

रोगाचे नाव : शिरःशूल (डोकेदुखी) पित्तप्रधान.
संबंधित व्याधी ः डोळ्यांची आग, डोक्यांत मुंग्या, डोक्यात मार लागल्यासारखे दुखणे, चक्कर, अनिद्रा.
गुरुकुल पारंपरिक उपचार : कपाळावर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवाव्यात. नाकात चांगले तूप घालावे. त्रिफळा, बाहवामगज, मनुका, गुलाबकळी, किंवा दूध, तूप यांसारखे जुलाबाचे सौम्य औषध द्यावे. आपोआप उलटी होत असल्यास वेग आडवू नये. उलटी करावी, बरे वाटते. लघुसुतशेखर, आरोग्यवर्धिनी 3-3 गोळ्या सकाळ-सायंकाळ रिकाम्या पोटी बारीक करून घेणे. झोपताना 1 कप दुधात 1 चमचा चांगले तूप घालून घेणे. पोट साफ नसल्यास रात्रौ 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 चमचा तुपाबरोबर घेणे. अनिद्रा असल्यास निद्राकरवटी 6 गोळ्या 1 कप दुधाबरोबर घेणे. उन्हात जाऊन आल्यावर धन्याचे पाणी प्यावे. विकारातील डोकेदुखी असल्यास विकारातील चिकित्सा चालू ठेवावी व अधिक वरील औषधे घ्यावीत. चक्कर येत असल्यास चंद्रकला रस व लघुसुतशेखर 3-3 गोळ्या, सकाळ- संध्याकाळ रिकाम्या पोटी घ्याव्या. आम्लपित्त असल्यास आम्लपित्तवटी 3 गोळ्या दुपारी व रात्री जेवणानंतर घ्याव्यात. आर्तवकाळात असल्यास गोरादि लघुशेखर तीन तीन गोळ्या घ्याव्यात.
ग्रंथोक्त उपचार ः मौक्तिक भस्म, बृहत् शतावरीघृत, लक्ष्मीविलास रस, लघुसुतशेखर मात्रा, सुवर्णसुतशेखर मात्रा, प्रवाळ भस्म.
विशेष दक्षता व विहार : आहार, विहार नियमित. जागरण नको, मलमूत्र विसर्जन पुरेसे व वेळेवर होते किंवा नाही याकडे लक्ष द्यावे. डोके दुखले तरी बांधून ठेवू नये.
पथ्य : उन्हात जाताना डोक्यावर टोपी असावी, थोडे थोडे तीन-चार वेळा खाणे, जेवण व झोप यांच्या नियमित वेळा पाळाव्यात. मनःस्वास्थ्य आनंदित ठेवावे.
कुपथ्य : तिखट, आंबट, खारट पदार्थ, चहा, व्यसने, अति जागरण, अति विचार, राग, उपवास, अवेळी जेवण, उन्हातून आल्यावर खूप पाणी पिणे, पित्त वाढवणारे पदार्थ खाणे या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
रसायनचिकित्सा : रोज सकाळी 2 चमचे च्यवनप्राश 1 कप दुधाबरोबर घ्यावा. शतावरी कल्प 1 चमचा रोज सकाळी एक कप दुधाबरोबर घ्यावा.
योग व व्यायाम : शवासन.
रुग्णालयीन उपचार ः दुखणार्या जागी जळवा लावून रक्त काढणे. पूर्ण विश्रांती. लो हेड पोझिशन.
अन्य षष्ठि उपक्रम (पंचकर्मादि) : चांगल्या तुपाचे नस्य, रक्तमोक्षण, डोक्याला अभ्यंग करावा.
चिकित्साकाल ः दोन ते तीन दिवस.
निसर्गोपचार ः थंड वातावरण व आनंदी उत्साही मन ठेवावे. उन्हापासून व तीक्ष्ण उष्ण आहार-विहारापासून संरक्षण करावे.
अपुनर्भवचिकित्सा : लघुसुतशेखर 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ, निद्रावटी 6 गोळ्या व 1 चमचा त्रिफळाचूर्ण, तूप रात्री घेणे.
संकीर्ण ः मूळ कारण दूर करावे. उन्हात कामाव्यतिरिक्त फिरू नये. जायचे झाल्यास डोक्याला टोपी, छत्री घ्यावी. मळमळ होत असल्यास आपोआप पित्त पडून जाऊ द्यावे. बरे वाटते. पूर्ण विश्रांती घ्यावी. (लो हेड पोझिशन मध्ये पडून राहावे.)