त्वचा आणि केसांची काळजी हवीच! | पुढारी

Published on
Updated on

डॉ. रिंकी कपूर

गर्भधारणा ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक सुंदर वेळ असते. या कालावधीत तिच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. गरोदरपणात तसेच गरोदरपणानंतर हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे त्वचा, केसांमध्ये तसेच स्वभावात बदल दिसून येतो. काही स्त्रियांना संपूर्ण गर्भधारणेदरम्यान त्यांच्या त्वचा किंवा केसांमध्ये कोणताही बदल जाणवत नाही. परंतु, बहुतेक स्त्रियांना डोळ्याभोवती काळी वर्तुळे, पिग्मेंटेशन, ओठ फाटणे, त्वचेवर चट्टे पडणे, मुरूम उठणे, व्हेरीकोज व्हेन्स, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी, भेगा पडलेल्या टाचा, नखे आणि केसांची वाढ खुंटणे अशा अनेक समस्या उद्भवतात. काही स्त्रियांना ओटीपोटात आणि मांडी तसेच त्याच्या आसपास त्वचेवर खाज सुटते किंवा लाल रंगाचे पुरळ उठू शकतात.

गर्भारपणात महिलांनी स्वतःच्या त्वचेची आणि केसांची वेळीच विशेष काळजी घेतल्यास या समस्या टाळता येऊ शकतात. परंतु, यासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. याशिवाय, अनेक महिला गरोदरपणात विविध रसायनांचा वापर करतात. यामुळेही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरगुती उपचार करणं या काळात अतिशय फायदेशीर ठरू शकतं. 

त्वचेची काळजी

– घराबाहेर पडताना प्रत्येकवेळी सनस्क्रीनचा वापर करा तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री तसेच टोपीचा वापर करावा आणि रुंद ब्रीम्ड टोपी घाला. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.

• सॅलिसिलिक अ‍ॅसिड किंवा रेटिनोइड, आयसोट्रेटीनोईन आणि ओरल टेट्रासाइक्लिन असलेली उत्पादने वापरू नका. कारण, यामुळे बाळामध्ये जन्मदोष उद्भवू शकतात.

• मेकअप आणि त्वचेकरिता वापरली जाणारी उत्पादने सुंगंधविरहित असणे गरजेचे आहे.

• झोपायच्या आधी दररोज न चुकता आपला मेकअप काढणे आवश्यक आहे.

• त्वचेला मॉईश्चराईज करा.

• दिवसातून दोनदा कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

• जास्त जोरात आपली त्वचा घासू नका. अंग पुसण्यासाठी स्वच्छ आणि मुलायम कापड वापरा.

• मुरुमांवर उपचार करण्यासाठी आपण ओटीसी उत्पादने वापरू शकता, ज्यात टॉपिकल बेंझॉयल पेरोक्साईड, अझेलिक एसिड आणि ग्लाइकोलिक एसिड आहेत. परंतु, प्रथम आपल्या त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्या.

• शक्य तितका आराम करा आणि ताण घेऊ नका.

केसांची काळजी कशी घ्याल?

• गरोदरपणात हेअर स्टाईलिंगला तात्पुरता ब्रेक द्या. केस रंगविणे, हायलाईट करणे, केराटिन केस ट्रिटमेंट करणे टाळा. केसांकरिता नैसर्गिक पर्यायांचाच वापर करा.

• गर्भधारणेदरम्यान किंवा नंतरच्या काळात मिनोऑक्सिडिल हेअर ट्रिटमेंटचा वापर करू नका.

• केस रंगविण्याकरिता रसायनांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा पर्याय निवडा.

• केसांची निगा राखण्यासाठी संतुलित आहार घ्या. तसेच योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

• ओले केस विंचरू नका.

• केस घट्ट बांधू नका

• केसांची स्वच्छता राखा.

केसांच्या समस्या टाळण्यासाठी घरगुती उपाय

4 ते 5 चमचे कोरफड जेल, दोन चमचे एरंडेल तेल आणि एक चमचा ग्लिसरीनचे मिश्रण टाळूपासून केसांच्या शेंड्यापर्यंत लावावे. त्यानंतर एक तासाने केस स्वच्छ धुवावे. हे आपल्या केसांना मजबुती आणि चमक देतील.

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. त्यांची पेस्ट करा आणि आपल्या केसांवर लावा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. हे केसांच्या वाढीस मदत करेल.

कढीपत्त्याची पाने नारळ तेलात उकळा आणि थंड होऊ द्या. हे मिश्रण केस धुण्यापुर्वी 1 ते 3 तास आधी वापरा.

आपल्या आवडीच्या तेलामध्ये 1-2 थेंब तीळ तेल मिसळा आणि केस धुण्यापूर्वी टाळूवर मालिश करा. वेगवेगळ्या आवश्यक तेलांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, केसांच्या वाढीसाठी लेव्हेंडर ऑईल चांगले असते. जाडी वाढविण्यासाठी रोझमेरी तेलाचा वापर करा.

 निरोगी दिनचर्या ठेवून संतुलित आहार आणि दैनंदिन व्यायामाने आपण गरोदरपणात तसेच प्रसूतीनंतरही त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम ठेवू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news