

आपला आहार योग्य असेल, तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी औषध किंवा अन्य उपाय करण्याची गरज नाही. कोणताही आहार जो आरोग्यदायी आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरतो.
वातावरणात अनेक जीवाणू आणि विषाणू आपल्या श्वासाबरोबर रोज शरीरात प्रवेश करत असतात; पण त्यामुळे आपले काही नुकसान होत नाही. का? तर आपली रोगप्रतिकारशक्ती त्यांच्याशी लढत असते. पण, जेव्हा या बाह्य जीवाणूंची ताकद वाढते तेव्हा ते आपल्या प्रतिकारकशक्तीवर मात करतात. परिणामी, आपण सर्दी, खोकला आणि अगदी जास्तच प्रमाणात जीवांणूचा हल्ला झाला तर कधी कधी ताप किंवा फ्लूसुद्धा होतो. सर्दी, खोकला होणे यातून आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याचा संकेत आहे.
1. आहार ः रोगप्रतिकारक शक्तीच्या बाबतीत सर्वात विशेष बाब म्हणजे या शक्तीची निर्मिती शरीर स्वत:च करते. एखादी गोष्ट आपण खाल्ली आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढली असे होत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी जो आहार योग्य आहे, तो घेतला पाहिजे. आपला आहार योग्य असेल तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी औषध किंवा अन्य उपाय करण्याची गरज नाही. कोणताही आहार जो आरोग्यदायी आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरतो. ज्यामुळे शरीरातील आम्ल वाढते, असा आहार नुकसानकारक आहे. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर जर तो पचला नाही, तर शरीरात आम्ल वाढते आणि त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. आहार घेताना एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्या भोवतालच्या वातावरणाशी अनुरूप असाच आहार घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, थंडीच्या दिवसांत आईस्क्रीम खाणे टाळले पाहिजे.
ज्या लोकांच्या आहाराच्या सवयी विचित्र किंवा चुकीच्या आहेत, त्यांच्यासाठी बाजारात फूड सप्लिमेंटस आहेत. म्हणजे जे लोक सॅलड खात नाहीत, वेळेवर जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, अशा लोकांना आपल्या शरीरातील कमतरता दूर करण्यासाठी या फूड सप्लिमेंटची गरज पडते. जी व्यक्ती सॅलड, हिरव्या भाज्या, डाळी यांनी युक्त परिपूर्ण असा आहार घेते, त्याला अशा प्रकारच्या सप्लिमेंटची गरज आही. याबाबत एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे या सप्लिमेंटसमध्ये शरीराला आवश्यक ती सर्व जीवनसत्त्वे असतातच, असा दावा कुणी करू शकत नाही. म्हणूनच आरोग्यदायी परिपूर्ण आहार हाच यावर एक योग्य उपाय आहे. प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड अन्न शक्यतो टाळावे. ज्या पदार्थांत प्रिझर्व्हेटिव्ह असतील, असे पदार्थ खाण्याचे टाळणे सर्वात चांगले.व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटिन्समुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. म्हणूनच आहारात मोसंबी, संत्रे किंवा लिंबाचा समावेश असावा. झिंकमुळेही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सीफूडमध्ये झिंक भरपूर प्रमाणात आढळते. त्याचबरोबर सुका मेवा हाही झिंकचा मोठा स्रोत आहे.
फळे आणि हिरव्या भाज्या भरपूर खा. आहारात चुकीचे मिश्रण होऊ देऊ नका. म्हणजे जर दही खात असाल, तर त्याच्याबरोबर मांसाहार किंवा आंबट पदार्थ खाऊ नका.आहारात लोणच्याचा वापर कमी करा. आंबट पदार्थांमुळे शरीरात असंतुलन निर्माण होते. थंडीत शरीर जास्त उघडे ठेवू नका. कारण तसे झाले तर शरीराला पुन्हा गरम करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
कोणत्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी हलका आहार घ्या; अन्यथा जड आहार पचवण्यासाठी शरीराच्या पचनक्रियेतील यंत्रणेवर मोठा ताण येतो. जास्त तणाव घेऊ नका. काही लोकांमध्ये आंतरिक सामर्थ्य नसते. अशावेळी त्यांच्या मनावर जर ताण असेल, तर त्यांची रोगप्रतिकारकशक्तीही एकदम कमी होते. अशा लोकांना वारंवार व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.बंद खोली किंवा बंद जागेत फार वेळ थांबू नका. ज्या ठिकाणी अनेक लोक श्वासोच्छ्वास करत असतील, तर तेथे संसर्गाची लागणही लगेच होईल. मोकळ्या हवेत येऊन दीर्घ श्वास घ्या. व्यसनाधिनता ही रोगप्रतिकारकशक्तीसाठी मारक आहे, याचा विसर पडू देऊ नका.