

डॉ. भारत लुणावत
थायलंडमध्ये झालेल्या एका अभ्यासाने याच प्रश्नाचे उत्तर शास्त्रीय पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यातील निष्कर्ष केवळ आश्चर्यकारक ठरले. फंक्शनल डिस्पेप्सिया हा पोटाच्या वरच्या भागातील वेदना, जळजळ, पोट भरल्यासारखे वाटणे आणि थोडेसे खाल्ल्यावरही तृप्ती येणे, अशा लक्षणांनी ओळखला जाणारा त्रास आहे. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे तपासण्या अनेकदा पूर्णपणे नॉर्मल येतात.
अल्सर, संसर्ग किंवा स्पष्ट इजा दिसत नाही. त्यामुळे उपचार करणे अवघड ठरते. अशा रुग्णांना साधारणपणे आम्लनिर्मिती कमी करणारी औषधे, म्हणजेच ओमेप्राझोलसारखी प्रोटॉन पंप इनहिबिटर औषधे दिली जातात. अनेकांना त्याचा फायदा होतो, पण काही रुग्णांमध्ये आम्ल नियंत्रणात असूनही वेदना कायम राहतात. याच मर्यादेमुळे संशोधकांनी हळदीतील सक्रिय घटक कर्क्युमिनकडे लक्ष वळवले.
या अभ्यासातील महत्त्वाचा निष्कर्ष असा की, केवळ कर्क्युमिन घेतलेल्या रुग्णांमध्ये लक्षणांतील सुधारणा जवळजवळ ओमेप्राझोलइतकीच होती. दोन्ही औषधे एकत्र दिल्याने वेगळा किंवा अधिक फायदा झाला नाही. साध्या शब्दांत सांगायचे तर, हळदीतील कर्क्युमिनला आम्ल कमी करणार्या औषधांच्या मदतीशिवायही अपेक्षित परिणाम साधता आले. याचा अर्थ, ठरावीक प्रमाणात आणि मर्यादित कालावधीसाठी वापरलेले कर्क्युमिन सुरक्षित असल्याचे दिसून आले. मात्र, येथे वापरलेली हळद म्हणजे स्वयंपाकघरातील कच्ची हळद नव्हे, तर नियंत्रित मात्रेतील कर्क्युमिन कॅप्सूल होती, हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.