1930 पूर्वी घराघरांत सैंधव मीठ किंवा काळे मीठ असे नैसर्गिक मीठ वापरले जात होते. तेव्हा लोकांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू इत्यादी आजार मोठ्या प्रमाणात नव्हते. सैंधव मिठाचे नैसर्गिक डोंगर पाकिस्तानच्या लाहोर भागात आहेत. त्यामुळे त्याला लाहोरी नमक असेही म्हणतात; मात्र 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला व भारत-पाकिस्तान फाळणी झाली, तेव्हा मिठाचे नैसर्गिक डोंगर पाकिस्तानच्या हद्दीत गेले व तेव्हापासून समुद्री मीठ खाण्यात आले. त्यात ते मीठ रिफाईन्ड करणे, सुटसुटीत करणे, अधिक शुभ्र करणे व आयोडीनयुक्त करणे यामध्ये अनेक कृत्रिम रसायनांचा वापर झाला व हे मीठ आरोग्यासाठी घातक ठरू लागले.
आयोडीनयुक्त मिठाची खरंच गरज आहे का?
खरंतर आपल्याला दररोज 150 एमसीजी इतकी कमी आयोडीनची गरज असते. गर्भावस्थेत व बाळंतपणात त्यापेक्षा थोडी अधिक गरज असते; मात्र मैदानी प्रदेशात राहणार्यांना त्या प्रदेशात पिकणारे धान्य, भाजीपाला, डाळी, गाजर, मुळा, बटाटा, शेंगदाणा अशा गोष्टींमध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, समुद्री अन्न इत्यादी अनेक अन्नपदार्थांच्या माध्यमातून सहज मिळते.
आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या, रक्तदाब कमी होणे, घेंगा रोग, गर्भपात, जन्मानंतर एका आठवड्यातच जन्मजात बाळाचा मृत्यू होणे, जन्मलेल्या मुलांमध्ये मंदबुद्धी, बहिरेपणा, उंची न वाढणे अशा विकृती येतात. त्यामुळे थायरॉईड ग्रंथींच्या उत्तम कार्यासाठी, मेंदूच्या वाढीसाठी व विकासासाठी आयोडीनची आवश्यकता असते.
आयोडीन अती झाले, तर रक्तदाब वाढणे, मधुमेह, अर्धांग वायू, नपुंसकत्व असे आजार होतात.
भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल ही तीन राज्ये जी उंच डोंगरी भागात असल्यामुळे त्या ठिकाणी जे धान्य पिकते, पालेभाज्या, फळे होतात त्यामध्ये निसर्गतः आयोडीनची कमी असते. अशा ठिकाणी आयोडीनयुक्त मिठाची निश्चितच गरज आहे. त्यांनी आयोडीनयुक्त मीठ वापरलेच पाहिजे; पण मैदानी भागात राहणार्यांना त्यांच्या आहारातूनच आयोडीनची पूर्तता होत असते. त्यामुळे त्यांनी आयोडीनयुक्त मीठ खाण्याची गरज नाही. समुद्रकिनारच्या भागांमध्ये आयोडीनयुक्त मीठ खाण्याची अजिबातच गरज नाही. कारण, समुद्री अन्न हे त्यांचे प्रमुख अन्न असते. त्यातून आयोडीनची पूर्तता होतच असते, तरीही घेतल्यास अतिआयोडीनच्या प्रमाणामुळे नपुंसकत्व, रक्तदाब वाढणे, मधुमेह, अर्धांगवायू असे आजार होण्याची शक्यता वाढते. अतिरिक्त आयोडीनच्या सेवनामुळे होणारे हे धोके लक्षात घेऊन युरोप व अमेरिका खंडातील कित्येक देशांमध्ये आयोडीनयुक्त मिठाला बंदी घालण्यात आलेली आहे.
रिफाईन्ड मीठ म्हणजे काय व ते का घातक आहे?
रिफाईन्ड मीठ तयार करताना मिठाचे पाणी 1200 अंश सेल्सिअसपर्यंत गरम केले जाते. तेव्हा मिठातील बहुतांश पोषक तत्त्वे त्यामुळे नष्ट होतात. शिवाय मिठाला अधिक शुभ्र, सुटसुटीत करण्यासाठी अनेक कृत्रिम रसायनांचा वापर केला जातो, तसेच आयोडीनयुक्त करण्यासाठी कृत्रिम आयोडीन टाकण्यात येते. त्यामुळे या रिफाईन्ड मिठामध्ये 97.5 टक्के सोडियम क्लोराईड व 2.5 टक्के काही तुरळक पोषकतत्त्वे व कृत्रिम रसायने असतात. त्यामुळे हे आरोग्यासाठी घातक असते.
सैंधव मीठ/काळे मीठ का उत्तम?
हे नैसर्गिक मीठ आहे. यामध्ये कसल्याही प्रकारची कृत्रिम रसायने नसतात. त्यामुळे हे औषध म्हणून व कित्येक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापरले जाते.
साध्या मिठात केवळ तीन प्रकारची पोषक तत्त्वे असतात; पण सैंधव मिठात 94 प्रकारची पोषक तत्त्वे असतात. या सर्व पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू, मेंदू विकार असे अनेक आजार होऊ शकतात.
सैंधव मिठात नैसर्गिक आयोडीन असते. ते आपल्या शरीरात व्यवस्थित शोषले जाते; मात्र रिफाईन्ड आयोडीनयुक्त मिठात जे कृत्रिम आयोडीन असते, ते शरीरात कमी शोषले जाते. त्यामुळे पित्ताचा खडा, मुतखडा, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात.
सैंधव मीठ वात-पित्त-कफ संतुलित ठेवायला मदत करते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी चांगले.
सैंधव मिठामुळे अपचन, गॅस, पित्त होत नाही.
दूध-दह्याबरोबर कृत्रिम मीठ खाणे वर्ज्य आहे; मात्र सैंधव मीठ चालते. कारण, दह्यात साधे मीठ टाकल्यास त्यातील जीवाणू मरतात; मात्र सैंधव मीठ टाकल्यास त्यातील जीवाणू मरत नाहीत.
त्यामुळे शक्यतो मैदानी प्रदेशातील लोकांनी सैंधव मीठाचे सेवन करणे उत्तम; पण आयोडीनची कमतरता असल्यास मात्र आयोडीनयुक्त मीठ वापरायलाच हवे.
– प्रमोद ढेरे