डॉ. आनंद ओक
कानात भुंग्याप्रमाणे किंवा घासल्याप्रमाणे, तर काळीवेळा कुजबुजल्याप्रमाणे आवाज येतात, त्याला कर्णनाद म्हटले जाते. वाढत्या वयात जास्त प्रमाणात होणारा हा त्रास काहीवेळा तरुण वयातही आढळतो.
या विकाराची अनेक कारणे आढळून येतात. प्रत्येकामध्ये ती भिन्न असू शकतात. कानामधे अडकून राहिलेला मळ, बाह्य कर्णामध्ये मांस वाढणे, कानात गेलेली किड्यासारखी वस्तू, कान टोकरताना झालेली जखम, कानाला आतून आलेली सूज, कान फुटणे, वाहणे, कानात वारंवार पाणी जाऊन होणारा जंतुसंसर्ग, कानाला बसलेला दडा, वारंवार विमान प्रवासाने होणारा हवेचा आघात, कानाच्या शिरेला आलेली सूज, शिरेची दुर्बलता, काही रासायनिक दुष्परिणाम, कानाजवळील गाठीचा दाब, मेंदूतील कॅन्सरची गाठ या कारणांमुळे कर्णनादाचा त्रास होतो.
काहीवेळा अॅनिमिया, ल्युकेमिया, युरीमिया, उच्च रक्तदाब, अर्धशिशी, दाताच्या मुळांची सूज, अति मानसिक तणाव, हेडफोनचा अतिवापर या कारणांनी देखील कर्णनाद होत असतो. हा त्रास सुरू झाल्यावर कान, नाक, घसा तज्ज्ञाच्या सल्ल्याने आधुनिक उपचार होऊनही तितकासा फरक न पडल्यास रुग्णांनी नाराज न होता आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून शास् ीय आयुर्वेदिक उपचार करून घ्यावेत. आयुर्वेदिक उपचार करताना कर्णनादाच्या कारणाचे निदान करून त्यानुसार औषधांची योजना केली जाते. आयुर्वेद शास्त्रानुसार कर्णनाद विकारात मुख्यतः वातप्रकोप हे कारण असते. त्यामुळे विविध वातशामक औषधे वापरावी लागतात.
दशमूळ, गुगुळ, वरुण, अन्यगंधा, शतावरी, कोहाळा, त्रिफळा, कवचबीज, बला रसोन, एरंड आणि माशीक, अभ्रक, गोदंती, रौप्य, सुवर्ण इ. भस्म औषधांचा वापर करावा लागतो. वातशामक औषधांनी सिद्ध तेलाचे थेंब कानात घालणे. उदा. बिल्वतेल म्हणजेच कर्णपुरण, औषधी तेलाने डोक्याला अभ्यंग करणे, नस्यकर्म, शिरोपिचू, शिरोबस्ती, शिरोधारा हे उपक्रम ठराविक काळापर्यंत रोज केले असता, अनेक रुग्णांना आश्चर्यकारक फायदा मिळतो. काही रुग्णांना बस्ती हे पंचकर्मदेखील करावे लागते. हे उपचार करतानाच उच्च रक्तदाब, मधुमेह इ. विकार असल्यास त्यावरील स्मरण असणारे, आधुनिक उपचारही सुरू ठेवावे लागतात.