डॉ. तुषार पारेख
बर्याच विकसनशील देशांमध्ये होणार्या नवजात आणि प्रौढ मुलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे अतिसार होणे हे आहे. 'डब्ल्यूएचओ'च्या मते, पाच वर्षांखालील मुलांमध्ये डायरियाचा आजार हे मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. अतिसार हा बर्याचदा योग्य स्वच्छतेच्या अभावामुळे होतो. याचे गंभीर आणि जीवघेणे परिणामही होऊ शकतात. 'ओआरएस' हे ओरल डिहायड्रेशन सोल्यूशन असते. हे एक सोल्यूशन आहे जे सतत डिहायड्रेट होणार्या बाळांना दिले जाते. आपल्या बाळाला अतिसार किंवा उलट्यांचा त्रास झाल्याने शरीरातून द्रवपदार्थाचे प्रमाण कमी होते. 'ओआरएस'मध्ये सोडियम, पोटॅशियम, साखर आणि शरीराला आवश्यक असलेल्या इतर महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाईटस्चा समावेश असतो. अतिसार किंवा उलट्या झालेल्या मुलांसाठी 'ओआरएस' वरदान ठरू शकते. बाळाच्या शरीरातील द्रव पदार्थ प्रमाण कमी झाल्याने बाळ डिहायड्रेट होऊ शकतो. 'ओआरएस' हे बाळाला हायड्रेट करत राहते आणि गंभीर गुंतागुंतीपासून वाचवते. तीव्र अतिसार झाल्यास अल्पावधीत बर्याचशा द्रव्यांचा नाश होऊ शकतो.
योग्य प्रमाणातील ग्लुकोजमुळेच शरीरामध्ये सोडियम व पाणी शोषले जाऊ शकते आणि शरीरामध्ये पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली जाऊ शकते. 'ओआरएस'मुळे उलट्या, डिहायड्रेशन, जुलाबाचे प्रमाण कमी होते. त्याचा वापर घरोघरी वाढला असून डेंग्यू, ताप व इतर अनेक आजारांमध्येही 'ओआरएस'चा वापर वाढत आहे. 'ओआरएस'सह झिंकचा वेगळा वापर 14 दिवस केल्यास प्रतिकारशक्ती वाढून सतत होणारे अतिसार, जुलाब होण्याचे प्रमाणही कमी होते. बालकांना 'ओआरएस' सुरू केल्यास आजाराची तीव्रता, गुंतागुंत टाळता येऊ शकते आणि पर्यायाने 'डायरिया'मुळे होणारे मृत्यूदेखील रोखता येऊ शकतील.
'ओआरएस'चा वापर कसा करावा?
ते उकळून थंड केलेल्या पाण्यात घालावे. जोपर्यंत पावडर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत नीट ढवळून घ्यावे. 'ओआरएस' एक चमचा, फीडर किंवा ड्रॉपरचा वापर करून बाळाला दिले जावे. बाटलीद्वारे 'ओआरएस' देऊ नका. वयोगटानुसार 'ओआरएस' सेवनाचे प्रमाण भिन्न असू शकते. 'ओआरएस' सुरक्षित आहे आणि सर्वच वयोगटासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. मुलांवर वेळीच उपचार केले पाहिजेत, कारण लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता अधिक असते.
बाळाला उलट्या झाल्यास त्याच्या पोटात अन्न नसल्याकारणानेही बाळ डिहायड्रेट होऊ शकते. अशा वेळी पालकांनी बाळाला 'ओआरएस' पाजावे. एकाच वेळी ग्लासभर 'ओआरएस' पाजण्यापेक्षा थोड्या अंतराने 'ओआरएस' पाजणे उत्तम ठरते. ते बाळासाठी अतिशय सुरक्षित आहे. जर आपल्या लक्षात आले की 48 तासांमध्ये आपल्या बाळाच्या तब्येतीमध्ये सुधारण झाली नाही तर मात्र बाळाला त्वरित रुग्णालयात दाखल करावे.