तंबाखू आणि फुफ्फुसाचे आरोग्य | पुढारी

Published on

डॉ. अनिल मडके

'तंबाखू खाणे हे आरोग्यास हानिकारक आहे' , 'सिगारेट ओढणे हे आरोग्यास हानिकारक आहे', असा वैधानिक इशारा सर्वप्रकारच्या तंबाखूच्या पाकिटांवर, तसेच तंबाखूच्या, सिगारेटच्या आणि बिडी पाकिटावर स्पष्टपणे लिहिला असतानादेखील, आजही अनेकजण तंबाखूच्या आणि बिडी, सिगारेटच्या आहारी जाताना दिसतात.

वयाच्या अठराव्या वर्षापूर्वी तंबाखू, सिगारेटचे व्यसन लागण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. तंबाखू, सिगारेटचा वापर करणार्‍यांपैकी जवळपास 25 टक्क्यांहून अधिक व्यक्ती या 18 ते 24 वयोगटातील असून, त्यांनी यापूर्वी एकदाही तंबाखू, सिगारेटचा वापर केला नसल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. 

31 मे हा 'जागतिक तंबाखूविरोधी दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्ताने दरवर्षी एक घोषवाक्य जाहीर केले जाते. यावर्षीचे घोषवाक्य आहे, 'तंबाखू आणि फुफ्फुसाचे आरोग्य', तंबाखूचा परिणाम प्रत्येक पेशीवर होतो. आपल्या श्‍वासनलिका आणि फुफ्फुसाच्या पेशी यावरदेखील तंबाखूचा विशेषतः धूम्रपानाचा म्हणजे सिगारेटच्या धुराचा मोठा दुष्परिणाम होतो. 

हवेतील प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन आत घेणे आणि तो शरीरातल्या सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी रक्तामध्ये मिसळवणे आणि सर्व पेशींकडून आलेला कार्बनडाय ऑक्साईड रक्तवाहिन्यांतून परत घेणे आणि तो वातावरणात सोडणे, हे महत्त्वाचे काम आपली श्‍वसनसंस्था करत असते. हे काम करण्यासाठी श्‍वासनलिका आणि वायुकोश यांच्या विविध प्रकारच्या पेशींची मदत होत असते. आपल्या श्‍वासनलिकांवर विशिष्ट प्रकारच्या पेशींचे आवरण असते. यात केसांसारख्या 'सिलिया' नावाच्या पेशी असतात. त्यांची सातत्याने हालचाल होत असते. हवेतून एखादा नको असलेला घटक जर श्‍वासनलिकेत आला, तर तो बाहेर फेकण्याचे काम या सिलिया नावाच्या पेशी करत असतात. तसेच श्‍वासनलिकांमधील विशिष्ट प्रकारच्या पेशी एकप्रकारचा स्राव श्‍वासनलिकेच्या आत सोडत असतात.

हा स्राव बाहेरून आगंतुकपणे आलेला घटक बाहेर टाकण्यासाठी सिलिया नावाच्या पेशींना मदत करत असतो. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात, त्या व्यक्तींमध्ये तंबाखूच्या धुराचा परिणाम या सिलिया पेशींवर होतो. तसेच स्राव स्रवणार्‍या पेशींवरदेखील होतो आणि मग त्यांची कार्यक्षमता कमी होते. दीर्घकाळ सुरू असलेल्या धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या या पेशी हळूहळू कमकुवत होत जातात. तसेच अशा काम करणार्‍या पेशींची संख्या कमी होत जाते. याचा परिणाम म्हणून श्‍वासनलिकांचा दाह होतो. त्याला 'क्रॉनिक ब्रॉकायटिस' असे म्हणतात. अशा लोकांना वारंवार खोकला येणे तसेच कफ येणे हा त्रास होतो. रात्रभर श्‍वासनलिकांच्या आत साचलेला कफ सकाळी उठल्यानंतर बाहेर काढण्यासाठी धूम्रपान करणार्‍या व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर खोकू लागतात. याला 'स्मोकर्स कफ' असे म्हणतात. धूम्रपानाचे परिणाम वायुकोशांवरदेखील होतो. वायुकोश कमकुवत होतात. वायुकोशांची आकुंचन-प्रसरण क्षमता प्रकर्षाने कमी होते. अनेकदा दीर्घकालीन धूम्रपानामुळे वायुकोश निकामी होतात आणि एम्फयझिमा नावाचा विकार जडतो. या विकारामध्ये वायुकोशातील प्राणवायू रक्तवाहिन्यात मिसळणे आणि रक्तवाहिन्यातील कार्बनडाय ऑक्साईड परत येणे ही प्रक्रिया मंदावते. दीर्घकालीन तंबाखू, बिडी आणि सिगारेटच्या वापरामुळे श्‍वासनलिका तसेच फुफ्फुसावर मोठा दुष्परिणाम होतो आणि सीओपीडी नावाचा विकार होतो. सीओपीडी म्हणजे 'क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज'. याचा अर्थ श्‍वासनलिकांचा अडथळा आणणारा, 'श्‍वासनलिकांचा आणि फुफ्फुसाचा दीर्घकालीन विकार'. या विकारात रुग्णाला वारंवार खोकला येतो, दम लागतो आणि दिवसागणिक याची तीव्रता वाढत जाते.

वातावरणात बदल झाला किंवा फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग झाला, तर अशा रुग्णांमध्ये खोेकलाही वाढतो आणि कफाचे प्रमाण वाढते. बर्‍याचदा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. अशावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंचे आक्रमण फुफ्फुसावर होते आणि त्याचा परिणाम म्हणून न्यूमोनिया होतो. अशा रुग्णाला तातडीने उपचार मिळाले तर त्याचा फायदा होतो; अन्यथा काट्याचा नायटा होतो. हॉस्पिटलमध्ये दाखल करूनदेखील अनेकदा हे जंतू उपचाराला दाद देत नाहीत. शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते. काही वेळा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. ही वेळ टाळायची असेल तर धूम्रपानावर आळा घालायला हवा. 

ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास असतो, अशा व्यक्ती जर तंबाखू  किंवा सिगारेट ओढत असतील, तर त्यांना दम्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वर नमूद केलेल्या धूम्रपानाच्या दुष्परिणामांमुळे श्‍वासनलिकांची आणि एकंदर फुफ्फुसाची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे श्‍वासनलिकांच्या आकुंचन-प्रसरणावर त्याचा परिणाम झालेला असतो. त्यामुळे दम्याचा त्रास हा दिवसागणिक वाढत जाऊ शकतो. दम्याचा अ‍ॅटॅक आल्यानंतर तो आटोक्यात येण्यामध्ये धूम्रपानाचा अडथळा निर्माण होतो. विविध प्रकारच्या प्रतिजैविकांना अशा व्यक्तींमध्ये प्रतिसाद मिळत नाही. तंबाखू, बिडी, सिगारेटमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे अशा व्यक्तींमध्ये क्षयरोगासारख्या विकारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसते. 

तंबाखूच्या धुरामुळे चार हजारहून अधिक धोकादायक घटक असतात. यापैकी अनेक घटकांमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. तंबाखूमुळे तोंडाचा, जिभेचा, गालाचा, घशाचा, अन्ननलिकेचा कॅन्सर होतो, हे सर्वांना माहीत आहे; पण तंबाखूचा परिणाम हा शरीरातील जवळपास प्रत्येक पेशीवर होतो. तंबाखू, मावा, गुटखा, पान, तंबाखू, चुना-तंबाखू, बिडी, सिगारेट, गांजा, चिलीम, हुक्का तसेच तंबाखूची मिश्री, तंबाखूची पेस्ट, तपकीर अशा अनेक प्रकारे तंबाखूचा वापर आपल्याकडे होताना दिसतो; पण तंबाखूतील या घटकांचा परिणाम आपण लक्षात घेत नाही. तंबाखूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. तंबाखूतील निकोटिन नावाचा घटक हा सर्वाधिक महत्त्वाचा समजला जातो; कारण या निकोटिनमुळे तंबाखूचे व्यसन लागते. तंबाखू, बिडी किंवा सिगारेटचा वापर वारंवार करावा, अशी इच्छा निर्माण करणारा घटक म्हणजे निकोटिन. निकोटिनचे तंबाखूतील प्रमाण जितके अधिक, तितके त्याचे व्यसन लागण्याची शक्यता अधिक. युवावर्गातील सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सुरुवातीला गंमत म्हणून किंवा विरंगुळा म्हणून तंबाखूची, माव्याची, गुटख्याची चिमूट तोंडात ठेवणे किंवा सिगारेटचा एखादा झुरका घेणे हे आयुष्यभरासाठी खूप महाग पडू शकते. तंबाखूमुळे कॅन्सर होतो. तंबाखूमुळे होणार्‍या कॅन्सरमधून आपली सुटका केवळ मृत्यूच करू शकतो. अजूनही तंबाखूमुळे होणार्‍या कॅन्सरवर जालीम उपचार नाही. त्यामुळे कॅन्सर म्हणजे मृत्यू हे तंबाखू, सिगारेट वापरणार्‍या व्यक्तीने वेळीच लक्षात घ्यायला हवे. 

तंबाखूमध्ये अमोनिया नावाचा पदार्थ असतो, जो आपण टॉयलेट साफ करण्यासाठी वापरतो. तंबाखूत इथेनॉल म्हणजे अल्कोेहोल या दारूचा समावेश असतो. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल; पण डीडीटी या जंतुनाशकाचा काही अंश तंबाखूमध्ये असतो. मुंग्या मारण्यासाठी वापरले जाणारे आसेंनिक हे तंबाखूत असते. विनेगरमध्ये असणारे ऍसिटिक अ‍ॅसिड तंबाखूत असते. वाहनातून बाहेर टाकणार्‍या धुरामध्ये असणारे अनेक घटक सिगारेटच्या धुरात असतात. कार्बन मोनॉक्साईड नावाचा त्यातील महत्त्वाचा धोकादायक घटक. आपण हवेतून प्राणवायू घेतो तो फुफ्फुसातून सर्व रक्तवाहिन्यांमध्ये जातो आणि सर्व शरीरभर सर्व पेशींकडे पाठविला जातो. फुफ्फुसातील प्राणवायू रक्तवाहिन्यांद्वारे सर्व पेशींपर्यंत पोहोचविण्याचे काम हिमोग्लोबीन करते. प्राणवायू हा हिमोग्लोबीनला चिकटतो आणि मग तो पेशींपर्यंत जातो. कार्बन मोनॉक्साईड हा या अर्थाने प्राणवायूचा प्रतिस्पर्धी असतो. हिमोग्लोबीनला चिकटण्याची कार्बन मोनॉक्साईडची क्षमता ही प्राणवायूच्या 240 पट इतकी असते. त्यामुळे धूम्रपानातून आत घेतलेला कार्बन मोनॉक्साईड हा प्राणवायूला अडथळा आणतो. याचा अर्थ कार्बन मोनॉक्साईडमुळे आपण हवेत असलेला प्राणवायू पुरेशा क्षमतेने आत घेऊ शकत नाही. याचा परिणाम सर्व शरीरावर होतो. तंबाखूच्या धुरामध्ये हायड्रोजन सायनाईड नावाचे विष असते, तसेच बॅटरीमध्ये वापरले जाणारे कॅडमियमदेखील तंबाखूच्या धुरात असते. ही वानगीदाखल सांगितलेली नावे. आपण बिडी, सिगारेट ओढताना कोणत्या प्रकारचे विष शरीरात घेतो, याचा विचार करण्याची गरज आहे. या विविध प्रकारच्या घटकांमुळे मोठे दुष्परिणाम केवळ फुफ्फुसांवर नव्हे, तर सर्व शरीरभर, सर्व शरीरावर होतात. म्हणून आपण वेळीच जागे व्हायला हवे. 

धूम्रपानाचा परिणाम हा रक्तवाहिन्यांवर होतो, पेशींवर होतो. रक्तामध्ये गुठळी होण्याची प्रक्रिया तंबाखूमुळे, धुम्रपानामुळे वाढते. रक्तवाहिन्या कठीण होण्याची प्रक्रिया तंबाखू आणि धूम्रपानामुळे वाढते. तंबाखूमुळे पित्त विकाराच्या शक्यता वाढतात. तंबाखू, धूम्रपानामुळे नपुंसकत्व येण्याची शक्यता असते. मेंदूमध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि अर्धांगवायू येण्याची शक्यता असते. 

तंबाखू, बिडी, सिगारेट ही धोकादायक असते, हे अनेकदा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचत असते; पण आपण जागे होत नाही. आज-काल तरुण मुला-मुलींमध्ये, महाविद्यालयीन आणि काही ठिकाणी विद्यालयीन मुलांमध्ये तंबाखूचे, धूम्रपानाचे व्यसन वाढत असताना दिसते. या मुलांमध्ये ई-सिगारेटची चटक वाढताना दिसत आहे. खरे तर ई-सिगारेट ही काही धोकाविरहित गोष्ट नाही. धूम्रपानाचा जितका धोका, जवळपास तितकाच धोका ई-सिगारेटचा असतो. सिगारेटमध्ये एकप्रकारचा द्रव असतो, ज्यातून एरोसोल श्‍वासनलिकेत घेतले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून तंबाखूतील वेगवेगळे घटक घेतले जातात. त्याचे दुष्परिणाम होतातच त्यामुळे सिगारेट धोकादायक नाही हे डोक्यातून काढून टाकावे. अतिप्रमाणात धूम्रपान करणार्‍यांना धूम्रपान बंद करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात सिगारेटचा वापर होतो; पण याचा अर्थ ती धोकादायक नाही असा होत नाही. सिगारेट ही टाळायला हवी. 

तंबाखू, बिडी, सिगारेटचे व्यसन एकदा वाढले की, ते सोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न करण्यासाठी काही वेळा औषधोपचारांचा उपयोग करावा लागतो. बिडी, सिगारेट, तंबाखूचा परिणाम सर्व शरीरावर होऊन दीर्घकालीन श्‍वसन विकार होण्याअगोदर तसेच कॅन्सररूपी यमदूत दारात उभा राहण्याआधी तंबाखू सोडा, सिगारेट सोडा. 

जे लोक बिडी, सिगारेट ओढतात त्यांना तर या वेगळ्या प्रकारच्या आजारांचा धोका असतोच; पण त्यांच्या सान्निध्यात राहणार्‍या निष्पाप निरपराध लोकांनादेखील या आजारांचा प्रसाद मिळू शकतो. विशेषतः, धूम्रपान करणार्‍या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच त्यांच्या कार्यालयातील निकटचे सहकारी यांना या धूम्रपानाचा प्रसाद मिळू शकतो. म्हणजेच धूम्रपानाचा धोका धूम्रपान करणार्‍या व्यक्तीला जितका असतो, जवळपास तितकाच धोका त्यांच्या निकट वावरणार्‍या सर्वांना असतो, हे इथे लक्षात घ्यायला हवे. याला 'सेकंड हँड स्मोकिंग' असे म्हणतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कुणी बिडी, सिगारेट ओढत असतील, तर त्यांना वेळीच थांबवा. त्यांच्या व्यसनाचा धोका हा तुम्हाला आहे आणि तुमचा कोणताही दोष नसताना तुम्हाला कॅन्सरसारख्या विकाराला सामोरे जावे लागू शकते. 

उद्याच्या 31 मे या तंबाखूविरोधी दिनानिमित्त एवढे जरी लक्षात घेतले, तरी तंबाखूविरोधी दिन साजरा झाला, असे म्हणावे लागेेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news