समस्या ‘बेड सोर’ची

वयोवृद्धांना बेड सोरची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते
bed sores
‘बेड सोर’
Published on
Updated on
डॉ. संतोष काळे

वयोवृद्ध नागरिकांना तसेच साठी ओलांडलेल्या मंडळींना बेड सोरची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असते. संपूर्ण जगभर ही समस्या जाणवते.

बेड सोर ही व्याधी फक्त वृद्धांनाच होते असे नाही. ज्या तरुण किंवा मध्यमवयीन मंडळींना काही कारणांमुळे अनेक दिवस बिछान्यावर खिळून राहावे लागले असेल अशा लोकांनाही ‘बेड सोर’ होतात. अनेकांना अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तसेच अन्य व्याधींमुळे अनेक दिवस रुग्णालयात किंवा घरी बिछान्यावर झोपून राहावे लागते. अशा लोकांना बेड सोर होण्याची शक्यता अधिक असते. याचबरोबर ज्या व्यक्तींना दीर्घकाळ व्हीलचेअरवर बसावे लागते अशा व्यक्तींनाही बेड सोर होतात.

त्वचेला होणारा रक्तपुरवठा थांबल्यामुळे बेड सोर होतात. अनेक दिवस बिछान्यावर एकाच स्थितीत झोपून राहावे लागल्यामुळे शरीराच्या काही भागाच्या त्वचेवर वारंवार दाब पडत राहतो. त्यामुळे ही व्याधी उद्भवते. रुग्णालयामध्ये दीर्घकाळ उपचार घेणार्‍या रुग्णांना ही व्याधी होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर घरामध्ये असलेल्या परंतु बिछान्याबाहेर पडून जे लोक हिंडू-फिरू शकत नाहीत अशांनाही बेड सोर होतात. बेड सोरच्या जखमांमुळे होणार्‍या वेदना काही रुग्णांच्या द़ृष्टीने सहन करण्यापलीकडच्या असतात. 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या रुग्णांना महिनाभरापेक्षा अधिक कालावधीकरिता खाटेवर उपचारासाठी झोपून राहावे लागले असेल तर अशा रुग्णांमध्ये बेड सोर होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अनेक वृद्धाश्रमांमध्ये ही व्याधी झालेले रुग्ण आढळून येतात. शरीराच्या विशिष्ट भागातील कातडीवर सातत्याने दाब पडत राहिल्यामुळे बेड सोर उद्भवतात.

सुरुवातीच्या काळात बेड सोरचा रंग लाल असतो. बेड सोर झाल्यानंतर शरीराच्या त्या भागात कमालीच्या वेदना जाणवतात. या वेदना अनेकांना सहन करणे शक्य होत नाहीत. त्यामुळेच या व्याधीवर तातडीने उपाय करणे गरजेचे असते. या व्याधीवर तातडीने आणि योग्य उपाय केले नाहीत तर संपूर्ण शरीरात बेड सोरमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. बेड सोर चिघळले तर शरीरातील हाडे आणि अन्य स्नायूंमध्ये इन्फेक्शन पसरू लागते. कंबर, पाठ, मनगट, खांदे, टाच या भागात हे इन्फेक्शन पसरल्यावर रुग्णाच्या प्रकृतीत आणखी गुंतागुंत निर्माण होते. अनेक दिवस बिछान्यावर एकाच स्थितीत पडून राहिल्यामुळे शरीरातील काही भागातील त्वचेच्या रक्तपुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळेच बेड सोर उद्भवतात.

ज्येष्ठ नागरिकांची, वयोवृद्ध नागरिकांची कातडी वयोमानानुसार संवेदनशील बनलेली असते. रुग्णाला जर सारखा घाम येत असेल तर त्यामुळेही बेड सोर चिघळण्याची शक्यता असते. जे रुग्ण दीर्घकाळापासून बिछान्याला खिळलेले असतात, त्यांच्या शरीराच्या बहुतेक सर्व हालचाली बंद झालेल्या असतात. त्यामुळेच त्यांना या व्याधीला तोंड द्यावे लागते. या व्याधीवर पौष्टिक आहार घेणे हा चांगला उपाय ठरू शकतो. आजारपणाच्या काळात शरीराला आवश्यक असणार्‍या प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स यांची कमतरता रुग्णाला जाणवते. जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाने पौष्टिक आहार घेतला तर त्याला या व्याधीला तोंड देता येणे शक्य होते. तसेच या व्याधीतून रुग्ण लवकर बराही होऊ शकतो. उतारवयामुळे माणसाच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळेच वृद्ध व्यक्तींना बेड सोर होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अनेकदा आपल्याला शरीरावर गंभीर जखम होणे, हे ही बेड सोर होण्याचे कारण ठरू शकते. गंभीर जखमेमुळे आपल्याला शरीराच्या त्या भागावर किती दाब टाकावा, याचा अंदाज येत नाही. त्याचा परिणाम बेड सोर चिघळण्यात होतो.

त्वचेचा रक्तपुरवठा वाढविण्यासाठी त्वचेला मसाज करणे हा चांगला मार्ग समजला जातो. रुग्णाला मसाज करणे शक्य असेल तर या मार्गाचा अवलंब करावा. रुग्णाला ज्या बिछान्यावर झोपविले असेल तो बिछाना कोरडा असावा, याची दक्षता रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतली पाहिजे. काही कारणांमुळे बिछान्यावरचे कपडे किंवा रुग्णाचे कपडे ओले झाले असतील तर असे कपडे तातडीने बदलायला हवेत. त्वचा जर कोरडी राहिली तर बेड सोरला प्रतिबंध करता येऊ शकतो. बेड सोर झाल्यावर रुग्णाने ए, बी, सी, ई व्हिटॅमीनयुक्त आहार घेणे आवश्यक असते. अशा काळात मांसाहार खाऊ नये. फायबरयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यास रुग्णाला मोठा फायदा होतो. दिवसातून 2 ते 4 वेळा बेड सोरच्या जखमा धुवून काढाव्यात. रुग्णाला एकाच स्थितीत बिछान्यावर जादा काळ झोपू देऊ नये. त्याला शरीराची अवस्था सारखी बदलायला लावावी. शरीराच्या ज्या भागात कातडीच्या जवळ हाडे असतात, त्या भागात बेड सोर होण्याची शक्यता अधिक असते. कंबर अथवा त्या खालच्या भागात बेड सोर होण्याची शक्यता जास्त असते. मात्र रुग्ण जर अनेक दिवस बिछान्याला खिळून असेल तर शरीराच्या कोणत्याही भागावर बेड सोर होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news