

डॉ. संजय गायकवाड
बोटांमध्ये सूज येण्यामागे संधिवात, गाऊट, संसर्ग किंवा मूत्रपिंड, हृदयाशी संबंधित आजार असण्याची शक्यता असते. कारण, ओळखून योग्य उपचार केल्यास ही समस्या सहज नियंत्रणात आणता येते.
1. फ्ल्यूड रिटेन्शन किंवा एडिम : बोटांमध्ये सूज येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीरात पाणी धरून ठेवले जाणे. हे प्रामुख्याने जास्त मीठ खाणे, पाणी कमी पिणे, दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसून राहणे यामुळे होते. महिलांमध्ये मासिक पाळीपूर्व काळात किंवा गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळेही अशी सूज दिसते. सूज कायम राहत असेल, तर मूत्रपिंड, यकृत किंवा हृदयाच्या कार्यावर वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
2. संधिवात : वय वाढल्यास बोटांच्या सांध्यांची झीज होऊन ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास सुरू होतो. यात सांधे सुजतात, कडक होतात आणि वेदना होतात. रुमेटॉईड आर्थरायटिस हा ऑटोइम्युन आजार आहे. यात शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली सांध्यांवरच हल्ला करते. सकाळी उठल्यावर बोटांमध्ये कडकपणा आणि सांध्यांभोवती उष्णता जाणवणे ही याची सुरुवातीची लक्षणे आहेत.
3. गाऊट : गाऊट हा संधिवाताचाच एक प्रकार असून तो शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने होतो. हे अॅसिड सांध्यांमध्ये स्फटिकांच्या स्वरूपात साचून अचानक तीव्र वेदना, लालसरपणा आणि सूज निर्माण होते.
4. संसर्ग : काटे टोचणे, खरचटणे किंवा किड्यांच्या चाव्यांमुळे बोटांत जंतुसंसर्ग होऊ शकतो. अशा वेळी सूज, लालसरपणा, उष्णता आणि वेदना जाणवते. ‘पॅरोनिकिया’ किंवा ‘सेलुलायटिस’ यासारखे संसर्ग त्वचेमध्ये पू साचण्यास कारणीभूत ठरतात. योग्य वेळी उपचार न केल्यास हा संसर्ग रक्ताद्वारे शरीरभर पसरू शकतो. बोटांवरील सूज अनेकदा पडल्याने, ठेच लागल्याने किंवा फ्रॅक्चरमुळे येते.
गर्भधारणेदरम्यान शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि हार्मोन्समुळे द्रव साठण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे बोटे, हात आणि पाय सुजतात. ही सूज विशेषतः शेवटच्या तिमाहीत अधिक दिसते. जास्त वेळ उभे राहणे किंवा बसून राहणे यामुळे ती वाढते. साधारण सूज निरुपद्रवी असते; परंतु अचानक वाढलेली सूज ‘प्री-एक्लॅम्पसिया’ या गंभीर स्थितीचे लक्षण असू शकते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदय, मूत्रपिंड किंवा यकृत नीट कार्य करत नाहीत, तेव्हा शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि सूज येते.