Lifestyle News | जेवल्या जेवल्या झोपण्याचे हे आहेत गंभीर परिणाम

ऑफिसच्या कामाची वेळ हल्ली आठ तासांपेक्षा अधिक झाली आहे.
Lifestyle News | जेवल्या जेवल्या झोपण्याचे हे आहेत गंभीर परिणाम
Published on
Updated on

डॉ. सुनीलकुमार जाधव

ऑफिसच्या कामाची वेळ हल्ली आठ तासांपेक्षा अधिक झाली आहे. काही वेळा तर आपण १२-१२ तास काम करतो. त्यामुळे साहजिकच घरी यायला उशीर होतो. पर्यायाने जेवणही उशिराच केले जाते. जेवण उशिरा झाले तरीही सकाळी पुन्हा ऑफिसची वेळ गाठण्यासाठी लवकर उठणे भागच असते.

परिणामी आपण जेवल्याजेवल्या लगेचच झोपतो. घरी राहाणाऱ्या लोकांमध्ये गृहिणींचे प्रमाण अधिक असते. त्या सकाळी लवकर उठून सर्व कामे उरकत असतात, त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर थोडी वामकुक्षी त्या घेतात. दुपारची झोप, रात्री जेवल्या जेवल्या झोपणे या सर्व गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने अर्थातच घातक आहेत.

कारण या सवयींमुळे काही गंभीर आजार जडू शकतात. जेवल्या जेवल्या झोपण्याची सवय ही शरीर स्थूल करण्यास कारणीभूत ठरते. रात्री उशिरा ऑफिसवरून घरी आले की थकला भागला जीव कधी एकदा जेवतोय आणि पाठ टेकतोय असाच विचार करतो. साहजिकही आहे. सकाळी वेळेत ऑफिसलाही पोहोचायचे असते.

रहाटगाडगे सुरूच असते. परंतु, जेवल्या जेवल्या झोपणे हे आरोग्यासाठी घातक आहे. दुपारीही जेवण करून झोपणे अहितकारकच आहे. जेवण आणि झोप यांच्यामध्ये किमान दोन तासाचा वेळ असला पाहिजे.

जेवल्या जेवल्या झोपल्याने काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या. जेवल्या जेवल्या झोपल्यास अन्नपचनास त्रास होतो. त्यामुळे पोटात तसेच राहिलेल्या अन्नाचे रूपांतर चरबीमध्ये होते. परिणामी वजन हळूहळू वाढते. पोटात अन्न साठल्याने अन्नाचे पचनही हळूहळू होते. त्यामुळे शरीराची चयापचय क्रियाही कमजोर होते.

जेवण पचण्यासाठी आतड्यांमध्ये आम्ल तयार होते परंतु जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अन्नपचनासाठीचे हे आम्ल पोटातून निघून अन्ननलिकेत येते, फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. परिणामी व्यक्तीला पोटामध्ये जळजळ होणे आणि पित्त होणे आदी समस्या भेडसावतात. जेवल्यानंतर लगेचच आडवे झाल्याने पोट जड होते. झोपही शांत लागत नाही. जरी झोप लागली तरीही पोटाच्या जडत्वामुळे झोप शांत न लागता मध्ये मध्ये मोडते, नियमितपणे झोपेत असा खंड पडत राहिल्यास झोपेच्या समस्या भेडसावतात.

जेवल्यानंतर शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते, परंतु लगेच झोपल्यास त्या रक्तशर्करेचा वापर शरीर करू शकत नाही. मग रक्तामध्ये जास्त प्रमाणात शर्करा मिसळली जाते. यामुळे व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका वाढतो. आरोग्यशास्रानुसार रात्रीच्या झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवण करावे. जेवल्यानंतर न चुकता शतपावली करावी. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि स्थूलपणालाही आमंत्रण मिळत नाही. तसेच झोपही शांत लागते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news