांना लावावी. त्यामुळे केस गळणे कमी होतेच; शिवाय केसांना चमकही येते.
कांद्याचा रस ः मेथीचा लेप लावण्याव्यतिरिक्त कांद्याचा रस केसाला लावून ठेवावा. अर्धा तास केसांवर ठेवून केस धुवून टाकावे. कांद्यामुळे केसांच्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करावा.
या घरगुती घटकांचा वापर करून हिवाळ्यातील केसगळती थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. शिवाय, केसांची काळजी घेऊ शकतो. हे सर्व घटक नैसर्गिक असल्याने या घटकांचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.