

डॉ. मनोज शिंगाडे
स्मार्टफोनचा वापर आपण काम, अभ्यास, संवाद, खरेदी आणि मनोरंजनासाठी करतो. जेव्हा फोन तपासणे ही एक स्वयंचलित सवय बनते, तेव्हा या सततच्या उत्तेजनाचा मेंदूवर काय परिणाम होतो, असा प्रश्न निर्माण होतो. अनेक रुग्ण एकाग्रतेचा अभाव, अपुरी झोप आणि वारंवार होणार्या डोकेदुखीची तक्रार करतात. या सर्वांचा थेट संबंध दैनंदिन स्मार्टफोनच्या वापराशी असल्याचे दिसून येते. या समस्येत केवळ स्क्रीनवर घालवलेला एकूण वेळच नव्हे, तर फोनमुळे वारंवार विचलित होणारे लक्ष आणि त्याचा सतत होणारा वापर अधिक महत्त्वाचा ठरतो.
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे कामात सतत अडथळा निर्माण होतो आणि लक्ष विचलित होते. एखादी व्यक्ती ई-मेलला उत्तर देत असतानाच नोटिफिकेशन येते, ती सोशल मीडिया उघडते आणि पुन्हा मूळ कामाकडे वळते. या प्रक्रियेमुळे मेंदूचे कार्य आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता विखुरली जाते.
शॉर्ट व्हिडीओ आणि सतत बदलणार्या कंटेंटमुळे मेंदूला सतत उत्तेजना मिळण्याची सवय होते. परिणामी, दीर्घकाळ एकाग्रतेने काम करणे कठीण जाते. विशेषतः विद्यार्थी आणि बौद्धिक काम करणार्यांवर याचा प्रतिकूल परिणाम होतो. रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने मेंदू सतत जागृत राहतो. त्यामुळे झोपण्याची वेळ लांबणीवर पडते आणि झोप लागण्यात अडचणी येतात. दररोज स्क्रीनवर घालवलेल्या प्रत्येक अतिरिक्त तासामुळे झोपेच्या वेळेत ३ ते ५ मिनिटांची घट होते, असे अभ्यासातून समोर आले आहे.
केवळ स्क्रीनच्या प्रकाशानेच नव्हे, तर फोनमधील कंटेंटमुळे मेंदू तणावात राहतो. अपुरी झोप, डोळ्यांवर येणारा ताण आणि चुकीच्या स्थितीत बसून फोन पाहिल्यामुळे मान व डोक्याच्या स्नायूंवर ताण येऊन डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. स्मार्टफोनचा मेंदूवरील नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी डिजिटल डिटॉक्स पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कामाच्या दरम्यान फोनचे नोटिफिकेशन्स बंद ठेवणे, रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी फोन बाजूला ठेवणे आणि स्क्रीन टाइमवर मर्यादा घालणे या सवयी लाभदायक ठरतात.