फुफ्फुसांचा आजार केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच होतो असे नाही, तर नवजात मुलांपासून कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होतो. जगभरात होणार्या नवजात बालकांच्या मृत्यूच्या अनेक कारणांमध्ये फुफ्फुसाचे आजार हे महत्त्वाचे कारण मानले जाते.
जगभरात दरवर्षी लाखो लोक फुफ्फुसांशी निगडीत आजाराने ग्रस्त होत आहेत. या विकाराचे वैशिष्ट्य असे की अनेक रुग्णांमध्ये या विकाराविषयी प्राथमिक पातळीवर काहीच समजत नाही. सर्वसामान्यपणे खोकला, छातीत वेदना होणे, कफ, इत्यादी गोष्टींना फुफ्फुसाच्या सामान्य आजाराची लक्षणे मानली जातात. अनेकदा क्षय आणि फुफ्फुसाचा कर्करोगाचीही ही कारणे असू शकतात. त्याच्याशी निगडीत लक्षणे कोणती ते पाहूया.
सतत खोकला येणे : फुफ्फुसांशी निगडीत काही समस्या असेल तर सतत खोकला येतो. वास्तविक खोकला येणे ही प्रतिकार दर्शवणारी कृती आहे. वातावरणातील बुरशी, विषारी पदार्थ आणि धूळ माती यासारख्या घटकांना श्वासनलिकेपासून दूर ठेवत ती स्वच्छ करते; पण खोकला सतत आणि खूप येत असेल तर फुफ्फुसांशी निगडीत समस्येचे हे संकेत आहेत. सतत खोकला आल्यामुळे ताप येणे, कफातून रक्त पडणे आदी समस्या भेडसावतात.
श्वास घेताना घरघर : फुफ्फुसे श्वास घेण्यात मदत करतात. श्वास घेताना खरखर किंवा जोरात आवाज येत असेल तर ती फुफ्फुसांच्या आजाराचे संकेत आहे. श्वसन मार्ग संकुचित होतो तेव्हा उती सुजतात किंवा अति स्राव होणे किंवा कफ साठणे इत्यादींमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तेव्हा ही स्थिती निर्माण होते. त्याला 'व्हिजिंग' असेही म्हणतात. त्यामधून फुफ्फुसांच्या वाईट परिस्थितीचा अंदाज येतो.
खोकल्यातून रक्त : फुफ्फुसांचा आजार झाल्यास खोकल्यातून रक्त पडते. रक्ताच्या गाठी, कफातून रक्त पडणे किंवा फक्त रक्त येणे असे होऊ शकते. अति खोकल्यामुळे असे होते जे फुफ्फुसांच्या गंभीर विकाराचे संकेत असू शकतात. त्याला हिमोपटायसिस म्हणतात त्यामुळे फुफ्फुसांचा गंभीर आजाराचे हे प्रमुख लक्षणांपैकी एक आहे.
श्वास घेण्यास समस्या : या विकाराला रेस्पिरेटरी फेल्युअर म्हटले जाते. फुफ्फुसांचा हा एक गंभीर आजाराचा हा संकेत आहे. गंभीर रेस्पिरेटरी फेल्युअर हे अतिसंसर्ग, फुफ्फुसाला येणारी सूज, हृदयाचे ठोके थांबणे किंवा फुफ्फुसांचा गंभीर आजार यामुळे होऊ शकते.
फुफ्फुसे जेव्हा रक्तात पुरेसा ऑक्सिजन पोहोचवू शकत नाहीत आणि कार्बन डायऑक्साईड हटवू शकत नाहीत, तेव्हा समस्या गंभीर होते. परिणामी, श्वास घेण्यात समस्या निर्माण होते.
फुफ्फुसात वेदना : फुफ्फुसांचा आजार झाल्यास छातीत वेदना होतात. छातीचे स्नायू आणि हाडे यांच्याशी निगडीत काही समस्या ते निदर्शक आहे. ही समस्या लहान आणि गंभीर असू शकते. काही प्रकरणात यामुळे व्यक्तीच्या जीवालाही धोका असू शकतो. छातीत वेदनांबरोबरच खोकला आणि तापही येत असेल तर संसर्ग झाल्याचे ते लक्षण आहे.
त्वचा बदलणे : पुरुषांच्या त्वचेवरही हा परिणाम दिसून येतो. व्यक्तीची त्वचा निळी, काळपट रंगाची दिसू लागते. या परिस्थितीला सायनोसिस म्हणतात. ओठ आणि नखे यांच्या बाजूची त्वचा काळीनिळी पडते. जेव्हा रक्तात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. सायनोसिस अचानक दिसू लागतो; पण तो वेगाने किंवा हळूवारपणे फुफ्फुसाच्या गंभीर आजारांचे संकेत देत असतो.
सूजची समस्या : फुफ्फुसांच्या आजारात हात, पाय आणि टाच सुजलेली असते. सामान्यपणे सूज हृदयरोगाचे एक कारण असते. त्यामध्ये श्वास कमी पडतो. हृदय आणि फुफ्फुसे या दोन्हीच्या समस्यांची लक्षणे एकसारखी असतात. कारण दोन्ही आजारांमध्ये फुफ्फुसे आणि हृदय यांच्यावर परिणाम होतोच.