

डॉ. मनोज कुंभार
व्हिटिलिगो हा कोणताही संसर्गजन्य आजार नसून तो एक ऑटोइम्यून डिसऑर्डर (रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित बिघाड) आहे. आपल्या त्वचेचा रंग ठरवणार्या मेलानोसाईटस् नावाच्या पेशी जेव्हा नष्ट होतात किंवा काम करणे बंद करतात, तेव्हा त्वचेवर पांढरे डाग पडू लागतात. यामध्ये रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा जळजळ जाणवत नाही; परंतु दोन रंगांच्या त्वचेमुळे लहान मुलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
सध्या ११ ते १२ वर्षांच्या मुलांमध्ये पांढरे डाग पडण्याचे प्रमाण वाढले असून यामागे चुकीची जीवनशैली आणि सदोष आहारपद्धती हे मोठे कारण असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मासे आणि दूध यांसारखे चुकीचे अन्नपदार्थ एकत्र खाणे (विरुद्ध आहार) त्वचेसाठी हानिकारक ठरते. याशिवाय अतितेलकट पदार्थ, फास्ट फूड आणि बाहेरील अन्न खाण्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. शरीरात व्हिटॅमिन बी-१२, व्हिटॅमिन डी, कॉपर (तांबे) आणि झिंक या पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यास किंवा त्वचेचा संसर्ग झाल्यास हा आजार वाढू लागतो. या आजाराची सुरुवात त्वचेवर लहान दुधाळ पांढर्या रंगाचे चट्टे पडण्याने होते. हे डाग प्रामुख्याने सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणार्या भागांवर जास्त दिसतात.
सुरुवातीला चेहरा, ओठ, डोळ्यांच्या कडा, हाताची बोटे, मनगट, कोपर, गुडघे आणि पाय या भागांवर हे डाग उमटतात. काही मुलांना सुरुवातीच्या काळात त्या भागावर सौम्य खाज किंवा त्वचा कोरडी पडल्याची भावना जाणवू शकते. यावरील उपचार प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार आणि डागांच्या प्रसारानुसार ठरवले जातात. सुरुवातीच्या टप्प्यावर आजार रोखण्यासाठी काही विशिष्ट स्टिरॉईड क्रीम्स किंवा रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करणारी औषधे दिली जातात. याशिवाय त्वचेचा मूळ रंग परत मिळवण्यासाठी ‘नॅनो-यूव्हीबी लाईट’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातो.
पांढर्या डागांची समस्या असलेल्या मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात जाताना मुलांचा चेहरा व्यवस्थित झाकून घ्यावा आणि बाहेर पडण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावावे. मुलांच्या आहारात व्हिटॅमिन बी-१२, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी युक्त पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. मानसिक ताण किंवा स्ट्रेसमुळे हा आजार वेगाने पसरू शकतो. त्यामुळे मुलांना तणावमुक्त ठेवण्यासाठी योगासने आणि सकारात्मक वातावरणाची मदत घ्यावी. डाग लपवण्यासाठी रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर करणे टाळावे, कारण त्यातील रसायने त्वचेला अधिक हानी पोहोचवू शकतात.
मुलाच्या शरीरावर असे कोणतेही डाग दिसल्यास घरगुती उपाय न करता ताबडतोब तज्ज्ञ त्वचाविकार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार केवळ स्पर्शाने किंवा सोबत राहिल्याने पसरत नाही, त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नये.