

हिवाळा सुरू झाला की अनेकांना हाताच्या आणि पायाच्या बोटांमध्ये सूज येणे, ठणका जाणवणे, तसेच खाज आणि सौम्य वेदना जाणवणे ही समस्या त्रासदायक ठरते. अनेक जण अशावेळी आग, चूल किंवा हीटरला हात-पाय सरळ लावून लगेच उष्णता देण्याचा प्रयत्न करतात; पण हे उपाय शरीराला हानीकारक ठरू शकतात. योग्य पद्धतीने आणि हळूहळू उब दिली तरच सूज कमी होते. यासाठी घरच्या घरी काही उपाय त्वरीत आराम देऊ शकतात.
एका बादलीमध्ये कोमट (जास्त गरम नाही) पाणी घेऊन त्यात हात किंवा पाय पाच-दहा मिनिटे ठेवावेत. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि सूज हलकेच उतरू लागते. हा उपाय दिवसातून दोनदा केला तरी चांगला फरक जाणवतो.
कोमट केलेल्या तेलाने बोटांवर आणि त्यांच्या सांध्याजवळ सौम्य मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. मसाज करताना खूप दाब देऊ नये; हलक्या हाताने गोलाकार हालचाली कराव्यात. यामुळे वेदनामुक्ती जलद मिळते आणि जळजळही कमी होते.
थोडे थंडगार अॅलोवेरा जेल सुजलेल्या जागी लावले की त्वचेला आराम मिळतो. त्यात असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे लालसरपणा कमी होतो आणि त्वचा शांत होते.
एका भांड्यात कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून त्यात हात-पाय बुडवल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. मीठ शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतं.
घराबाहेर जाताना गरम हातमोजे, मोजे आणि कानटोपी वापरल्यास थंड वार्याचा थेट परिणाम कमी होतो. रात्री झोपताना गरम सॉक्स घातले तरी रक्ताभिसरण सुधारते.