डॉ. आनंद ओक
दैनंदिन कामे करताना अनेकदा शरीरक्षमता कमी पडल्यावर माणसाला थकवा येतो. त्यामुळे कार्यक्षमता कमी करणार्या या थकव्याविषयी जाणून घेऊ…
विश्रांती न घेता सातत्याने काम, उन्हात आणि उष्णतेजवळ काम यामुळे जास्त घाम येणे, कोणत्याही कारणाने शरीरातून रक्तस्राव वारंवार होत राहिल्यास, शरीराला आवश्यक किमान पोषक आहारांचा अभाव, कोणत्याही कारणाने शरीरात वारंवार ताप येत राहिल्यास, वारंवार पचन बिघडून जुलाब होण्याची आमांश होण्याची सवय, रासायनिक औषधांच्या दुष्परिणामामुळे, काही अँटिबायोटिक्सचा वारंवार वापर, वार्धक्यामुळे शरीरातील धातूंची नैसर्गिक झीज होणे, विविध स्वरूपाच्या शस्त्रक्रिया, दीर्घकालीन आजाराच्या परिणामी, मधुमेहाच्या परिणामी अशी कारणे अनेकदा 'थकवा' असणार्या व्यक्तीत असू शकतात. विविध स्वरूपाचे मानसिक ताणतणाव, सतत विचार, अतिप्रमाणात बौद्धिक काम इ.मुळे मानसिक थकवा जाणवतो. रक्तातील साखर अचानक कमी झाल्याने देखील थकवा येतो.
काही वेळा थायरॉईडचा विकार, नैराश्य, स्त्रियामधील श्वेतपदर, पुरुषांमध्ये लघवीवाटे शुक्रस्राव या कारणाने देखील थकवा आल्याचे आढळते. शरीराचे वजन प्रमाणापेक्षा खूपच वाढलेले असल्यास देखील थकवा लवकर जाणवतो.
थकव्याने काय होते?
वार्धक्यामुळे, फुफ्फुसाच्या विकारांमुळे उदा. टीबी, दमा, फुफ्फुसाला थकवा आल्यास थोड्याशा चालण्याने दम लागणे, श्वासोच्छ्वास कमी वाटणे, इ. लक्षणे असतात. हृदयाच्या थकव्यामुळे छातीत दुखणे, धडधडणे, भरभर चालल्यावर, चढल्यावर दम लागणे या तक्रारी उद्भवतात. वार्धक्य, अतिप्रमाणात भोजन, पचनसंस्थेचे विकार यामुळे पचन संस्थेला थकवा येऊ शकतो. अशावेळी पोट जड राहणे, गॅसेस, पातळ संडास होणे किंवा बद्धकोष्ठता या तक्रारी जाणवतात.
अति हस्तमैथुन, अति शरीरसंबंध, स्वप्नदोष, इ. कारणांनी लैंगिक अवयवांना थकवा येतो, अशावेळी मग संभोगेच्छा कमी होणे आणि इच्छा झाली तरीही इंद्रियाला शिथिलता, शीघ्रपतन, कमजोरी या तक्रारी जाणवू लागतात. सतत उभे राहणे, जास्त चालणे, पळणे, अतिव्यायाम इ. कारणांनी कंबर, पायाला थकवा आल्यास कंबर, पाय दुखणे, पाय जड होणे, पायाचे गोळे दुखणे, पिंढर्या दुखणे, पाय दाबावेसे वाटणे, बसल्यावर किंवा झोपल्यावर विश्रांतीने बरे वाटणे ही लक्षणे आढळतात. हिपॅटायटीस, कावीळ, अतिमद्यपान यामुळे विकारानंतर लिव्हर या अवयवाला थकवा येतो, अशावेळी भूक कमी लागणे, खाल्ले तरीही चयापचय न झाल्याने प्रकृती न सुधारणे, अंगी न लागणे, वजन न वाढणे यासारख्या तक्रारी जाणवतात.
थकवा दूर करताना…
सर्वसाधारणपणे थकवा जाणवू लागल्यावर वेगवेगळी व्हिटॅमिन्स, टॉनिक्स, पोषक आहार जास्त घेणे यासारखे उपचार घेतले जातात. च्यवनप्राश सारखी टॉनिक्स जाहिरातीवरून घेतली जातात. काहीवेळा यामुळे थोडे बरेही वाटते, पण अनेकदा पुन्हा थकवा जाणवू लागतो तर काहींना कोणताच फायदा होत नाही. याचे कारण असे की, थकव्यावर उपचार करण्यापूर्वी थकवा नक्की कोणकोणत्या शरीरसंस्थेच्या अवयवाच्या अशक्ततेमुळे आला आहे याचा शोध घेणे आवश्यक असते. आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करताना संपूर्ण लक्षणाची माहिती घेतली जाते. त्यानंतर दैनंदिन आहारात त्याचे प्रमाण, कामाचे स्वरूप, व्यवसाय अशा विविध सवयी, व्यसने त्यांचे प्रमाण, मानसिक ताण असल्यास त्याची माहिती, भूकेचे प्रमाण, संडास-लघवीचे स्वरूप, पूर्वी झालेले विकार त्यासाठी झालेले औषधोपचार, सध्या चालू असणारी विविध रासायनिक औषधे, त्यांचे काही दुष्परिणाम आहेत का? यांसारख्या गोष्टींची सखोल माहिती घेतली जाते. त्यानंतर व्यक्तीचे वय, नाडी परीक्षा, कोष्ठ परीक्षा, प्रकृती परीक्षण इ. अष्टविध परीक्षांची तपासणी करून थकव्याची कारणे निश्चित केली जातात आणि त्यानंतरच ज्या संस्थेला थकवा असेल त्यावर हुकमी औषधी वनस्पतींची योजना निश्चित केली जाते व उपचार केले जातात. काहीवेळा थकव्याची कारणे एकापेक्षा जास्त शरीरसंस्थांत असतात. अशावेळी संयुक्त औषधांचा वापर केला जातो.
आयुर्वेदिक तत्त्वाप्रमाणे बहुतेक थकवा आलेल्यात वातप्रकोप झालेला असतो व त्याचे शमन करण्यासाठी विविध औषधी तेलाने सर्वांगाला अभ्यंग हलका मसाज करणे, डोक्यावर शिरोधारा, शिर अभ्यंग, नस्य, कर्णपुरण इ. क्रिया केल्या जातात. थकवा लवकर दूर होण्यासाठी तसेच आलेली शक्ती जास्त काळ टिकून राहण्यासाठी या अभ्यंगाचा, हलक्या मसाजचा निश्चितच बाह्य उपचारांबरोबरच औषधी आणि आहारातील पथ्ये यांना देखील थकव्यावरील, उपचार करताना महत्त्वाचे स्थान असते अशा आहाराचे मार्गदर्शन केले जाते.
आयुर्वेदानुसार…
विविध अवयव किंवा शरीर संस्थेनुसार त्या त्या अवयवांचा किंवा शरीर संस्थेच्या थकव्यावर काम करून त्यांची कार्यशक्ती वाढविणारी अशी विशिष्ट औषधी असे सखोल विवेचन आयुर्वेदात सापडते. म्हणजे शतावरी, अश्वगंधा, आवळा, गुळवेल, भुईआवळा, कुटकी, शरपुंरवा इ. यकृताचे म्हणजे लिव्हरच्या थकव्यावर उत्तम कार्य करतात. ब्राह्मी, अश्वगंधा, शंखपुष्पी, जटामांसी इ. वनस्पती, अभ्रकभस्म, सुवर्णभस्म, रौप्यभस्म तसेच मनाचा थकवा दूर करून त्याची कार्यक्षमता वाढवितात. सुंठमिरे, पिंपळी, पर्पटी, इ. औषधं पचन संस्थेची पचनशक्ती वाढविण्यास मदत करतात. मृगशृंगभस्म, अभ्रकभस्म, सुवर्णभस्म इ.मध्ये फुफ्फुस आणि हृदयाचा थकवा दूर करून त्याची कार्यशक्ती वाढविण्याची क्षमता आहे. थोडक्यात थकव्यात सगळ्यांना एकच एक टॉनिक न देता कोणत्या शरीर अवयव अथवा संस्थेचा थकवा आहे याचा विचार करून आयुर्वेदिक औषधी योजना केल्यास कमी काळात कमी खर्चात जास्त फायदा होतो.