बदलत्या जीवनशैलीचा मूत्रपिंडावर आघात | पुढारी

Published on
Updated on

दरवर्षी 14 मार्च हा जागतिक मूत्रपिंड दिन म्हणून पाळला जातो. मूत्रपिंडाचे विकार लवकर ओळखू येत नाहीत. त्याची लक्षणे आजार बळावल्यावरच दिसू लागतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या व्यसनांमुळे मूत्रपिंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे हा जीवघेणा विकार वाढत चालला आहे. महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत या विकाराचे प्रमाण अधिक आढळते. आहाराच्या बाबतीत पथ्ये पाळणे आणि जीवनशैली अधिक शिस्तबद्ध करणे हाच मूत्रपिंडाच्या विकारापासून दूर राहण्याचा राजमार्ग आहे. 

देशातील सुमारे 14 टक्के महिला आणि 12 टक्के पुरुष मूत्रपिंडाच्या विकारांनी त्रस्त आहेत, ही माहिती अस्वस्थ करणारी आहे. संपूर्ण जगभरात 19.5 टक्के महिलांना मूत्रपिंडाशी संबंधित विकारांनी ग्रासले आहे. भारतातसुद्धा ही समस्या मोठ्या वेगाने वाढत असून, दरवर्षी 2 लाख लोकांना मूत्रपिंडाशी संबंधित विकार जडतात. भूक न लागणे, उलट्या होणे, थकवा आणि अशक्तपणाचा अनुभव, लघवीचे प्रमाण कमी होणे, खाज, झोप न लागणे, स्नायूंमध्ये ताण ही मूत्रपिंडाच्या विकारांची प्राथमिक लक्षणे आहेत. डबाबंद पदार्थांचे सेवन, चिप्स, खारे पदार्थ, लोणची, चटण्या आदी पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने या आजाराची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे या पदार्थांचे सेवन संबंधितांनी मर्यादित करणेच इष्ट ठरते. मूत्रपिंडाच्या आजारात विशेषतः प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि द्रवपदार्थांच्या सेवनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रित राखणेही आवश्यक ठरते. 120-80 या सामान्य स्तरावर रक्तदाब असायला हवा. मूत्रपिंड निकामी होण्याच्या समस्येपासून बचावासाठी रक्तदाब नियंत्रित राखल्यास समस्या वाढत नाही. 

मूत्रपिंडाचा विकार जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे दरवर्षी 14 मार्च रोजी जागतिक किडनी दिवस पाळण्यास सुरुवात करण्यात आली. या समस्येविषयी जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे हा त्यामागील हेतू असून, प्रारंभिक लक्षणे जाणवू लागताच उपाययोजना केल्यास या विकारामुळे होणार्‍या मृत्यूंचा दर काही प्रमाणात आटोक्यात ठेवता येईल, ही मूळ संकल्पना आहे. जगातील सुमारे पाच टक्के लोकसंख्या मूत्रपिंडाशी संबंधित कोणत्या तरी समस्येने ग्रासलेली आहे. लाखो लोकांना दरवर्षी या समस्येमुळे जीव गमवावा लागतो; परंतु तरीही या समस्येविषयी जागरूकता अत्यंत कमी आहे. क्रॉनिक किडनी डिसीजने ग्रासलेल्या व्यक्तींची संख्या दरवर्षी वाढत आहे. आधुनिक जीवनशैली, अनारोग्यास कारणीभूत ठरणारी खाद्यसंस्कृती, स्थूलतेचे वाढते प्रमाण, धूम्रपान आणि मादक द्रव्यांचे सेवन ही मूत्रपिंडाच्या विकारांना कारणीभूत ठरणारी अशी कारणे आहेत, जी टाळता येऊ शकतात. क्रॉनिक किडनी डिसीजमुळे होणार्‍या 5 पैकी 4 मृत्यू मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील व्यक्तींचे असतात. सर्वाधिक धोक्यात असणारे रुग्ण हायपरटेन्शन किंवा मधुमेहाने ग्रस्त असतात. धूम्रपान करणारे, स्थूल व्यक्ती, पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्ती किंवा ज्यांच्या कुटुंबात पूर्वी कुणाला तरी असा विकार जडलेला होता अशा व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यायला हवी. उच्च रक्तदाब, वारंवार (विशेषतः, रात्रीच्या वेळी) लघवीस जावे लागणे, पायांवर सूज येणे, लघवीच्या रंगात बदल होणे, लघवीतून रक्त पडणे, किडनीच्या ठिकाणी वेदना, थकवा आणि भूक न लागणे, झोप उडणे, डोकेदुखी, एकाग्रता न होणे, श्वास घेण्यात अडचण, उल्टी, श्वासांना दुर्गंधी, तोंडात विचित्र चव येणे अशी असंख्य लक्षणे मूत्रपिंडाच्या विकाराची असू शकतात, हे लक्षात ठेवले पाहिजे.

सामान्यतः, मिठात अधिक प्रमाणात असणार्‍या सोडियम या घटकाचे अतिसेवन केल्यास हायपरटेन्शन वाढते. त्यानंतर हळूहळू मूत्रपिंडाचे काम मंदावते. मूत्रपिंड निकामी होत आहे, याचा अंदाज लवकर लागणे अवघड असते. युवा पिढीकडून आवड म्हणून किंवा वेळेच्या अभावामुळे बाजारातील तयार पदार्थ खाल्ले जातात. या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. वास्तविक त्यांनी स्वच्छ, ताजी फळे खाणे, नियमित व्यायाम करणे, शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे आणि धूम्रपान बंद करणे अशा गोष्टींवर भर द्यायला हवा. या सवयी केवळ मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारतात असे नाही, तर संपूर्ण शारीरिक आरोग्याचेही रक्षण करतात. भारतात अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेताच वेदनाशामक औषधे घेतात. त्याचाही दुष्परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतो. भारतात क्रॉनिक किडनी डिसीजच्या वाढत्या प्रमाणास गरिबी, अस्वच्छता, वायूप्रदूषण, जलप्रदूषण, गर्दी आणि ज्ञात-अज्ञात रसायने असे घटक जबाबदार आहेत. किडनीशी संबंधित अनेक विकार या घटकांमुळे जडू शकतात. 30 ते 40 टक्के भारतीय रुग्णांमध्ये मधुमेह हे मूत्रपिंडाच्या विकाराचे प्रमुख कारण बनते. 2030 पर्यंत भारतात मधुमेही रुग्णांची संख्या जगात सर्वाधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत मूत्रपिंडांच्या विकारातही वाढ होण्याची भीती आहे. मूत्रपिंडाचे आरोग्य आणि महिलांचे आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. क्रॉनिक किडनी डिसिजमुळे दरवर्षी 6 लाखांहून अधिक महिलांचा मृत्यू होतो आणि महिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरणारे हे आठवे प्रमुख कारण आहे, ही माहिती धक्कादायक असली तरी तेच वास्तव आहे. जगभरातील सुमारे 195 दशलक्ष महिला क्रॉनिक किडनी डिसिजने ग्रस्त आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या विकारांचे प्रमाण अधिक आहे. ल्यूपस नेप्रोपॅथीसारखे किडनीचे विकार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. क्रॉनिक किडनी डिसिजची (सीकेडी) बाधा दरवर्षी तीन टक्के महिलांना होऊ शकते. ज्या महिलांमध्ये सीकेडी आढळतो त्यांच्या मुलांनाही हा आजार होण्याचा धोका असतो. गर्भावस्थेशी संबंधित तक्रारींमुळे मूत्रपिंडाचा आजार होण्याचा धोका वाढू शकतो. प्रीक्लेम्पसियाचा विकार असणार्‍या महिलांचे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका 4 ते 5 पट अधिक असतो. क्रॉनिक किडनी डिसिज म्हणजे मूत्रपिंडाचे कार्य विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी होणे. मूत्रपिंडाच्या विकारावर वेळेवर उपचार न मिळणे जीवघेणे ठरू शकते. अशा रुग्णांच्या दृष्टीने डायलिसीस किंवा मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण आवश्यक ठरते. योग्यवेळी आजाराचे निदान आणि उपचार झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे प्रारंभिक लक्षणे दिसताच मूत्रपिंडाची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे इष्ट ठरते. परंतु, हा एक 'सायलेन्ट डिसिज' मानला गेला आहे. कारण प्रारंभिक अवस्थेत लक्षणे दिसून येत नसल्यामुळे तो ओळखू येत नाही. क्रॉनिक किडनी डिसिज लवकर बरा होत नाही. या आजाराचे निदान करण्यासाठी रक्ताची आणि लघवीची तपासणी करणे आवश्यक असते. 

नियमित व्यायामाबरोबरच उघड्यावरचे पदार्थ न खाणे, सोडियमचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ टाळणे, डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज वेदनाशामक औषधे न घेणे, आरोग्यवर्धक आहार घेणे, धूम्रपान टाळणे, रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण यावर लक्ष ठेवणे या गोष्टी पाळल्यास किडनीच्या घातक विकारांपासून दूर राहता येते. उच्च रक्तदाबाचा संबंध आपण सामान्यतः हृदयविकाराशी जोडतो. परंतु, त्याचा संबंध किडनीच्या विकारांशीही असतो, हे बहुतांश लोकांना ठाऊक नसते. मठाचे प्रमाण आहारात चवीपुरतेच असणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दिवसाकाठी सामान्यतः पाच ते सहा ग्रॅम एवढेच मीठ पोटात जायला हवे. जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने मूत्रपिंडाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते. परंतु, बहुतांश लोक दैनंदिन जीवनात आवश्यक पथ्ये पाळत नाहीत. धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे डोळेझाक केली जाते. प्रोसेस्ड फूड म्हणजेच प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. धूम्रपान आणि अन्य व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनचर्या याकडे साफ डोळेझाक केली जात आहे. या सर्व गोष्टींमुळे मूत्रपिंडाचा विकार नकळत शरीरात प्रवेश करीत असून, विकाराची व्याप्ती वाढेपर्यंत तो लक्षात येत नसल्याने अनेकांचा औषधपाण्यावरील आणि उपचारांवरील खर्च आवाक्याबाहेर जात आहे. एवढे करूनही मूत्रपिंड निकामी होण्याची प्रक्रिया रोखता येईलच असे नाही. त्यामुळे आरोग्य चांगले असतानाच काही चांगल्या सवयी लावून घेणे हितावह ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news