Stomach Cancer Treatment | पोटाचा कर्करोग आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

Stomach Cancer Treatment |
Stomach Cancer Treatment | पोटाचा कर्करोग आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
Published on
Updated on

डॉ. हर्षल भोई

जठरांत्र कर्करोग किंवा पोटाचा कर्करोग हा पचनसंस्थेच्या अवयवांमध्ये होणार्‍या कर्करोगांचा समूह आहे. आपली पचनसंस्था अन्न पचवण्यासाठी आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी जबाबदार असते. जेव्हा या पेशींची अनियंत्रित वाढ होते, तेव्हा त्याला कर्करोग म्हणतात.

पोटाच्या कर्करोगाचे काही प्रकार आहेत.

अन्न नलिकेचा कर्करोग : घशापासून जठरापर्यंत अन्न नेणार्‍या नळीमध्ये हा कर्करोग होतो.

जठराचा कर्करोग : हा भारतात अत्यंत सामान्य असून, जठराच्या आतील थरात चालू होतो.

यकृताचा कर्करोग : हा अतिशय घातक असा यकृतांच्या पेशींमध्ये उद्भवणारा कर्करोग आहे.

स्वादूपिंडाचा कर्करोग : हा कर्करोग अन्न पचन करणार्‍या स्वादूपिंड ग्रंथीमध्ये होतो.

पित्ताशयाचा कर्करोग : अतिशय लवकर वाढ होणारा कर्करोग अशी ओळख असलेला हा पित्ताशयाच्या पेशींमध्ये होतो.

छोट्या आतड्याचा कर्करोग : हा काही रुग्णांमध्ये आढळून येतो.

मोठ्या आतड्याचा आणि गुदाशयाचा कर्करोग : हा कर्करोग जगभरात मोठ्या प्रमाणात आढळतो.

पोटाच्या कर्करोगाची काही प्रमुख लक्षणे आहेत. त्यामध्ये सुरुवातीच्या काळात याची लक्षणे सामान्य अपचनासारखी वाटू शकतात; परंतु खालील बदल दिसल्यास सावध राहणे गरजेचे आहे.

पचनशक्तीत बदल : सतत अपचन होणे, छातीत जळजळ होणे किंवा गॅस होणे.

भूक न लागणे : थोडेसे जेवण केल्यावरही पोट भरल्यासारखे वाटणे.

वजन कमी होणे : कोणताही विशेष प्रयत्न न करता अचानक वजन कमी होणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे.

कावीळ होणे : डोळे, शरीर पिवळे होणे, लघवी गडद पिवळी होणे.

रक्तस्राव : मल किंवा उलट्यामध्ये रक्त पडणे किंवा शौचाचा रंग काळा असणे.

गिळण्याचा त्रास : अन्न किंवा पाणी पिताना घशात अडकल्यासारखे वाटणे.

सतत थकवा : शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे अशक्तपणा वाटणे.

पोटाचे कर्करोग होण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

चुकीची जीवनशैली: तंबाखूचे सेवन, धूम्रपान आणि अति प्रमाणात मद्य सेवन करणे.

असंतुलित आहार : जास्त प्रमाणात तेलकट, मसालेदार, डबाबंद अन्न किंवा मिठाचे अतिप्रमाण असणे. जास्त प्रमाणात कीटकनाशके असलेले पदार्थ खाणे.

लठ्ठपणा : शरीराचे अतिरिक्त वजन अनेक प्रकारच्या कर्करोगाला आमंत्रण देते.

आनुवंशिकता : कुटुंबात कोणास कर्करोग असल्यास याचा धोका वाढू शकतो.

कर्करोगाचे निदान पुढीलप्रमाणे केले जाते. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तो बरा होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात :

एंडोस्कोपी, सी.टी. स्कॅन, एम. आर. आय.

बायोप्सी - गरज पडल्यास.

कर्करोग बरा करण्याच्या काही उपचार पद्धती आहेत. त्यापुढीलप्रमाणे आहेत.

शस्त्रक्रिया : बहुतांश पोटाच्या कर्करोगांमध्ये शस्त्रक्रिया करून गाठ काढल्याने कर्करोग बरा होण्याची शक्यता असते.

किमोथेरपी : औषधे देऊन रक्तातील आणि शरीरात तयार झालेल्या गाठीची वाढ थांबवता येते.

रेडिएशन थेरपी : उच्च क्षमतेच्या किरणांचा वापर करून गाठ आकुंचन पावली जाते.

दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेचे फायदे

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज कर्करोगाच्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि प्रभावी झाल्या आहेत. पूर्वी कर्करोगाची गाठ काढण्यासाठी पोटावर मोठा काप घ्यावा लागायचा; परंतु आता लॅपरोस्कोपी किंवा ‘की होल सर्जरी’ मुळे हे चित्र बदलले आहे.

कमी वेदना आणि कमी रक्तस्राव होत असल्यामुळे वेदनाशामक औषधांची कमी गरज भासते. तसेच अचूकता आणि स्पष्टता असल्यामुळे लॅपरोस्कोपीमध्ये उच्च क्षमतेचा कॅमेरा असतो, जो शरीरातील अवयवांना 10 ते 15 पटीने मोठे करून स्क्रीनवर दाखवतो. यामुळे कर्करोगाची गाठ, रक्तवाहिन्या आणि सूक्ष्म नसा स्पष्टपणे दिसतात व गाठ पूर्णपणे काढून टाकण्यास मदत होते.

जलद रिकव्हरी होत असल्यामुळे पचनसंस्थेचे कार्य लवकर पूर्ववत होते. मोठा काप नसल्यामुळे रुग्ण 24 तासांच्या आत चालू-फिरू शकतो आणि तोंडाने आहार लवकर सुरू होऊ शकतो.

या शस्त्रक्रियेत संसर्गाचा कमी धोका असतो. छोटे काप असल्यामुळे आणि शरीरातील अंतर्गत अवयव बाहेरील वातावरणाशी कमी संपर्कात आल्यामुळे संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. केमोथेरपीसाठी वेळेची बचत होत असल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर लवकर केमोथेरपी चालू करता येते. त्यामुळे पोटाच्या कर्करोगाच्या उपचारात लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया ही रुग्णांसाठी एक वरदान ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news