

बिंज ईटिंग म्हणजेच एका बैठकीत खूप अन्न खाण्याची प्रवृत्ती. ही सवय शारीरिक भुकेपेक्षा मनाच्या ताणाशी जास्त जोडलेली आहे. एखाद्या सणावाराच्या दिवशी जास्त खाणे म्हणजे बिंज ईटिंग नव्हे. नियमित स्वरूपात भावनिक उद्देशाने भूक नसतानाही आहाराचे सेवन केले जात असेल आणि त्यानंतर अपराधीपणा, लाज, नियंत्रण गमावल्याची भावना जाणवत असेल, तर सदर व्यक्तीला बिंज ईटिंगची समस्या जडली आहे, असे समजावे.
काही लोक परिपूर्ण जेवण केल्यानंतरही पुन्हा काहीतरी खाण्याकडे वळतात. ही भूक शरीराची नसून मनाची असते. तणाव, दु:ख, अपयश, हतबलता किंवा परिणाम दिसत नसल्याने होणारी निराशा ही बिंज ईटिंगमागील प्रमुख कारणं असतात. यावेळी डोपामिन (आनंद निर्माण करणारं मेंदूतील रसायन) तत्काळ हवं असतं आणि ते मिळवण्यासाठी साखरयुक्त, तेलकट, चविष्ट अन्न खावंसं वाटतं; पण त्यानंतर येणारा अपराधीपणा हा आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरतो. भावनिक चढउतारांच्या काळात किंवा नकारात्मक अवस्थेत हे वर्तन अधिक होते. कारण, या मनोवस्थेत आत्मनियंत्रण हरवलेलं असतं. अशा वेळी अन्न हे कोपिंग मेकॅनिझम किंवा भावनिक सांत्वन करणारं साधन ठरतं; पण हेच अन्न पुढे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. यावरून वजन कमी करणं म्हणजे फक्त बाह्य बदल नाही, तर अंतर्मनातील आणि शरीरातील अनेक सूक्ष्म बदलांचं एक परिणाम आहे, हे लक्षात येईल.
बिंज ईटिंग म्हणजे केवळ अन्न सेवनावरचं नियंत्रण सुटणे नाही, तर भावनांवरचा सुटलेला ताबा असतो. सबब आत्मनिरीक्षण, संयम आणि आपण स्वतःसाठी हीलिंगच्या प्रक्रियेत आहोत याबाबतचा आत्मविश्वास सदोदित असणे गरजेचे असते. बिंज इटिंगची समस्या कमी झाल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते. पोटफुगी आणि अपचन कमी होते. तसेच क्रेविंग्स (विशेषतः साखरेच्या) कमी होणे, मधुमेह नियंत्रणात येणे, मन:स्थिती अधिक स्थिर राहणे, हार्मोनचं संतुलन पुन्हा मिळवणे हेही इतर लाभ यामुळे होतात. या प्रक्रियेत आपण बारीक झालो नाही म्हणून निराश होणं गैर आहे. त्याऐवजी शरीराच्या सूक्ष्म सिग्नल्सकडे लक्ष द्या. परिणाम उशिरा दिसू शकतात; पण ते नक्की घडत असतात. अशा वेळी हार मानणं केवळ एक पायरी दूर असलेल्या बदलाचं नुकसान होऊ शकतं.