Serebral angiography | सेरेब्रल अँजिओग्राफी नेमकी कोणी करावी?

Serebral angiography |
Serebral angiography | सेरेब्रल अँजिओग्राफी नेमकी कोणी करावी?
Published on
Updated on

डॉ. नितीन डांगे

अनेक गंभीर मेंदूविकार मोठ्या लक्षणांनी सुरू होत नाहीत, तर सुरुवातीला अगदी सूक्ष्म संकेत देतात. अचानक होणारी तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा काही काळासाठी गोंधळल्यासारखे वाटणे ही लक्षणं अनेकदा दुर्लक्षित केली जातात. मात्र, काही वेळा ही मेंदूतील रक्तवाहिन्यांशी संबंधित गंभीर समस्यांची लक्षणं असू शकतात. अशा वेळी सेरेब्रल अँजिओग्राफी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते. या तपासणीमुळे मेंदूमधील रक्तप्रवाहाची स्थिती स्पष्टपणे समजते आणि योग्य वेळी उपचार करणे शक्य होते.

सेरेब्रल डीएसए (डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी) ही मेंदूतील रक्तवाहिन्यांची तपासणी करण्यासाठीची अत्याधुनिक आणि ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानली जाणारी चाचणी आहे. या तपासणीद्वारे रक्तवाहिन्यांमधील अडथळे, अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या, अ‍ॅन्युरिझम (रक्तवाहिन्यांवरील फुगीर भाग) किंवा धमन्या आणि शिरांमधील असामान्य जोड ओळखता येतात.

ही प्रक्रिया रुग्णालयात केली जाते. यात मांडीजवळील किंवा मनगटातील रक्तवाहिनीतून एक बारीक नळी (कॅथेटर) मेंदूपर्यंत नेली जाते. त्यानंतर विशेष डाई सोडली जाते, ज्यामुळे एक्स-रेमध्ये रक्तवाहिन्या स्पष्ट दिसतात. ही प्रक्रिया साधारण 30 मिनिटांची असून स्थानिक भूल देऊन केली जाते. डाई वापरली जात असल्याने रुग्णाची मूत्रपिंडांची कार्यक्षमता सामान्य असणे आवश्यक असते. बहुतांश रुग्णांना त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी घरी सोडले जाते.

सेरेब्रल अँजिओग्राफीद्वारे खालील गंभीर आजार ओळखता येतात :

स्ट्रोक किंवा रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेज

मेंदूतील अ‍ॅन्युरिझम

आर्टेरिओव्हेनस मॉलफॉर्मेशन

रक्तवाहिन्या अरुंद झाल्या आहेत का

रक्ताच्या गाठी किंवा इतर रक्तवाहिन्यांतील विकार

खालील लक्षणे असणार्‍या व्यक्तीला ही तपासणी करावी लागू शकते.

तीव्र डोकेदुखीचा त्रास

सतत आणि तीव्र डोकेदुखी होणे, अचानक डोकेदुखी मेंदूत रक्तस्राव किंवा अ‍ॅन्युरिझमचे संकेत असू शकते.

फिटस् किंवा बेशुद्ध पडणे

अचानक फिटस् येणे, शुद्ध हरपणे किंवा वारंवार बेशुद्ध पडणे हे मेंदूतील रक्तप्रवाहातील अडचणींशी संबंधित असू शकते.

शरीरातील अशक्तपणा किंवा मुंग्या येणे

चेहरा, हात किंवा पायाच्या एका बाजू अचानक कमकुवत होणे, मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे हे स्ट्रोकचे लक्षण असू शकते.

द़ृष्टीत बदल

धूसर दिसणे, दुहेरी दिसणे किंवा अचानक दृष्टी जाणे ही लक्षणे मेंदूतील काही भागांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा न होण्यामुळे दिसू शकतात.

बोलण्यात किंवा समजण्यात अडचण

अचानक अस्पष्ट बोलणे, शब्द समजण्यात अडचण येणे किंवा गोंधळ उडणे हे मेंदूच्या कार्यातील बिघाडाचे संकेत असू शकतात.

चक्कर येणे किंवा तोल जाणे

वारंवार चक्कर येणे किंवा अचानक तोल जाणे हे मेंदूतील रक्ताभिसरणातील समस्यांचे लक्षण असू शकते.

स्ट्रोक किंवा मिनी-स्ट्रोकची लक्षणे

तात्पुरती स्ट्रोकसद़ृश लक्षणेकिंवा स्ट्रोक आल्यास तातडीने तपासणी आवश्यक असते. अँजिओग्राफीमुळे नेमके कारण शोधता येते.

काही वेळा सेरेब्रल अँजिओग्राफीदरम्यानच उपचारही केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, रक्ताची गाठ काढणे, स्टेंट बसवणे किंवा अ‍ॅन्युरिझम सील करणे शक्य होते. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

स्ट्रोक टाळण्यासाठी रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान टाळणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच ही तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

logo
Pudhari News
pudhari.news