

रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉजदरम्यान आणि नंतर एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) वाढणे आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) कमी होणे ही समस्या दिसून येते. यात हृदयविकाराचा धोका अधिक असतो, ज्यामध्ये कोरोनरी आर्टरी डिसीजसारख्या समस्यांचा समावेश होतो.
मेनोपॉज हा महिलांमध्ये होणारा नैसर्गिक बदल असून सर्वसामान्यपणे 45 ते 55 वयोगटात आढळून येतो. या स्थितीत महत्त्वाचे हार्मोनल बदल होतात. एस्ट्रोजनचा स्तर कमी होऊ लागतो. एस्ट्रोजन केवळ प्रजननाचीच भूमिका निभावत नाही, तर हृदयाचे आरोग्य हेल्दी राखण्याचेही काम करते. इस्ट्रोजेनची पातळी कमी होत असताना या संप्रेरकाचा हृदयावर होणारा संरक्षणात्मक प्रभाव कमी होतो, ज्यामुळे रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना हृदयाशी संबंधित समस्यांना अधिक धोका निर्माण होतो.
अचानकच छातीत, चेहर्यावर किंवा मानेच्या भागात गरम झळा आल्यासारखं वाटणं.
रात्रीच्या वेळी खूप घाम येणे.
सतत मूड बदलणे.
झोपेसंबंधी तक्रारी.
योनीचा कोरडेपणा.
अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी.
वरील लक्षणे सर्वज्ञात असली, तरी रजोनिवृत्तीमुळे ऑस्टियोपोरोसिस आणि हृदयरोगासह दीर्घकालीन आरोग्य समस्यादेखील उद्भवू शकतात.
रजोनिवृत्तीमुळे काही महिलांमध्ये हृदयरोगदेखील होऊ शकतो.निरोगी रक्तवाहिन्या राखण्यात आणि कोलेस्ट्रॅालची पातळी व्यवस्थापित करण्यात इस्ट्रोजेन महत्त्वाची भूमिका बजावते. रजोनिवृत्तीचा काळात महिलांनी दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा हृदयरोग तपासणी वेळेवर करून घ्यावी आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्या महिलांना आधीच हृदयरोग आहे आणि ज्यांना रजोनिवृत्तीचा धोका आहे त्यांनी अधिक सतर्क राहावे. या काळात महिलांनी त्यांच्या हृदयाची विशेष काळजी घ्यावी आणि निरोगी जीवनशैली बाळगावी.
संतुलित आहाराचे सेवन : तृणधान्य, फळे, भाज्या, प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश करावा. मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थांचे सेवन मर्यादित करावे. जंक फूड, तेलकट, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळावे. शरीर हायड्रेटेड राखणे आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार पूरक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.
सक्रिय जीवनशैली बाळगा : आठवड्यातून पाच दिवस किमान 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचे व्यायाम करा. धावणे, जिमला जाणे, योगा, पिलेटस्, पोहणे आणि सायकलिंग अशा पर्यायांची निवड करा.
रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीचे निरीक्षण करा. नियमित तपासणीमुळे वेळीच मदत होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचाराचे सेवन करा.
वजन नियंत्रित राखा : लठ्ठपणामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. म्हणून वजन नियंत्रित राखावे.
धूम्रपान टाळा आणि अल्कोहोल मर्यादित करा. कारण, या सवयी हृदयावर ताण आणू शकतात.
तणावाचे व्यवस्थापन : तणाव कमी करण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी योग, ध्यान किंवा दीर्घ श्वास घेण्यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करावा.