डॉ. महेश बरामदे
वातावरण बदलले किंवा खाण्यामध्ये काही वेगळे पदार्थ आले म्हणजे, लहान मुलांचा किंवा वृद्ध व्यक्तींचा घसा लगेचच खराब होतो. विषाणू किंवा जीवाणूंच्या संक्रमणामुळे घसा खराब होणे, हे सर्वात सामान्य कारण आहे. परंतु, घसा खराब होण्याची इतरही कारणे असतात. अॅलर्जी, गॅस, तूप, तेल, गूळ आदी कारणांमुळेदेखील घसा खराब होऊ शकतो. काही वेळेला गळ्याचा खूप जास्त वापर केल्यानेसुद्धा घसा खराब होतो. काही जीवाणू वरच्या श्वसन मार्गात जाऊन राहतात.
शरीराची प्रतिकारक क्षमता ज्यावेळी कमी होते, तेव्हा ते या मार्गात शिरतात. भारतात गळ्याशी संबंधित संक्रमण ही एक प्रमुख आरोग्य समस्या आहे. अन्य रोगांप्रमाणे काहीकाळ टॉन्सिल्स, स्लिप अॅपिनिया, सायनस सायटस आदी घशाशी संबंधित संक्रमण याची उदाहरणे आहेत. शहरांमध्ये या आजारांचे प्रमाण जरा जास्तच आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढते प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव. तसे पाहिले तर आजार सर्व वयातील लोकांमध्ये दिसतात. परंतु, लहान मुलांमध्ये ते जास्त आढळतात. कारण, मुलांमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता कमी असते. खासकरून जी आई आपल्या मुलाला कमी प्रमाणात स्तनपान करते किंवा अजिबात करत नाही, अशा मुलांना घशाशी संबंधित संक्रमण जास्त होते. एखाद्या मुलाला संक्रमण झाल्यास ते दुसर्या व्यक्तीपर्यंत सहजपणे पसरू शकते. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी संक्रमित व्यक्तीद्वारे रोगाचा प्रसार होणे, ही एक सामान्य गोष्ट आहे. त्याला आपण बोलीभाषेत क्रॉस इन्फेक्शन म्हणतो. कारण, ते व्हायरल इन्फेक्शनद्वारे पसरते.
सामान्यपणे टॉन्सिलला सूज येणे किंवा प्रदूषित पदार्थ खाल्ल्याने घसा बसल्यास श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. टॉन्सिल वाढल्यास अन्नपदार्थ खाण्यास त्रास होऊ शकतो. तसेच मुलांच्या चेहर्यातही बदल दिसू शकतो. म्हणजे दात बाहेर येणे, गळ्याच्या आजूबाजूला सूज येणे आदी लक्षणे दिसतात. ज्या व्यक्ती अधिक धूम्रपान, गुटखा, मद्य किंवा अन्य मादक पदार्थांचे सेवन करतात त्यांच्यामध्ये टॉन्सिल किंवा सायनस सायटस याचा परिणाम दिसतो. सातत्याने उन्हात राहणे, कारखाने किंवा वाहनांच्या धुरामुळे दूषित हवेत राहणे, यामुळे दूषित हवा श्वासातून आत जाते आणि संसर्ग होऊन सर्दी, ताप येतो.
ग्रसिका छिद्राचे काम ः कान, नाक आणि घसा हे तिन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असतात. ग्रसिका छिद्राचे कार्य सूक्ष्म असते. दूषित हवा श्वासाद्वारे नासिका छिद्रातून आत घेणे आणि ती शुद्ध करून फुफ्फुसांमध्ये पाठवणे हे काम यांचे असते. म्हणूनच त्यांना चेकिंग पॉईंट असेही म्हणतात. ग्रसिका छिद्राच्या जवळ थायरॉईड आणि त्याच्या आजूबाजूला लिंग्वल ग्रंथी असतात. या ग्रंथी श्वास सोडण्यापासून श्वास घेण्यापर्यंतच्या प्रक्रियेत नियमन संस्थेप्रमाणे कार्य करतात. मुलांमध्ये लायरिंग्जला सूज येणे म्हणजेच टॉन्सिल संक्रमणाचे प्रमुख कारण मानले जाते. यामुळे खाण्या-पिण्यास त्रास होतो. टॉन्सिल वाढले तर ग्रंथीचे कार्य सुरळीत होऊ शकत नाही म्हणून शस्त्रक्रियेद्वारे त्या योग्य बनवल्या जातात.
आपण ज्याला टॉन्सिल म्हणतो ते शरीरातील रोगाशी लढण्याचा एक अवयव आहे. कुठल्याही कारणामुळे हा अवयव संक्रमित होतो तेव्हा आवाज तयार करणारे लायरिंग्ज यावर प्रभाव पडतो. मोठ्यांमध्ये मादक द्रव्यांच्या सेवनामुळे याच्यावर एवढा परिणाम होतो की, त्यामुळे त्यांचा आवाज बदलतो. कारण, त्यांच्या गळ्यामध्ये जडपणा जाणवू लागतो. मुलांमध्ये टॉन्सिलला संसर्ग झाल्यास ताप येतो, श्वास घेण्यास त्रास होतो. पूर्वी असे संक्रमण झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे टॉन्सिल पूर्वावस्थेत आणले जात होते. ती शस्त्रक्रिया माहागडी होती; पण आता संशोधनामुळे ही प्रक्रिया सरळ, सोपी झालेली आहे. एका विशिष्ट मेडिकल उपकरणाद्वारे संक्रमित अवयव निष्क्रिय बनवला जातो. नाक, कान आणि गळा हे तिन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे त्यांच्यापैकी एका अंगाला संसर्ग झाला, तर दुसरा त्यापासून दूर राहू शकत नाही.
लस न टोचल्यामुळे ः धूळ, पाऊस, आर्द्रता आणि दूषित हवा यामधील विषाणू आणि जीवाणू नासिका छिद्राद्वारे आपल्या शरीरात पोहोचतात. आत गेल्यानंतर या दूषित पदार्थांना ग्रसिका ग्रंथींद्वारे वेगळे केले जाते. दमा, अधिककाळ खोकला, वारंवार कफ तयार होणे या सर्व दूषित पदार्थांमुळे ग्रसिका छिद्राच्या मार्गाला विरोध होतो आणि हे पदार्थ गळ्यात स्रावाच्या रूपात जमा होतात. गरोदरपणात किंवा जन्मानंतर मुलांना योग्य लसी दिल्या नाहीत, तर मुलांची रोगांशी लढण्याची शक्यता नगण्य होते आणि त्यामुळे असे रोग त्यांच्यात निर्माण होतात. काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास या आजारांपासून मुक्ती मिळू शकते.
मुलांना या आजारांपासून दूर ठेवायचे असल्यास त्यांचे कुपोषण होऊ देऊ नये, त्यांच्या लसीकरणाबाबत बेफिकिरी नसावी. नेहमी स्वच्छ पाणी किंवा उकळलेले पाणी प्यावे.
ताप आणि वेदना ः संक्रमणामुळे काही वेळेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी असाही त्रास होतो. हे संक्रमण विषाणूंमुळे झाले आहे की जीवाणूंमुळे हे ठिरवणे अवघड असते. मुलांमध्ये नेहमीच ते विषाणूंमुळे होते. घशात जखम झाल्यास ते जीवाणूंचे संक्रमण आहे असे समजावे. लसीकरणामुळे डिफ्थिरिया हा आजार खूप प्रमाणात कमी झाला आहे. तरीही घसा खराब झाल्यास तो डिफ्थिरिया नाही याकडे लक्ष द्यावे.
काळजीपूर्वकपणे बघावे की, घसा आणि टॉन्सिलच्या वर एखादा चॉकलेटी थर तर नाही. हा थर काढण्याचा प्रयत्न केल्यास रक्त येऊ लागते. डिफ्थिरिया हा एक भयानक आजार आहे. ज्या जीवाणूंमुळे हा आजार होतो ते मेंदू आणि हृदयावर परिणाम करतात. आजार बळावल्यास श्वास गुदमरतो आणि मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे शंका आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डिफ्थिरिया एक संक्रमक आजार आहे.
उपाय ः बहुतेकवेळा घसा घराब झाल्यास दिवसातून तीन ते चारवेळा गरम पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या करणे फायदेशीर ठरते. जीवाणूंचे संक्रमण दूर करायचे असल्यास औषधे मात्र गरजेची असतात. विषाणूंचे संक्रमण असल्यास सामान्य औषधांनी काम चालते. कुठल्याही प्रकारे घसा खराब झालेला असल्यास हळदीचा फायदा होतो. पहिले कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात आणि नंतर एक कप गोड दुधात थोडी हळद टाकून ते दूध प्यावे. घशाला खूप आराम मिळतो.