वैद्य विनायक खडीवाले
आपली शारीरिक उंची चांगली हवी असे प्रत्येकालाच वाटते; पण विशिष्ट वयात त्यासाठी उपचार करायला हवेत. काही वेळा अनुवांशिक कारणांमुळे मुलांची उंची कमी असते; पण ती वाढविण्यासाठी आयुर्वेदामुळे अनेक प्रकारचे उपचार आहेत. ते करून घेत असतानाच आहार—विहाराचाही निश्चितपणे विचार करायला हवा, असे झाले तर आपली उंची वाढवणे मुलांना सहज शक्य होईल.
हल्लीची युवा पिढी रेखीव चेहरा आणि केसांच्या सौंदर्याबरोबरच उंची, प्रमाणित वजन यालाही फार महत्त्व देते. नोकरी मिळवताना आपली उत्तम छाप पडावी व त्याकरिता व्यवस्थित उंची असावी, याची जाणीव तरुण पिढीला होत आहे. गेल्या काही वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायात उंचीकरता, ती व्यवस्थित वाढावी म्हणून औषधे मागणारी आधुनिक पिढी दररोज दिसून येते. या वयातसुद्धा ते म्हणतात, 'आम्हाला उंची वाढवून द्या.' त्यांना सर्वच बाबतीत उंची हा विषय प्रतिष्ठेचा वाटू लागला आहे.
पण, माझ्या मते गेल्या काही वर्षांच्या आयुर्वेद अनुभवातून वा इतर व्यायाम वगैरेंचा विचार केल्यावर त्याचा योग्य वापर केला, तर मुलांची 18-19 व क्वचित 20 वर्षांपर्यंत उंची वाढू शकते व मुलींची 17-18 या वयापर्यंत क्वचित 19 वर्षांपर्यंत उंची शेवटच्या टप्प्यात वाढलेली आढळते. याकरिता ज्यांना उंची वाढवायची आहे, त्यांनी वय 14 ते 17 मध्ये जोरदार प्रयत्न व जोरदार व्यायाम यांचा एकत्रित उपयोग करून घेतला पाहिजे. त्याबरोबर आयुर्वेदिक विशिष्ट टॉनिक घेऊन फायदा करून घेतला, तर 6 ते 9 महिन्यांत उंची वाढण्याची शरीराची प्रक्रिया व निर्मिती कार्यरत होते. त्याकरिता मुळात उंची वाढण्यासाठी आयुर्वेदिक टॉनिके आयुर्वेदात भरपूर आहेत, पण ती सुरू करण्याअगोदर दररोज काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. 24 सूर्यनमस्कार, ताडासन, नियमित पोहणे, 200 ते 300 उंच उड्या (एका दमात), पोहणे नाही जमले तर धावणे हे सर्व व्यायाम नियमितपणे करावेत. त्याबरोबर उंची वाढण्याकरिता संतुलीत आहारही असला पाहिजे.
मुगाचे वरण (हिरवे व पिवळे मूग), मुगाची, मसुराची उसळ, सर्व प्रकारची कडधान्ये रात्री भिजत घालून ती सकाळी मूठभर दररोज उत्तम चावून खाणे, व्यवस्थित दररोज प्रमाणात पाणी पिणे, काळा खजूर+तूप, एक जर्दाळू, दररोज 1 बदाम उगाळून घेणे, यापैकी एखादे घरगुती टॉनिक दररोज घ्यावे. प्रमाणात दूध, तूप, केळी यांचा आहारात वापर कराावा. डाळिंब, सफरचंद, अंजीर, आवळा, कोहळा या फळांचा नियमित खाण्याकरिता अवश्य वापर करावा. सर्व पालेभाज्या, फळभाज्या यांचे सूप, मक्याचे सूप प्यावे, तसेच कच्च्या फळभाज्या, गाजर, बीट, काकडी, टोमॅटो, ग्रीन सॅलड हे सर्व नियमितपणे प्रमाणात अवश्य खावे. हे सर्व केल्यावरच आयुर्वेदिक औषधे घ्यावीत. अस्थिधातू (कॅल्शियम) व रक्तधातूवर्धनाकरिता व पर्याय आहेत. हे धातू वाढल्यावर उंची वाढवण्याचे कार्य सुकर होण्याकरिता खालील विविध शक्तिवर्धके, विशिष्ट टॉनिक उपयोगी पडतात, मग शरीरातल्या सर्व संस्था उत्तमरितीने कार्य करतात. पचन चांगले होऊन तयार होऊन उंची वाढण्याचे काम केले जाते.
कृमीनाशकवटी (दररोज अनशापोटी) 3-3 गोळ्या सकाळ व सायंकाळ बारीक करून गरम पाण्यातून अथवा दुधातून घ्यावी. मृगशृंगभस्म गोळ्या वा सांबरशिंगभस्म गोळ्या 3-3 गोळ्या बारीक करून दोन वेळा सकाळी व सायंकाळी अनशापोटी दुधातून घ्याव्यात. लाक्षा (पिंंपळलाख निर्यास) व डिंक यापासून व इतर काही वनस्पतींपासून एकत्र केलेल्या गोळ्या बारीक करून सकाळ व सायंकाळ अनशापोटी दुधाबरोबर घ्याव्यात.
बदाम, शतावरी, सुंठ, साखर यापासून केलेल्या कल्पाचाही विचार करावा. तो 2-2 चमचे 1 कप गरम दुधातून सकाळ व सायंकाळी घ्यावा. त्याचबरोबर अगोदर या वरील तिन्ही प्रकारच्या गोळ्या घ्याव्यात. असे 6 ते 9 महिने करावे. त्याचबरोबर मागे सांगितल्याप्रमाणे सर्व व्यायाम व प्रमाणित पथ्यकारक राहील, असा आहार— विहार ठेवावा. हे सर्व केलेे तर जवळजवळ 80 ते 90 टक्के लोकांना याचा फायदा होईल. अर्थात, वयोमर्यादा 12 ते 16 वा 14 ते 18 वा 19 वर्षांपर्यंत. क्वचित 19 ते 20 वर्षांपर्यंत फायदा झालेला दिसून येतो. म्हणूनच 20 वर्षांनंतर उंचीकरिता पोटात औषध घेऊन उंची वाढेल या अपेक्षेने औषध घेतले, तर त्याचा फायदा होत नाही. आई-वडील बुटके असतील त्यांच्या मुलामुलींनी 12 ते 16, 14 ते 18 या वयात योग्य काळजी घ्यावी.
सुवर्णसिद्ध जलाने क्रमाक्रमाने, रसापासून शुक्र व शुक्रापासून ओज चांगलेच तयार होऊन त्यातून नैसर्गिक प्रक्रियेने उंची वाढायला मदत होते. याचा अधिक फायदा झालेला दिसून आला आहे. यामध्ये कोणताही शुद्ध वा चोख सोन्याचा दागिना वापरला जातो. (सोन्याचा पत्रा-लॉकेट, अंगठ्या, बांगड्या) 4 कप पाणी जमले, तर चांदीच्या पात्रात वा कोणत्याही भांड्यात ठेवून त्याचे 1 कप होईपर्यंत आटवावे. यालाच सुवर्णसिद्ध जलप्रयोग असे म्हणतात. असे केलेले पाणी सकाळी पोट साफ झाल्यावर प्यावे. यानेही अधिक उंची करता फायदा झालेला दिसून आला आहे.
माझ्या अनुभवातून घरच्या घरी कोहळ्याच्या दुधयुक्त वड्या, गाईचे तूप भरपूर पिणे, जेवणाअगोदर व जेवणानंतर 1-1 चमचा चांगले तूप (गायीचे) नुसते खाणे, आवळा, मनुका, खजूर, मावा यांच्या एकत्रित वड्या, मुगाचे लाडू, मुगाचे डोसे, मसुराची उसळ, शतावरीच्या मुळ्यांचे चूर्ण 1-1 चमचा दोनवेळा, सांबरशिंग वा हरणाचे शिंग 1-1 चमचा दोनवेळा दुधातून उगाळून घेणे. हे सर्व वरील उपचारांबरोबर केले व त्याचबरोबर बदाम तेलाचा वा चंदनबलालाक्षादी तेलाचा वा शतावरी सिद्ध तेलाचा अभ्यंग (मसाज) सर्वांगाला व केसाच्या मुळांना दररोज किमान 20 मिनिटे केला, तर त्याचाही फायदा उंची वाढण्यासाठी होतो; मात्र हे उपचार 4 ते 18 या वयातच करणे आवश्यक आहे.