

डॉ. संजय गायकवाड
तुमच्या शरीरावरील तीळ किंवा डागांमध्ये एखादा असा तीळ आहे का, जो इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि विचित्र दिसतो? यालाच ‘अग्ली डकलिंग’ संकेत म्हणतात.
1998 मध्ये जीन-जॅक ग्रोब आणि रेमी बोनेरांडी यांनी आपल्या संशोधनात अग्ली डकलिंग या संज्ञेचा प्रथम वापर केला. मेलानोमासारख्या घातक त्वचेच्या कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो.
साधारणपणे शरीरावरील सर्व तीळ हे रंग, आकार आणि पोत यांबाबत एकमेकांशी मिळतेजुळते असतात. त्यांचा आकार सहसा 6 मिलिमीटरपेक्षा कमी असतो आणि कडा गुळगुळीत असतात. मात्र, ‘अग्ली डकलिंग’ हा या सुसंगतीला तडा देतो. तो इतर तिळांच्या तुलनेत अचानक मोठा होऊ शकतो. त्याचा रंग पांढरट किंवा गडद होऊ शकतो. त्यातून रक्त येऊ शकते किंवा तो इतरांसारखा सपाट न राहता खडबडीत होऊ शकतो. तुमच्या त्वचेवर एखादा एकटाच तीळ असेल आणि त्याच्या आसपास दुसरे कोणतेही तीळ नसतील, तरीही त्याचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे.
या साध्या वाटणार्या खुणेला भक्कम वैज्ञानिक आधार आहे. 2008 मध्ये ‘जामा डर्मेटोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, तज्ज्ञांनी आणि सामान्य कर्मचार्यांनी केलेल्या निरीक्षणात 90 ते 100 टक्के वेळा मेलानोमा ओळखण्यात यश आले. 2017 मधील ‘जर्नल ऑफ द अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी’मधील एका संशोधनात असे दिसून आले की, नऊ त्वचारोग तज्ज्ञांनी सर्व मेलानोमा केवळ ‘अग्ली डकलिंग’ संकेताद्वारे अचूकपणे ओळखले. यामुळे विनाकारण केल्या जाणार्या बायोप्सीचे प्रमाणही सात पटीने कमी झाले आहे. 2015 च्या एका शोधनिबंधानुसार, या पद्धतीचा वापर केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातील मेलानोमा शोधण्याची अचूकता 88 टक्क्यांपर्यंत पोहोचते.
मेलानोमा हा त्वचेचा कर्करोग वेगाने पसरता; परंतु पहिल्या टप्प्यात त्याचे निदान झाल्यास पाच वर्षांनंतर जगण्याचे प्रमाण 99 टक्के इतके जास्त असते. ज्यांच्या शरीरावर खूप जास्त तीळ आहेत, ज्यांची त्वचा उन्हामुळे खराब झाली आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास आहे, अशा लोकांसाठी ही पद्धत जीवनरक्षक ठरू शकते. ‘स्किन कॅन्सर फाऊंडेशन’ने देखील आता या खुणेचा समावेश आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केला आहे.
महिन्यातून एकदा आरशासमोर उभे राहून पुरेशा प्रकाशात आपल्या शरीराचे निरीक्षण करा. हातापायांवर किंवा पाठीवर असलेल्या तिळांचे स्मार्ट फोनच्या मदतीने फोटो काढून ठेवा, जेणेकरून काळानुसार होणारे बदल टिपता येतील. काही आठवड्यांत एखाद्या तिळाचा आकार किंवा रंग बदलत असेल, तर त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
दररोज किमान 30 एस.पी.एफ.असलेले सनस्क्रीन वापरा, सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उन्हात जाणे टाळा आणि पूर्ण कपडे घाला.
लक्षात ठेवा, तुमच्या त्वचेवर दिसणारा एखादा वेगळा तीळ हे केवळ सौंदर्याचे लक्षण नसून ते तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटाही असू शकते.