

दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. कारण, तब्बल १४३ वर्षांपूर्वी म्हणजे २४ मार्च १८८२ या दिवशी डॉ. रॉबर्ट कॉख यांनी क्षयरोगाला कारणीभूत असणाऱ्या 'मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस' या जीवाणूचा शोध लावला होता.
क्षयरोग म्हणजे टीबी-ट्यूबरक्युलोसिस. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जगभर क्षयरोगाबाबत प्रबोधन केले जाते. जागतिक क्षयरोगदिनाचे २०२५ या वर्षीचे घोषवाक्य आहे 'Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver.' म्हणजेच -'क्षयरोग उच्चाटनासाठी गतिमान कृती व उत्तरदायित्वाची गरज' अशी संकल्पना आहे.
दरवर्षी जवळपास एक कोटी व्यक्तींना क्षयाचा संसर्ग होतो. क्षयरोगामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या अनेक लाखांत आहे. भारत, पाकिस्तान, चीन, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांत क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) क्षयरोग नियंत्रणासाठी 'क्षयरोग संपवूया' (एंड टीबी स्ट्रॅटेजी) हे अभियान राबविले आहे. यात इ.स. २०३० पर्यंत क्षयरोगाचे आणि क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटविण्याचे उद्दिष्ट आहे.
वैद्यकीय तंत्रज्ञानात नेत्रदीपक प्रगती झाली असली, तरी औषध प्रतिरोधक क्षयरोग (मल्टिड्रग रेझिस्टंट टीबी आणि एक्सटेंसिव्हली ड्रग रेझिस्टंट टीबी) या प्रकारच्या क्षयरोगांवर पूर्णतः मात करणे शक्य झाले नाही. कारण, क्षयरोगावर मात करण्यासाठी औषधोपचाराबरोबर, आहार, विहार, विश्रांती आणि निरोगी जीवनशैलीची गरज असते.
क्षयरोग हा इतिहास काळापासून अस्तित्वात असला, तरी तो अजून इतिहासजमा झालेला नाही. क्षयरोग हा मुख्यत्वेकरून फुफ्फुसाला (पल्मोनरी टीबी) होत असला, तरी नख, केस आणि दात वगळता शरीरातील कोणत्याही अवयवांना (एक्स्ट्रापल्मोनरी टीबी) होऊ शकतो. क्षयरोग हा हवेद्वारे माध्यमातून पसरणारा आजार असला, तरी तो पाण्याद्वारेसुद्धा पसरू शकतो.
एखादी क्रियाशील क्षयरोग असलेली व्यक्ती जेव्हा खोकते, शिकते, मोठ्याने बोलते किंवा गाते, तेव्हा नाका-तोंडातून बाहेर पडणारे बारीक तुषार आणि थेंब याद्वारे क्षयाचे जंतू आजूबाजूला पसरतात. जेव्हा निरोगी व्यक्ती ही हवा नाकावाटे आत घेते, तेव्हा हे जंतू फुफ्फुसात प्रवेशून क्षयरोग उद्भवतो. क्षयाचा संसर्ग अनेकदा दीर्घकाळ संपर्कातून होतो. दाटीवाटीची वस्ती, वायुविजनाचा अभाव, निकृष्ट राहणीमान असलेल्या ठिकाणी संसर्गाची शक्यता अधिक असते.
प्रत्येक नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे ओळखायला हवीत. तीन आठवड्यांहून अधिक काळ असलेला खोकला, खोकल्यातून रक्त पडणे, संध्याकाळी बारीक ताप येणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे ही क्षयरोगाची प्रमुख लक्षणे आहेत; पण बाधित अवयवांनुसार इतर लक्षणे दिसू शकतात.
मानेवर गाठी दिसणे, डोके दुखणे, छातीत दुखणे, पाठ दुखणे, जुलाब होणे इ. क्षयरोगाचा एक प्रकार सहजपणे व्यक्त होत नाही. त्याची कोणतीही लक्षणे नसतात. त्याला लपलेला क्षयरोग (Latent TB) असे म्हणतात. काही कारणांमुळे जेव्हा रोगप्रतिकारक्षमता कमी होते, तेव्हा हा क्षयरोग व्यक्त होतो.
जसे की मधुमेह, एच. आय. व्ही. एड्स किंवा कर्करोगासारखा आजार. क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी जागतिक स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू असले, तरी गरिबी, अज्ञान, बेरोजगारी, प्रचंड लोकसंख्येमुळे निकृष्ट दर्जाचे राहणीमान, आरोग्याच्या मूलभूत सुविधांची वानवा, सकस आहाराची कमतरता, तंबाखू-दारू यासारखी व्यसनाधीनता अशा कारणांमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि क्षयरोगाला आमंत्रण मिळते.
अनेक जण आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे क्षयरोगाचे निदान उशिरा होते. क्षयरोगावरील औषधांच्या अयोग्य, अपुऱ्या किंवा अनियमित वापरामुळे एखाद्या व्यक्तीचा क्षयरोग वेळेत आणि संपूर्ण बरा होत नाहीच शिवाय अशा व्यक्तीमध्ये औषधाला दाद न देणारा क्षयरोग निर्माण होऊ शकतो.
आज क्षयरोगाचे जलद निदान करण्यासाठी जीन एक्स्पर्ट आणि टू नेटसारखी तंत्रे उपलब्ध झाली आहेत. यामुळे औषध-प्रतिरोधक क्षयरोगाची माहिती त्वरित मिळते आणि लगेच उपचार सुरू करता येतात. या सर्व गोष्टी सर्वांनी समजून घेतल्या, तर क्षयरोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो.