डॉ. भारत लुणावत
आपल्या शरीरात न थांबता एक गोष्ट कायमस्वरूपी वाहत असते ती म्हणजे रक्त. रक्ताभिसरणाशिवाय शरीर जिवंत राहू शकणार नाही, ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे. शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचवण्यासाठी रक्ताभिसरणच महत्त्वाचे असते. हे रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहण्यासाठी आहारातील काही घटक आपल्याला नक्कीच मदत करू शकतात.
आपल्या शरीरात 24 तास रक्ताभिसरण सुरू असते; मात्र शरीरात चोवीस तास रक्त वाहत राहण्याची काय गरज, असाही प्रश्न आपल्याला कधीतरी पडतो; पण जगण्यासाठी रक्ताभिसरण सुरळीत राहणे आवश्यक आहे.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही सजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे मानवाच्या सर्वच सजीव अवयवांनाही ऑक्सिजनची आवश्यकता असते. अर्थात, केवळ ऑक्सिजन मिळून शरीर जिवंत राहील; परंतु, शरीराच्या विकासासाठी आवश्यक पोषक घटकही लागतात. हे सर्व घटक आपण सेवन करतो, त्या आहारातून मिळतात. शरीराला जीवनसत्त्व, प्रथिने, अँटिऑक्सिडंट, खनिजे, साखर, कर्ब्ज आदींची आवश्यकता असते. या सर्वांच्या मदतीने शरीरातील विविध अवयव त्यांचे कार्य करत असतात.
अर्थात, आपण तोंडाने अन्न सेवन करतो; मात्र त्यातील पोषण विविध अवयवांपर्यंत पोहोचते कसे, हा प्रश्नही योग्य आहे. तोंडाने खाल्लेले अन्न पोटात जाते. पचन संस्था त्यातील विविध पोषक घटक वेगळे करते. म्हणजेच, अन्नाचे पचन करते; मात्र हात, पाय, मेंदू डोळे आदी विविध अवयवांना अन्नातील हे पोषक घटक कसे मिळतात किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचतात तरी कसे, असा प्रश्न निर्माण होतो. मग, सर्वत्र संचार असणारा एक घटकच शरीरातील विविध अवयवांपर्यंत त्यांना आवश्यक ते पोषक घटक पोहोचवू शकतो. ते काम आपल्या शरीरातील रक्ताचे आहे. शरीराच्या विविध अवयवांना पोषक घटक आणि ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी रक्तप्रवाह सातत्याने सुरळीत राहणे आवश्यक आहे.
आपल्या चुकीच्या सवयी, चुकीच्या आहार पद्धती, चुकीची जीवनशैली आणि आजार यांच्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीला काही त्रास होऊ शकतात. रक्तप्रवाह बाधित झाल्याची काही लक्षणे दिसून येतात.
शरीराने अशी लक्षणे दर्शविल्यास किंवा अशी लक्षणे दिसून आल्यास कदाचित आपल्या संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा योग्य पद्धतीने होत नसावा. शरीरातील रक्तप्रवाहात अडथळे येण्याचे कारण काय आणि त्याचे गांभीर्य किती आहे, हे समजून घेण्यासाठी काही वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्या लागतील. त्यामुळे अशी काही लक्षणे जाणवल्यास उशीर न करता डॉक्टरांना भेटावे. अगदी सर्वसामान्य कारणामुळे जरी रक्ताभिसरणात अडथळा येत असेल, जसे चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार तर आहारातील योग्य बदलांच्या मदतीने हा अडथळा दूर करू शकतो. 5 प्रकारचे आहार जे रक्ताभिसरण योग्य राखण्यास मदत करतात.
टोमॅटोचे सेवन : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हणजे राष्ट्रीय आरोग्य संस्थेनुसार टोमॅटो धमन्या बंद करणार्या उए या एन्झाईमला रोखते त्यामुळे टोमॅटो सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगले राहते.
डाळिंबाचे दाणे खा किंवा रस प्या-
डाळिंब हे हृदयरोगाच्या आणि रक्तदाबाच्या दोन्ही रुग्णांसाठी चांगला आहार आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने डाळिंबातील पॉलिफेनॉल्स आणि नायट्रेट हे स्नायूंच्या पेशींमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया रोखतात. त्यामुळेच डाळिंब सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगले राहते.
अवाकडोचे सेवन : अवाकडो हे एक सुपर फूड मानले जाते. रक्तप्रवाह चांगला ठेवण्यासाठी आणि हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठीचे उत्तम फळ आहे. अवाकडोमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. हे आम्ल बहुतांश वेळा प्राणीज पदार्थांमध्ये मिळते. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींना ओमेगा 3 फॅटी अॅसिड मिळण्यासाठी अवाकडोचे सेवन केले पाहिजे.
कांदा खाणेही उत्तम– कांद्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे धमन्या ब्लॉक होणे किंवा बंद होणे रोखले जाते. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या मते रोज 4 ग्रॅम कांदा सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगले राहते. कांद्यामध्ये सूज कमी करण्याचे गुण असतात. त्यामुळे हृदयाच्या आजारांपासून संरक्षण होते.
लसूणही फायदेशीर : लसणामध्ये असिलिन असते आणि त्याचबरोबर सल्फरचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे रोज लसणाचे सेवन केल्यास रक्ताभिसरणाच्या समस्या आणि हृदयरोग यापासून बचाव करता येतो.
अयोग्य रक्ताभिसरणाची लक्षणे
अचानक हात, पाय सुन्न होणे किंवा बधीर होणे.
हात, पाय यांना मुंग्या येणे
हात, घोटा, पाय यांना सूज येणे.
स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना किंवा आखडणे
शरीराच्या रक्तवाहिन्या त्वचेवरून निळ्या दिसणे किंवा वर आल्यासारख्या दिसणे.
सतत थकवा जाणवणे.
कोणत्याच कामात एकाग्रता नसणे
त्वचेचा रंग बदलणे
सतत बद्धकोष्ठता होणे.