Typhoid Ulcers | समस्या टायफॉईड अल्सरची

Typhoid Ulcers |
Typhoid Ulcers | समस्या टायफॉईड अल्सरची
Published on: 
Updated on: 

डॉ. संतोष काळे

टायफॉईड हा जीवाणूसंसर्ग जगभरात विशेषतः अस्वच्छता आणि दूषित पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर आढळतो. हा आजार अनेकांना माहीत असला, तरी त्यातून उद्‌भवणार्‍या ‘टायफॉईड अल्सर’ या धोकादायक गुंतागुंतीबद्दल फारशी जागरूकता नाही.

टायफॉईड तापामुळे लहान आतड्याच्या अस्तराला पडणार्‍या क्षताला किंवा व्रणाला टायफॉईड अल्सर म्हणतात. हा आजार साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. हे जीवाणू दूषित अन्न आणि पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्था आणि रक्तप्रवाहात पसरल्यानंतर हे जीवाणू आतड्याच्या भिंतींना हानी पोहोचवतात. प्रामुख्याने लहान आतड्याच्या शेवटच्या भागात म्हणजेच इलियममध्ये हे अल्सर तयार होतात. दूषित अन्नातून शरीरात गेलेले जीवाणू रक्तप्रवाहात मिसळतात आणि संपूर्ण शरीरात संसर्ग पसरवतात. आतड्याच्या भिंतींमधील प्रतिकार यंत्रणेवर यांचा थेट परिणाम होऊन तेथे दाह आणि ऊतींचे नुकसान होते, ज्यातून अल्सर तयार होतात. कालांतराने हे व्रण खोल जातात.

या आजाराच्या सुरुवातीला तीव्र ताप, मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, अशक्तपणा आणि पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. अल्सर तयार झाल्यानंतर पोटातील वेदना तीव्र होतात, पोटात फुगीरपणा येतो आणि शौचावाटे रक्त पडणे किंवा शौचाचा रंग काळा होणे, असे प्रकार घडतात. आतड्याला छिद्र पडल्यास पोट कडक होणे, तीव्र वेदना आणि चक्कर येणे यांसारख्या गंभीर समस्या उद्‌भवू शकतात. वेळेवर निदान न होणे, अँटिबायोटिक्सचा कोर्स अपूर्ण सोडणे, अस्वच्छ परिसर आणि कमकुवत प्रतिकारशक्ती यामुळे टायफॉईड अल्सरचा धोका वाढतो. बालके आणि वृद्धांना याचा संसर्ग लवकर होऊ शकतो.

टायफॉईड अल्सरवर मुख्यत्वे अँटिबायोटिक्सद्वारे उपचार केले जातात. या औषधोपचारामुळे संसर्ग रोखण्यास आणि आतड्यांचे व्रण भरून येण्यास मदत होते. रुग्णाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर द्रवपदार्थ आणि गरज भासल्यास शिरेद्वारे सलाईन दिले जाते. आतड्याला छिद्र पडल्यास किंवा तीव्र अंतर्गत रक्तस्राव झाल्यास तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते. हा आजार टाळण्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी वापरणे, हातांची स्वच्छता, फळे आणि भाज्या स्वच्छ धुऊन खाणे आणि टायफॉईडची लस घेणे आवश्यक आहे. टायफॉईडच्या सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य उपचार घेतल्यास अल्सरसारख्या गंभीर समस्येपासून बचाव शक्य होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news