डॉ. संजय गायकवाड
कोव्हिड-19 च्या प्रतिकारासाठी लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे; परंतु लसीकरणाबाबत लोकजागृती अत्यंत कमी असून, काहीजणांचे लसींविषयी पूर्वग्रहसुद्धा आहेत. यासंदर्भात नेहमी विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे येथे दिली आहेत.
1. कोणती लस घ्यावी?
– गर्भवती महिला, स्तनदा माता आणि इम्युनोसप्रेसिव्ह आजार असलेल्यांनी कोव्हिशिल्ड लस घेणे चांगले. अन्य व्यक्तींनी दोन्हीपैकी कोणत्याही लसीची निवड करावी. अर्थात, पहिली मात्रा ज्या लसीची घेतली आहे, त्याच लसीची दुसरी मात्रा घ्यायची आहे, हे विसरू नका.
2. कोव्हिड -19 होऊन गेला आहे. लस घ्यावी का? नक्की कधी घ्यावी?
– तुम्हाला जर कोव्हिड-19 होऊन गेला असेल, तरी लस घ्या. फक्त तुमचा कोव्हिड अहवाल ज्या दिवशी पॉझिटिव्ह आला, तिथपासून 30 दिवस अंतर ठेवून मग लस घ्या.
3. मी लसीची पहिली मात्रा घेतली, त्यानंतर काही दिवसांनी मी कोव्हिड-19 पॉझिटिव्ह झालो. आता दुसर्या मात्रेचे काय करावे?
– अशा प्रकरणांमध्ये पहिल्या मात्रेनंतर झालेला कोव्हिड-19 बूस्टर डोसचे काम करीत असतो. त्यामुळे दुसरी मात्रा थेट 60 ते 90 दिवसांनीच घ्यावी.
4. फायजरच्या लसीची परिणामकारकता 95 टक्के आहे तर कोव्हिशिल्डची परिणामकारकता 60 ते 90 च्या दरम्यान आहे. आपण कमी दर्जाची लस घेत आहोत का?
– फायजर आणि मॉडर्ना लसींच्या चाचण्या कोव्हिशिल्ड (अॅस्ट्रॉजेनेका), जॉन्सन अँड जॉन्सन आणि कोव्हॅक्सिन लसींच्या कितीतरी आधी झाल्या आहेत. त्यावेळी उत्परिवर्तन झालेल्या विषाणूंचा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे असे काहीही खात्रीने सांगता येत नाही. कोणत्याही दोन लसींच्या चाचण्या एकाच लोकसंख्येवर, एकाच वेळी शक्यतो तुलनात्मक अभ्यासाच्या हेतूने जोपर्यंत केल्या जात नाहीत तोपर्यंत कोणती लस अधिक चांगली आहे आणि कोणती वाईट आहे, हे सांगता येत नाही.
5. कोव्हिडच्या विषाणूचे उत्परिवर्तन होत आहे त्याचे काय? दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटवर कोव्हिशिल्ड प्रभावी नाही.
उत्तर : कोव्हिशिल्डची परिणामकारकता दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटबाबत कमी असेलही; परंतु व्हेरिएंट कोणताही असला तरी कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना रुग्णालयात धाव घ्यावी लागण्याचे प्रमाण नगण्य असून मृत्यूपासून चांगले संरक्षण मिळत आहे.
6. लस घेतल्यास रक्तात गाठी (क्लॉट) होण्याचे प्रमाण किती? त्या द़ृष्टीने लस घेणे सुरक्षित आहे का?
-कोव्हिशिल्ड (अॅस्ट्रॉजेनेका) लस घेतल्यामुळे रक्तात गाठी होण्याचे प्रमाण धूम्रपानामुळे होणार्या गाठींच्या तुलनेत 400 पट कमी आणि कोव्हिड-19 मुळे होणार्या गाठींच्या तुलनेत 40000 पट कमी आहे. क्लॉटिंग हा लसीकरणाचा अगदी दुर्मिळातील दुर्मीळ दुष्परिणाम (साईड इफेक्ट) आहे. त्यामुळे अशा गोष्टींना न घाबरता लस घेणेच चांगले.
7. किमान आठ ते दहा लोक असे माहीत आहेत की ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर त्यांना कोव्हिड-19 चा संसर्ग झाला. किमान दोन-तीन जण असे आहेत, ज्यांना दोन्ही मात्रा घेतल्यानंतर संसर्ग झाला. असे असल्यास लसीचा उपयोगच काय?
– लसीकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात हे ठरविणे खरोखर कठीण आहे. संसर्गापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी लस नसून, कोणताही विशिष्ट आजार होऊन तुम्हाला थेट रुग्णालयात दाखल व्हावे लागू नये हा हेतू आहे. आजारापासून संपूर्ण बचावाचे कवच लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी तयार होते. त्यामुळे लसीकरण झाले म्हणून काळजी घेणे सोडून चालणार नाही. योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे.
8. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या बाबतीत दोन मात्रांमधील अंतर किती असावे?
– दोन मात्रांमध्ये चार आठवड्यांचे अंतर असावे. त्यामुळेच लस पूर्णपणे प्रभावी ठरू शकेल. (परिणामकारकतेच्या बाबतीत थोडी कमतरता जाणवली तरी.) कोव्हॅक्सिनच्या बाबतीत दोन मात्रांमध्ये चार आठवड्यांचे अंतर राखणे चांगले.
9. कोव्हिशिल्डच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. अधिक संरक्षणासाठी कोव्हॅक्सिनची किंवा अन्य एखाद्या लसीची एखादी मात्रा घ्यावी का? अधिक संरक्षणासाठी कोव्हिशिल्डचीच आणखी एक मात्रा घ्यावी का?
– कृपया घेऊ नका. त्यामुळे दुष्परिणामांचीच शक्यता अधिक आहे.
10 आपण अत्यंत तंदुरुस्त असून, दररोज जिममध्ये जातो, तसेच योगाही करतो. अन्य कोणत्याही व्याधी (को-मॉर्बिडिटी) नाहीत. त्याचबरोबर दररोज मल्टिपल सप्लिमेंट आणि च्यवनप्राश घेतो. लसीऐवजी माझ्या रोगप्रतिकार शक्तीवर विसंबून राहू शकतो का?
– तुमच्या प्रयत्नांचे कौतुकच केले पाहिजे. स्वतःची चांगली काळजी तुम्ही घेत आहात. तंदुरुस्त नसलेल्या माणसांच्या तुलनेत तुम्ही गंभीर आजार होण्याचा आणि मृत्यूचा धोका कितीतरी कमी केला आहे. सध्या आजार होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण विशीतल्या आणि तिशीतल्या तरुणांमध्येही वाढल्याचे आपण पाहत आहोत. त्यांना कोणतेही पूर्वीचे आजार नाहीत, व्याधी नाहीत. त्यामुळे अन्य कोणत्याही गोष्टीवर अतिरिक्त भरवसा न ठेवता लवकरात लवकर लस घेणे योग्य ठरेल.
काही महत्त्वाच्या गोष्टी :
1. लस प्रभावी ठरेल अथवा न ठरेल; परंतु हमखास आणि 100 टक्क प्रभावी ठरतो तो मास्क वापरा.
2. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार अनेक गरीब देशांना लस मिळेपर्यंत 2023 किंवा 2024 साल उजाडेल. तेही कुणी दान दिल्यातरच! या पार्श्वभूमीवर आपण खूप भाग्यवान आहोत. कारण आपण लस उत्पादन करणार्या देशात राहतो. तेव्हा, लवकरात लवकर लसवंत व्हा!