डॉ. शक्ती पातकर
ते आत आले आणि म्हणाले, "माझी फॅमिली पुढच्या आठवड्यात फॉरेनला चालली आहे. त्यामुळे 15 दिवस मला बाहेरचं खावं लागणार, तर मी काय करू?'' मी आधी त्यांचे वजन बघितलं, तर आठशे ग्रॅम कमी झालं होतं. म्हणजे, हळूहळू का होईना, त्यांचं वजन उतरत होतं आणि व्यायामही रेग्युलरली करत नव्हते. म्हणजे, जे काही वजन कमी होत होतं, ती डाएटचीच कृपा असावी.
इतर चौकशी केल्यावर समजलं की पंधरा दिवस ते हॉटेलचंच काहीतरी घरी आणून खाणार होते, मग त्यांनी काय काय खायचं आणि काय काय टाळायचं, हेही त्यांना नीट समजावून सांगितलं. अधेेमधे भूक लागली, तर घरात वेगवेगळी फळं आणून ठेवा, असंही सांगितलं. हल्ली जागोजागी ताक मिळतं. ते पिऊ शकता, हेही सांगितलं आणि या सर्व गडबडीत व्यायाम मात्र चुकवू नका, अशी ताकीद दिली आणि अगदी सहजच विचारलं, 'फॅमिलीबरोबर तुम्ही का नाही जात टूरवर?''
ते म्हणाले, "वेळच नाही मॅडम मला. मी पंधरा दिवस टूरवर गेलो, तर माझं टार्गेट कोण पूर्ण करेल आणि टार्गेट पूर्ण झालं नाही, तर बॉस मला हाकलून देईल.''
मी विचारलं, "तुम्हाला नाही वाटत जावंसं?''
तर ते म्हणाले – "खूप वाटतं हो; पण वेळच मिळत नाही ना! तसा कंपनीच्या कामासाठी मी वरचेवर फॉरेनला जात असतो; पण अक्षरशः जातो, मीटिंग्ज अॅटेंड करतो आणि परत येतो. फॉरेनला जाऊन फिरायला मात्र मिळत नाही. जायच्या तिकिटाबरोबरच परतीचं तिकिटही कंपनी हातावर ठेवते. त्यामुळे एक दिवससुद्धा जास्त राहता येत नाही.'' ते उदासपणे हसले; पण मग स्वतःलाच सावरत म्हणाले, "आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं ठरवलं की, हे सगळं गृहीतच धरायला पाहिजे ना?''
'मी म्हटलं, "सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही कशा कशाचा बळी देता, यावर तुमचा आनंद अवलंबून असतो. आनंदी-सुखी-समाधानी राहता यावं, हेच तर आपल्या आयुष्याचं ध्येय असतं ना? पण, त्याच छोट्या छोट्या आनंदाचा तुम्ही बळी देणार असाल, तर सक्सेसफुल होऊन तुम्ही काय साध्य करणार?'' ते जरा गप्प झाले. मलाही वाटलं, की मी त्यांना असं काही बोलायला नको होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कसं वागायचं, हे त्यांचं त्यांनी ठरवायचं. मला एका मराठी नाटकातल्या काव्यपंक्ती आठवल्या –
'स्वतःला विकून तू काय घेशील विकत?
मोठमोठी सुखे राजा बघ मिळती फुकट!'
पण इतक्यात तेच म्हणाले, "विचार केला तर पटतंय मला तुमचं डॉक्टर. गावाकडे आमचं छोटसं घर होतं आणि मोठा परिवार. बाबा एकटेच कमावणारे. त्यामुळे परिस्थिती बेताची! पण, खूप खूश असायचो आम्ही. मग, मी शिकायला शहरात आलो. इथेच नोकरी पण मिळाली. लहानसं घर भाड्याने घेतलं. तोपर्यंतसुद्धा सगळं छान होतं. मग, लग्न झालं. दरम्यान, वडील वारले. मग, आईला इथेच घेऊन आलो आणि मोठ्ठं घर घेतलं. घर लहान होतं, तेव्हा मोठं घर घ्यायचं म्हणून कष्ट करत राहिलो आणि आता मोठ्या घराचे हप्ते फेडायचे म्हणून पुन्हा मर मर मरतोय. नोकरीवरून घरी जातो तेव्हा इतका दमलेला असतो, की मुलांचे लाड करायचीही ताकद नसते. आईलाही वाटतं, की मी तिच्याशी गप्पा माराव्यात. मी आलो की तीही आजूबाजूला रेंगाळते; पण मला तेवढेही त्राण नसतात. मग, ती बिचारी गुपचूप आपल्या खोलीत निघून जाते. मला जेऊन कधी एकदा अंथरुणावर आडवा होतो, असं वाटतं.''
"पगार भरपूर आहे; पण तुम्ही म्हणता तसं त्या पैशांनी मला छोटे छोटे आनंद नाही विकत घेता येत. किती दिवस झाले, धाकट्याला पाठीवर बसवून घोडा घोडा केला नाही. आईकडून डोक्याला मनसोक्त तेल लावून घेतलं नाही. अहो घरापासून फक्त 100 फुटावर एक बाग आहे, पण लेकीला तिथे खेळायला न्यायलासुद्धा मला वेळ नसतो.''
मलाही वाटलं टार्गेट गाठता गाठता माणूस स्वतःच टार्गेट होऊन जातो. सुख मिळविण्यासाठी माणूस धावत सुटतो सैरावैरा; पण ते आपल्याच आजूबाजूला असतं. याचा आपल्याला पत्ताच नसतो. कधीकधी सुख आपल्या दाराशी येतं आणि आपण दरवाजा बंद करून बसतो…
'खुशियाँ आज भी खत लिखती है मुझे'
लेकिन मै अब ऊस पते पर नही रहता।'