घसा कोरडा पडतोय ? | पुढारी

Published on
Updated on

वातावरणात सध्या सातत्याने बदल होत आहेत, कधी थंडी तर कधी प्रचंड उकाडा जाणवत आहे. थोडक्यात, ऋतुमानातील बदलांमुळे घशाला सातत्याने कोरड पडते. साहाजिकच आपण पाणी अधिक प्रमाणात सेवन करतो. घशाला कोरड पडणे, हे इतरी आरोग्याच्या काही समस्यांचे संकेत असू शकतात. आहारात बदल केल्यास ही समस्या सुटू शकते. 

मानवी शरीर म्हणजे निसर्गाने तयार केलेले एक यंत्रच म्हणायला हवे. शरीरात काही बदल झाले किंवा काही गडबड झाली, तर शरीर त्याचे संकेत देऊ करते. तहान लागून घश्याला कोरड पडणे ही अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे; मात्र पाणी पिऊनही सातत्याने घसा कोरडा पडत असेल, तर मात्र आरोग्याच्या द़ृष्टीने चांगले लक्षण नाही. एखाद्या गंभीर आजाराचे ते लक्षण असू शकते. 

आपल्या तोंडात सातत्याने लाळ तयार होत असते. त्यामुळे घसा कोरडा पडत नाही; मात्र काही विशिष्ट परिस्थितीत तोंडात पुरेशी लाळ तयार होत नाही किंवा लाळनिर्मितीची प्रक्रिया मंदावते, तेव्हा तोंड आणि घसा कोरडा पडतो. चिंता, तणाव, अस्थमा, धूम्रपान, अ‍ॅसिडिटी, अनियमित जीवनशैली, शरीरात पाण्याची कमतरता, पोषणाची कमतरता, अँटी डिप्रेशन औषधे आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांमध्ये किंवा कारणांमुळेही तसेच काही विशिष्ट औषधांमुळेही अशी स्थिती ओढवू शकते. सातत्याने दीर्घकाल अशीच स्थिती राहिल्यास तोंडाला सूज येते. त्यामुळे जेवण चावणे आणि गिळणे या दोन्ही प्रक्रियेत त्रास होतो. त्यामुळेच पाणी प्यायल्यानंतरही जर गळा कोरड पडत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. 

घसा का सुकतो?- घशाला कोरड पडणे ही सर्वसाधारण समस्या आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात घशाला कोरड पडण्याचा अनुभव अधिक प्रमाणात येतो. एकतर हिवाळ्यात घाम कमी येतो. त्यामुळे तहानही कमी लागते. त्याचवेळी बाहेरील हवाही कोरडी असते. श्वसनातून गेलेल्या कोरड्या हवेमुळे घसाही कोरडा पडतो. उन्हाळ्यात तापमान अधिक असते आणि जास्त घाम आल्यामुळे घसा कोरडा पडतो. सतत पाणी प्यावेसे वाटते. शरीरात पाठीचा कणा आणि कुर्चा या दोन्हींमध्ये सुमारे 80 टक्के पाणी असते. शरीराला पाण्याची कमतरता भासल्यास त्याचा परिणाम आपल्या हालचालींवर होतो. विशेषतः सांध्यांच्या समस्या वाढतात. या व्यतिरिक्त 2 आठवड्यांपेक्षा अधिक दिवस घसा कोरडा पडत असेल, तर एखाद्या विकाराचे ते प्राथमिक लक्षण असू शकते. 

* टॉन्सलायटिस ः घशामध्ये मागच्या बाजूला ओरटॉन्सिल्स नावाच्या 2 ग्रंथी असतात. अनेक प्रकारच्या संसर्गापासून त्या आपला बचाव करतात. याच ग्रंथींना संसर्ग झाल्यास त्याला टॉन्सिलायटिस म्हणतात. त्यामध्ये ग्रंथींवर पांढर्‍या रंगाचा एक थर जमा होतो. हा थर एक प्रकारचे बुरशीजन्य संसर्गाचा प्रकार असतो. यामध्ये घसा सुकण्याबरोबरच अन्न गिळण्यास त्रास होतो. शिवाय घसादुखी आणि कफ पडतो. कानात वेदना होतात, तसेच ताप येणे आदी लक्षणे दिसात. या स्थितीत बदल करण्यासाठी औषधे घेण्याबरोबरच थंड पदार्थांचे सेवन वर्ज्य करावेत आणि कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. 

* अ‍ॅसिड रिफ्लक्स- यामध्ये अन्ननलिकेत आम्लाचे प्रमाण वाढते. पचनासाठी जठरामध्ये जे आम्ल तयार होते, ते खाली न जाता वर अन्ननलिकेत येते. त्यामुळे छातीत जळजळ होते आणि घशाला कोरड पडते. सतत पाणी प्यावे वाटते. परंतु, पाणी पिऊनही घशाची कोरड कमी होत नाही. रात्री उशिरा जेवल्यास किंवा खूप तिखट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या निर्माण होते. ज्यांचे वजन अधिक आहे त्यांनाही हा त्रास होतो. आहाराच्या सवयींमध्ये बदल आणि औषधांच्या मदतीने या समस्येवर उपाय करता येईल. परंतु, काही वेळा मात्र परिस्थिती गंभीर झाल्यावर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ करतात. 

* अ‍ॅसिड रिफ्लक्स समस्येकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर विकार जडू शकतो.  अ‍ॅसिड रिफ्लक्स वाढणे म्हणजे पचनासंबंधीचा रोग – गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसिजची (जीईआरडी) सुरुवातही असू शकते. 

* अ‍ॅनिमिया ः शरीराला रक्ताची कमतरता भासते तेव्हा त्याला अ‍ॅनिमिया म्हणतात. शरीरात लाल रक्तपेशी कमी होतात. त्यांंची पूर्तता करण्यासाठी शरीराला अधिक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते तेव्हा घशाला कोरड पडते. चक्कर येणे, थकवा, दम लागणे आणि हृदयाची धडधड वाढणे आदी लक्षणे दिसून येतात. शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी औषधांबरोबर डॉक्टर समतोल आहाराचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

* मधुमेह टाईप २- मधुमेह ही सध्या देशातील प्रमुख समस्या झाली आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना मधुमेह ग्रासू शकतो. मधुमेहाने पीडित व्यक्तींमध्ये मूत्रपिंडाची क्षमता बाधित झाल्याने सतत लघवी होते आणि शरीरातील पाणी बाहेर टाकले जात असल्याने घसा कोरडा पडतो. अर्थात, मधुमेहामध्ये यावर ठोस उपाय नाही; मात्र योग्य औषधोपचार, वैद्यकीय सल्ला यामुळे व्यक्ती सर्वसाधारण जीवन जगू शकते. 

* श्वसनाचे आजार- दमा, अस्थमा यासारख्या आजारांमध्ये घश्याला सातत्याने कोरड पडते. त्यासाठी काही कारणे आहेत, जसे औषधांचे सेवन करणे, तसेच श्वसनाच्या आजारांत व्यक्तींना नाकाने श्वास घेण्यास श्रम पडतात तेव्हा ते तोंडाने श्वास घेतात. परिणामी, तोंडाला कोरड पडते. 

* त्याव्यतिरिक्त इतर काही आजार आणि संसर्गामध्येही घशाला कोरड पडते. उदा. अल्झायमर, सिस्टिक फायब्रोसिस, रुमेटाईड संधिवात यामध्ये औषधांचा दुष्परिणाम म्हणून घशाला कोरड पडू शकते. 

* लघु रक्तदाब ः अतितणाव आणि जीव घाबरा झाल्याने व्यक्तीचा रक्तदाब कमी होतो, तेव्हा घशाला कोरड पडण्याच्या स्थितीचा अनुभव येतो. रक्तदाब कमी झाल्यास शरीराला ऑक्सिजन आणि इतर पोषक घटक मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे सतत घसा सुकतो आणि तहान लागते. शिवाय चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि हात-पाय थंड पडणे आदी लक्षणे दिसून येतात. लघु रक्तदाबाची समस्या असेल, तर डॉक्टर भरपूर पाणी पिण्याबरोबर आहारातील मिठाचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला देतात. 

* हायपोथायरॉईड- हा आजार बहुतांश वेळा स्त्रियांना होतो. यामध्ये थायरॉईड ग्रंथी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत. त्यामुळे वजन वाढणे, कोरडी त्वचा, अति थंडी वाजणे, नैराश्य आणि घशाला कोरड पडणे ही लक्षणे दिसतात. रक्ताच्या तपासणीतून याचे निदान होते. त्यानंतर औषधे आणि संतुलित जीवनशैली यामुळे ही समस्या नियंत्रणात राहते. 

* अतिगोड पदार्थ टाळावेत. कॅफिनयुक्त पेयांचे सेवन टाळा. बडिशेपमधील फ्लॅवेनॉईडस् लाळेची निर्मिती करतात. जेवणानंतर थोडी बडिशेप सेवन करावी. घशाला कोरड पडत असल्यास ऑईल पुलिंग करावे. नारळ किंवा तिळाच्या तेलाने दहा मिनिटे गुळण्या कराव्यात. धूम्रपान, मद्यपान टाळावे. आहारात फळे, हिरव्या भाज्या सामील कराव्यात. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. जेवल्यानंतर गुळण्या कराव्यात. दातांची नियमित स्वच्छता करावी. टूथपेस्ट दरवेळी नवीन वापरावी. तोंडात सूज किंवा वेदना होत असल्यास अतितेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. साखररहीत गोळ्यांनी घसा ओलसर राहतो. खोलीत ह्युमिडीफायर लावून दमटपणा राखावा. कोमट पाण्यात मध घालून प्यावे. लिंबू पाणी सेवन केल्यानेही लाळेची निर्मिती होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news