अल्सर आणि जीवनशैली | पुढारी

Published on

डॉ. प्राजक्‍ता पाटील

पचनसंस्थेशी निगडित अवयवांमध्ये जखमा झाल्यास त्याला अल्सर असे म्हटले जाते. अल्सर होण्याची अनेक कारणे असू शकतात; पण त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. अयोग्य जीवनशैली असणे. अल्सरकडे विशेष लक्ष न दिल्यास परिस्थिती बिघडू शकते. अल्सरपासून बचाव करण्यासाठी आपली जीवनशेली उत्तम राखणे आणि आहाराकडे संपूर्ण लक्ष दिले पाहिजे. 

पोटातील पचनसंस्थेच्या अंतर्गत अवयवांना म्यूकस किंवा चिकट पदार्थाचे पातळ आवरण असते. त्यामुळे अवयवांच्या आतल्या भागाला आम्ल आणि पेप्सिनसारखी एन्झाईम्स आणि हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडच्या दुप्षपरिणामांपासून वाचवते. हे अ‍ॅसिड शरीराच्या उतींसाठी जास्त हानीकारक असते. मात्र, पचनासाठी आवश्यकही असतात. अ‍ॅसिड आणि म्युकस यांच्यामध्ये एक उत्तम संतुलन असते ते जेव्हा बिघडते तेव्हा पोटात अल्सरची निर्मिती होते. सर्वसाधारणपणे हा अल्सर इसोफेगस, पोट आणि छोट्या आतड्याच्या वरच्या बाजूला होतो. 

पेप्टिक अल्सर : पेप्टिक अल्सर म्हणजे पचनसंस्थेशी निगडित अवयवांमध्ये होणार्‍या जखमा असतात. या अल्सरचा विकास कोणत्या जागी होतो त्या आधारावर त्याचे तीन प्रकार असतात. पहिला गॅस्ट्रिक अल्सर जो पोटात विकसित होतो. दुसरा आहे इसोफेगियल अल्सर हा अन्‍ननलिकेत होतो. अन्‍ननलिकेतील अल्सरचे प्रमाण कमी आहे. तिसरा अल्सर आहे ड्योडेनल जो छोट्या आतड्याच्या वरच्या भागात होतो. ड्युडेनम अल्सर पोटाच्या म्हणजे गॅस्टिक अल्सरपेक्षा सामान्य स्वरुपाचा असतो. 

प्रमुख लक्षणे : पोटदुखी होणे, पोट रिकामे असेल तेव्हा या वेदनांची तीव्रता अधिक वाढते. किंवा पोटातील आम्ल, अल्सरग्रस्त क्षेत्राच्या संपर्कात येते तेव्हा वेदना वाढतात. 

रात्री पोटात आग पडल्याची भावना निर्माण होते. त्याशिवाय अगदीच तुरळक प्रकारात पुढील काही लक्षणे दिसून येतात. 

 रक्‍ताची उलटी होणे   शौचाचा रंग गडद होणे  मळमळणे किंवा उल्टी होणे  वजन वेगाने घटणे  भूकेमध्ये बदल होणे

धोक्याचे घटक

हेलिकोबॅक्टर पायरोली जीवाणूंचा संसर्ग तणाव अनुवांशिक कारण अत्याधिक प्रमाणात पोटातील आम्ल स्रवणे  अतितेलकट आणि मसालेदार आहाराचे अधिक सेवन  अतिप्रमाणात दारू, कॅफिन आणि तंबाखूचे सेवन  ऑस्टियोपोरोसिसच्या उपचारासाठी घेतली जाणारी औषधे  वेदनाशामक गोळ्याचे सतत सेवन, अ‍ॅस्पिरिन आणि अँटिअ‍ॅसिडिक गोळ्यांचे सेवन  मधुमेह

या गोष्टी करा सेवन :

आहारावर नियंत्रण ठेवल्यास पेप्टिक अल्सरची लक्षणे कमी करता येतात शिवाय पेप्टिक अल्सरला प्रतिबंध करता येतो. केळामध्ये जीवाणूप्रतिबंधक घटक असतात. त्यामुळे पोटाच्या अल्सरचा विकास हळूहळू होतो. त्यामुळे न्याहारीनंतर रोज एक केळ खावे.   कोबीमध्ये इस्मेथाईलमेथियोनिन असते ज्याला यू जीवनसत्त्व असेही म्हटले जाते. यामुळे अल्सरला अटकाव होतोच; पण जखमही लवकर भरून निघते.   न्याहारीच्या आधी एक चमचा मधाचे सेवन करावे. मध जीवाणूंशी लढते आणि शरीरातील पाणी कमी होण्यापासून वाचवते आणि शरीरात ओलावा टिकवून ठेवते. उती क्षतिग्रस्त होण्यापासून वाचवते आणि नव्या उतकांच्या विकसित होण्याची प्रक्रियेला वेग देते.  कोबीमध्ये सल्फोराफैन असते. पचनमार्गातील जीवाणू नष्ट करण्यास मदत करते.   आपल्या रोजच्या आहारात एक ते दोन पाकळ्या लसणाच्या असाव्यात त्यामध्ये अल्सर विरोधी गुण आहेत.  दह्यात चांगले जीवाणू असतात. त्यामुळे एच. पायलोरी या जीवाणूचा विकास रोखला जातो आणि अल्सरच्या जखमा भरून निघण्यास मदत होते. 

पथ्ये

अल्सरपासून बचाव करण्यासाठी काही खाद्यपदार्थांचे पथ्य पाळले पाहिजेत किंवा ते खाणे वर्ज्य केले पाहिजेत.   कॅफिन आणि कार्बोहायड्रेटेड पेय – चहा, कॉफी आणि सोडा यांचे सेवन करू नये. कारण त्यामुळे आम्लाची निर्मिती वाढते. त्यामुळे अल्सरची लक्षणे अधिक गंभीर होतात.  तेलकट मसालेदार पदार्थ : अतितेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. कारण त्यामुळे आम्लाच्या निर्मितीला चालना मिळते. आणि पोटाच्या अल्सरशी निगडित इतर काही लक्षणे वाढतात.   आम्लयुक्‍त पदार्थ : ज्या पदार्थांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते त्याचे सेवन केल्यास पोटाचा अल्सर असलेल्या लोकांना अधिक त्रास होतो. सायट्रिक अ‍ॅसिड लिंबू, संत्रे, मोसंबी, द्राक्षे, अननस, फळांचे रस, जॅम आणि जेलीमध्ये होते. या फळांचे सेवन अल्सरच्या व्यक्‍तीने करू नये.   लाल मांस, मैद्याचे पदार्थ, पांढरा ब्रेड, साखर, पास्ता आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन अत्यल्प प्रमाणात करावे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news