

डॉ. भारत लुणावत
तणाव कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि वायू प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर पडणारा ताण कमी करणे अशा अनेक फायद्यांमुळे तुळशीला विशेष स्थान मिळाले आहे.
तुळस तणावावर नियंत्रण ठेवते, फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते, पचनास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास साहाय्य करते. तुळस पाण्यात जंतूनाशक, विषाणूनाशक आणि बुरशीरोधक गुणधर्म असतात. तिच्या अँटिऑक्सिडंट आणि रोगप्रतिकारक यंत्रणा संतुलित ठेवणार्या गुणांमुळे ती शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते. नियमित तुळशीचे पाणी घेतल्याने शरीराची नैसर्गिक बचावशक्ती सुधारते आणि विविध आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते. तिचे ब्रॉन्को-प्रोटेक्टिव गुण श्वसनमार्गांचे संरक्षण करतात आणि घशातील खवखवीतून आराम मिळवून देतात.
तुळस सहज उपलब्ध असल्यामुळे थंडीच्या काळात अनेक जण ताजी तुळशीची पाने घेऊन चहा बनवतात. पण, घरातील तुळस आणि जंगलातील तुळस यात फरक असतो. घरातील तुळस कोणत्या पाण्याने वाढवली आहे, हे आपल्याला ठावूक असते. त्यामुळे पाने नीट धुऊन घेतल्यावर ती सुरक्षितरीत्या वापरता येते. मीठाच्या पाण्यात तुळशीची पाने धुतल्यास त्यावरील धूळ आणि सूक्ष्मकण निघून जातात. परंतु, जंगलातील तुळशीबाबत ही खात्री नसते की, तिच्या मुळांना कोणत्या प्रकारचे पाणी मिळाले आहे. त्यामुळे बरेचदा तिच्या सेवनाने पचनसंस्थेत जंतू जाऊन त्रास होऊ शकतो. यावर उपाय घरामध्ये भरपूर तुळस लावावी. तुळशीचे पाणी तयार करणे अतिशय सोपे आहे. दोन ते तीन तुळशीची पाने 300 मिली पाण्यात 5 ते 10 मिनिटे उकळा, नंतर पाने गाळून टाका. तयार झालेले पाणी थेट पिऊ शकता. अधिक अर्कासाठी साधारण 50 ग्रॅम तुळशींसाठी 400 मिली पाणी वापरले जाते. तुळशीचे पाणी रिकाम्या पोटी घेणे अधिक फायदेशीर असते.
लक्षात ठेवा, तुळशीचे अतिसेवन त्रासदायकही ठरू शकते. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पोटातील दुखणे, रक्त पातळ होणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. विशेषत: जे लोक ब्लड थिनर्स घेतात किंवा विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या औषधांवर असतात, त्यांनी तुळशीचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. घरगुती तुळस वापरावी, पाने नीट धुवून उकळावीत आणि योग्य प्रमाणात पाणी वापरावे, म्हणजे तिचे औषधी गुणधर्म योग्यरीत्या मिळतात.