हवा आरोग्यदायी आयुष्याचा संकल्प

Women's health
महिलांचे आरोग्य
Published on
Updated on
डॉ. प्राजक्ता पाटील

आठ मार्च रोजी होणार्‍या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथांविषयी, स्त्रीविषयक समस्यांविषयी बरीच चर्चा होईल; परंतु महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाइतकेच त्यांचे सुद़ृढ आरोग्यही महत्त्वाचे आहे.

विविध संशोधन अहवालांनुसार, हृदयरोग, मधुमेह, स्थूलत्व, स्तनाचा कर्करोग, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), ऑस्टिओपोरोसिस आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

अनियमित व पोषणरहित आहार व जास्त चरबीयुक्तपदार्थांचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, सतत तणाव व मानसिक दबाव, धूम्रपान व मद्यपानाचे वाढते प्रमाण, यांमुळे महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. इंडियन हार्ट असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील महिलांमध्ये हृदयरोगाची समस्या 20% पेक्षा जास्त वाढली आहे. विशेषतः, 40 वर्षांवरील महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढलेला आहे. याच अनारोग्यदायी परिस्थितीमुळे किंवा सवयींमुळे मधुमेहग्रस्त महिलांची संख्याही वाढली आहे. पूर्वी शहरी भागातील महिलांमध्ये आढळणारा मधुमेह आता ग्रामीण भागातील महिलांमध्येही मोठ्या संख्येने दिसत आहे. विशेषतः, गरोदरपणातील मधुमेह ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हे लक्षात घेता महिलांनी संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम (योगा, चालणे, धावणे), तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि विश्रांतीच्या तंत्रांचा अवलंब करणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे आवश्यक आहे. याबाबत खरे तर कुटुंबातील पुरुषवर्गाने महिलांच्या आरोग्याबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

अलीकडील काळात कर्करोगाच्या विळख्याने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. महिलांमध्ये होणारा स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोगही टप्प्याटप्प्याने आपली मगरमिठी घट्ट करत आहे. हार्मोनल बदल आणि आनुवंशिकता, असंतुलित जीवनशैली आणि प्रदूषणाचा प्रभाव, उशिरा गर्भधारणा किंवा स्तनपान न करणे यांसारखी काही कारणे या कर्करोगांना निमंत्रण देणारी ठरताहेत. हे लक्षात घेता दरवर्षी मॅमोग्राफीसारख्या चाचण्या नियमितपणे करणे गरजेचे आहे. शासनाकडून अलीकडील काळात मोफत स्वरूपात या चाचण्या केल्या जात आहेत. त्यांचा लाभ महिलांनी घ्यायलाच हवा. बर्‍याच महिलांमध्ये या चाचण्यांविषयी भीती दिसून येते; परंतु लक्षात घ्या की, कर्करोगाचे निदान अगदी प्राथमिक टप्प्यावर झाल्यास त्यावर उपचार करून पूर्ण नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यामुळे चाचण्यांबाबत हलगर्जीपणा करू नका. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार, भारतातील दर 8 पैकी 1 महिला स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्याखाली आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढले असून, एचपीव्ही लसीकरणाची गरज अधोरेखित केली जात आहे. ही लसही अलीकडील काळात मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. त्याचाही लाभ महिलांनी घ्यायला हवा.

हार्मोनल असंतुलन, जास्त तेलकट व प्रक्रिया केलेला आहार, लठ्ठपणा व व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव या कारणांमुळे महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराचे प्रमाणही वाढते आहे. एम्सच्या अहवालानुसार, भारतातील 25% महिलांमध्ये पीसीओडीची समस्या असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः, तरुणींमध्ये मासिक पाळीच्या अनियमिततेच्या समस्या हे प्रमुख कारण आहे. हे लक्षात घेता तरुणींनी पोषणयुक्त आहाराबरोबरच नियमित व्यायाम करून हार्मोन्स नियंत्रित ठेवणे, तणाव कमी करण्यासाठी योगा व ध्यान करणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे आवश्यक ठरते.

भारतीय महिलांमध्ये लोह आणि कॅल्शियमची कमतरता प्राधान्याने जाणवते. याचा परिणाम म्हणजे ऑस्टिओपोरोसिस (हाडे कमजोर होणे) जडण्याचे प्रमाणही वाढले आहे. भारतातील स्त्रियांमध्ये हाडांची घनता कमी होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि बदाम यांचा आहारात समावेश करणे,नियमित सूर्यप्रकाशात फिरणे, हाडांच्या आरोग्यासाठी योग्य वैद्यकीय तपासणी करणे या माध्यमातून ऑस्टिओपोरोसिसला दूर ठेवता येऊ शकते.

याखेरीज कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्या, कुटुंबाची चिंता, मुलाबाळांची काळजी, झोपेच्या वेळेतील अनियमितता यांसह अनेक कारणांनी महिलांमध्ये उदासीनता, चिंता, झोपेच्या समस्याही वाढताहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका सर्वेक्षण अहवालानुसार, भारतातील 40 टक्के महिलांना कधी ना कधी मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. लक्षात घ्या, मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. मनःशांतीसाठी ध्यान, योग आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करणे, पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. शास्त्रीय संशोधन आणि आरोग्य अहवाल हे दर्शवतात की, प्रतिबंधात्मक उपाय व योग्य वेळी योग्य वैद्यकीय सल्ला घेतल्यास बहुतांश आजारांपासून मोठ्या प्रमाणावर बचाव करता येतो. त्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्यदायी आयुष्य जगण्याचा संकल्प करणे, अधिक आवश्यक आहे. कारण, ‘हेल्थ इज वेल्थ’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news