श्‍वासदुर्गंधीने त्रस्त आहात? ही आहे दशसूत्री!

Published on
Updated on

डॉ. मनोज शिंगाडे

आपला श्‍वास ताजातवाना आणि स्वच्छ असावा, असे प्रत्येकालाच वाटते. जेवण झाल्यावर आणि एरव्ही अनेक जण तोंडाला वास येऊ नये म्हणून वेलची, बडिशेप, सुगंधी सुपारी खात असतात. आपला श्‍वास ताजातवाना ठेवणार्‍या दहा पदार्थांबद्दल थोडक्यात माहिती (information about ten foods that keep your breath fresh) 

1. पाणी 

श्‍वास ताजातवाना आणि दुर्गंधीविरहित ठेवण्यासाठी पाण्यासारखा सोपा आणि प्रभावी मार्ग दुसरा नाही. हा उपाय अंमलात आणायलाही अगदीच सोपा आहे. तोंडात पाणी घेऊन त्याची चूळ भरावी आणि ते पाणी गिळावे किंवा बाहेर फेकावे. हे करण्यामागचा साधा तर्क असा की जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा तोंडात लाळही कमी होते. कारण आपले शरीर ओलसरपणा टिकवून धरण्याचा प्रयत्न करत असते. लाळ तोंडातील जीवाणूंना विरघळवून टाकून तोंड स्वच्छ ठेवत असते. हे जीवाणू आणि तसेच घटक दुर्गंधीयुक्‍त श्‍वासाला कारणीभूत असतात. म्हणूनच पाण्याने चूळ भरण्याने हे जीवाणू नष्ट होतात आणि आपला श्‍वासही दुर्गंधीमुक्‍त होतो. म्हणूनच जेवण झाले किंवा काही खाल्ले किंवा तोंडाला कोरड पडली तर पाण्याने खळखळून चूळ भरा. 

2. संत्री, लिंबू वगैरे आंबट फळे

'क' जीवनसत्त्व असलेली फळे श्‍वास ताजातवाना करण्यासाठी योग्य आहेत. 'क' जीवनसत्त्व जीवाणूंना नष्ट करते. ते अँटिऑक्सिडंटही असते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक कमी होण्यास त्याची मदत होते. ही फळे तुम्ही तशीच खा किंवा त्यांचा रस प्या. 

3. मसाले आणि हर्ब्स 

वेलची, बडिशेप, दालचिनी, लवंग वगैरेसारखे मसाले आणि पुदिना, कोथिंबीर, पार्सले, रोजमेरी, निलगिरी यांसारख्या वनस्पती श्‍वास ताजातवाना ठेवण्यासाठी उपयुक्‍त असतात. निलगिरी आणि वेलचीत सिनेऑल नावाचा घटक असतो. यात प्रतिजैविक आणि संसर्गरोधक घटक असतात. सिनेऑल तोंडातील दुर्गंधी निर्माण करणार्‍या जीवाणूंचा नाश करते आणि आपल्याला तोंड स्वच्छ आणि फ्रेश झाल्यासारखे वाटते. वेलचीचे दाणे दाताखाली चावून खाल्ले की त्यातील विशिष्ट गंध आणि चव आपले तोंड ताजेतवाने करते. पार्सले आणि कोथिंबीरीत असलेल्या क्लोरोफिल या घटकात असलेल्या अल्कलाईन वैशिष्ट्यांमुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. तोंडातील जीवाणूंवर हा घटक हल्ला चढवून त्याला निष्प्रभ करतो. दालचिनी अँटिसेप्टीक आहे आणि दुर्गंधीयुक्‍त श्‍वासाला कारणीभूत जीवाणूंना ती नष्ट करते. बडिशेप ही भारतात अगदी प्राचीन काळापासून माऊथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. यात सुगंधी आणि औषधी गुण आहेत. 

4. दह्यासारखे पदार्थ : दह्यासारखे पदार्थ तोंडातील हायड्रोजन सल्फाईडला नष्ट करतात. दात आणि हिरड्यांच्या समस्या दूर होण्यास त्यामुळे मदत होते. 

5. भाज्या : ब्रोकोली, गाजरे आणि काकड्यांसारख्या फळभाज्या तोंडाला स्वच्छ आणि ताजे ठेवतात. या भाज्या चघळल्याने तोंडात लाळही मोठ्या प्रमाणात तयार होते. 

6. सफरचंद : आपण सफरचंदाचा तुकडा मोडतो, तेव्हा तोंडात लाळ उत्पन्‍न झाल्याचे आपल्यालाही जाणवते. यामुळे तोंडाला अक्षरश: स्वच्छ आंघोळ झाल्यासारखे होते आणि दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू त्यामुळे नष्ट होतात. 

7. च्युईंगम : च्युईंगममुळेही तोंडात लाळ उत्पन्‍न होण्यास मदत होते. च्युईंगममुळे दातात अडकलेले अन्‍नाचे कण बाहेर पडण्यासही मदत होते. 

8. होल व्हीट ब्रेड : हा ब्रेड खाल्ल्याने तोंडात किटोन तयार होणे थांबते. हा घटक लघवी, घाम आणि तोंडावाटे बाहेर पडतो आणि त्याचा अतिशय वाईट गंध असतो. या बे्रडमुळे हे किटोन तयार होत नाही आणि श्‍वास ताजातवाना होतो. 

9. ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये फ्लॅवोनाईड्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते. दालचिनी घातलेला चहा आपले तोंड आणि श्‍वास ताजा ठेवतो. 

10. फायबर : फायबर असलेल्या किंवा तंतुमय भाज्यांमुळे लहान आतडे स्वच्छ राहते. अस्वच्छ लहान आताडे श्‍वासाच्या दुर्गंधीचे एक महत्त्वाचे कारण आहे. फायबरमुळे आपल्या पचनाचा मार्ग निरोगी आणि स्वच्छ राहतो. त्यामुळे दुर्गंधीयुक्‍त श्‍वासाला रोखले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news