Shoulder Dislocation Problem | समस्या खांदा निखळण्याची...

Shoulder Dislocation Problem
Shoulder Dislocation Problem | समस्या खांदा निखळण्याची...
Published on
Updated on

डॉ. सम्यक पंचोली

मानवी शरीरातील सर्वात जास्त हालचाल करणारा सांधा म्हणजे खांद्याचा सांधा. या सांध्यात हाताच्या वरच्या हाडाचा (ह्यूमरस) गोलाकार भाग खांद्याच्या हाडातील (स्कॅप्युला) कपासारख्या पोकळीत बसलेला असतो. हा सांधा अत्यंत लवचिक असल्याने तो जागेवरून सुटण्याची (डिसलोकेट होण्याची) म्हणजेच निखळण्याची शक्यता अधिक असते. खांदा निखळल्यास ह्यूमरस हाड त्या कपातून बाहेर येते आणि खांदा विकृत दिसतो.

खांदा निखळल्याची शंका आल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे अत्यावश्यक आहे. योग्य उपचार घेतल्यास बहुतांश रुग्ण काही आठवड्यांत खांद्याचा पूर्ण वापर पुन्हा करू शकतात. मात्र, एकदा खांदा निखळल्यावर तो पुन्हा सुटण्याची प्रवृत्ती वाढते. विशेषतः वय जितके लहान असेल तितकी खांदा पुन्हा निखळण्याची (रिडिसलोकेशन) शक्यता अधिक असते. साधारणतः 20 व्या वर्षापर्यंत ती 85 टक्के इतकी असते.

लक्षणे कोणती?

* खांदा जागेवरून हलणे किंवा विकृत दिसणे

* सूज येणे किंवा निळसर- काळसर डाग पडणे (ब्रूझिंग)

* तीव्र वेदना जाणवणे

* हात हलवता न येणे किंवा सांधा हलवताना तीव्र वेदना होणे

* याखेरीज काही रुग्णांमध्ये हातात किंवा मानेत मुंग्या येणे, बधिरपणा किंवा अशक्तपणा जाणवतो. खांद्याभोवतालचे स्नायू आकसल्यामुळे वेदना आणखी वाढतात.

काय करावे?

खांदा निखळल्याची शंका असेल, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तोपर्यंत खांदा हलवू नका. हात ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत स्लिंग किंवा स्प्लिंटने स्थिर ठेवावा. खांदा जबरदस्तीने परत जागेवर बसवू नये. त्यामुळे हाडे, स्नायू, लिगामेंटस्, नसा किंवा रक्तवाहिन्या दुखावू शकतात. त्या भागावर बर्फाचा थंड पॅक लावल्यास सूज व वेदना कमी होतात.

खांदा निखळण्याची कारणे काय?

खांद्याचा सांधा शरीरातील सर्वाधिक डिसलोकेट होणारा सांधा आहे. कारण, त्याची हालचाल अनेक दिशांना होते. त्यामुळे खांदा पुढे, मागे किंवा खाली या तिन्ही दिशांनी निखळू शकतो. कधी पूर्णपणे, तर कधी अंशतः हाड कपातून बाहेर येते. बहुतेक वेळा खांदा पुढे (फॉरवर्ड) सटकण्याची शक्यता असते. यावेळी खांद्यातील लिगामेंटस् (हाडांना जोडणारे ऊतक) ताणले जातात किंवा फाटतात.

जोरदार धक्का बसणे किंवा खांद्याला अचानक झटका बसणे, हात अतिप्रमाणात फिरवणे यामुळे खांद्याचे हाड जागेवरून निघू शकते.

क्रिकेट, फुटबॉल, हॉकीसारख्या क्रीडा प्रकारांमध्ये किंवा जिम्नॅस्टिक्स, स्कीईंग, व्हॉलीबॉलसारख्या पडण्याची शक्यता असलेल्या खेळांमध्ये खांदा निखळण्याची समस्या सर्रास घडते. याशिवाय वाहन अपघातात खांद्यावर तीव्र धक्का बसल्यास हाड जागेवरून निघू शकते. तसेच जिना, शिडी किंवा ओल्या फरशीवरून पडताना खांदा चुकीच्या स्थितीत आपटल्यास डिसलोकेशन होऊ शकते. खांदा निखळण्याची शक्यता सर्वांनाच असते; मात्र ही दुखापत तरुण व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसते.

खांदा निखळल्याने खांद्याचे स्नायू, लिगामेंटस् आणि टेंडन्स फाटणे किंवा ताण येणे, नसा किंवा रक्तवाहिन्या दुखावणे, पुन्हा पुन्हा खांदा सुटण्याची प्रवृत्ती वाढणे या समस्या उद्भवतात. खांद्यातील लिगामेंटस्, टेंडन्स किंवा नसा गंभीररीत्या दुखावल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

खांदा सुटण्याची शक्यता कमी करण्यासाठी घरात किंवा कार्यस्थळी घसरट जागा टाळा. शिडी वापरताना काळजी घ्या. खेळताना योग्य सुरक्षात्मक गिअर वापरा. खांद्यातील स्नायू आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. लवचिकता आणि स्थैर्य वाढवणारे व्यायाम विशेषतः महत्त्वाचे आहेत. एकदा खांदा निखळल्यावर, तो पुन्हा सुटू नये म्हणून डॉक्टरांनी सांगितलेले स्ट्रेन्थनिंग आणि स्टॅबिलिटी व्यायाम नियमितपणे करणे आवश्यक असते.

एकुणातच, खांदा निखळणे ही वेदनादायक पण उपचारयोग्य अवस्था आहे. योग्य उपचार, विश्रांती आणि व्यायाम यांचा समतोल साधल्यास खांदा पुन्हा पूर्ववत कार्यक्षम होऊ शकतो. मात्र, स्वतः खांदा बसवण्याचा प्रयत्न केल्यास कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमी वैद्यकीय मदत घ्यावी.

(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news