

डॉ. भारत लुणावत
सिटिंग-रायझिंग टेस्ट ही एक अत्यंत उपयुक्तआणि सोपी चाचणी म्हणून वैद्यकीय जगतात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात आहे. सिटिंग-रायझिंग टेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने उभ्या अवस्थेतून जमिनीवर कोणताही आधार न घेता सहज बसणे आणि नंतर तसेच कोणतीही मदत न घेता उभे राहणे.
आजच्या धकाधकीच्या आणि बसून राहणार्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे, ही मोठी गरज बनली आहे. आपण नेहमी रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल यांसारख्या चाचण्या करतो; परंतु या चाचण्या शरीराच्या एकंदर कार्यक्षमतेचा अंदाज देतातच असे नाही. शरीर किती लवचिक आहे, संतुलन किती चांगले आहे, स्नायू किती मजबूत आहेत आणि कोणत्याही आधाराशिवाय सहजपणे हालचाल करता येते का — या गोष्टींवरदेखील दीर्घकाळचा आरोग्याचा दर्जा आणि आयुष्याची गुणवत्ता अवलंबून असते. हे लक्षात घेता, सिटिंग-रायझिंग टेस्ट ही एक अत्यंत उपयुक्त आणि सोपी चाचणी म्हणून वैद्यकीय जगतात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात आहे.
सिटिंग-रायझिंग टेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने उभ्या अवस्थेतून जमिनीवर कोणताही आधार न घेता सहज बसणे आणि नंतर तसाच कोणतीही मदत न घेता उभे राहणे. ही कृती शक्य तितक्या नैसर्गिक पद्धतीने आणि स्थिरतेसह पूर्ण करावी लागते. ही चाचणी करताना व्यक्तीला एकूण 10 गुण दिले जातात. त्यातील 5 गुण बसण्याच्या प्रक्रियेसाठी आणि 5 गुण उभे राहण्यासाठी असतात. जर व्यक्तीने बसताना किंवा उठताना कोणताही आधार — जसे की हात, गुडघा, कोपर — घेतला, तर प्रत्येक आधारासाठी 1 गुण कमी केला जातो. हालचाल अस्थिर असेल, तर 0.5 गुण वजा होतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याने बसताना एक हात व एक गुडघा टेकवला, आणि उठताना दोन हात वापरले, तर त्याचा स्कोअर 10 पैकी 5 राहील.
ही चाचणी खरोखर प्रभावी ठरते का, यावर 2017 साली ब्राझीलमधील क्लिनिमेक्स या संस्थेने 4300 व्यक्तींवर एक मोठा अभ्यास केला होता. त्यातील निरीक्षणानुसार ज्यांचा स्कोअर 0 ते 4 होता, त्यांचा मृत्यूदर तब्बल 42 टक्के राहिला; तर 9 ते 10 स्कोअर असणार्यांचा मृत्यूदर फक्त 3.7 टक्के होता. अभ्यासकांच्या मते, कमी स्कोअर असलेल्या व्यक्तींना नैसर्गिक मृत्यू होण्याचा धोका 300 टक्क्यांनी अधिक आणि हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 500 टक्क्यांनी अधिक होता. या निष्कर्षावरून स्पष्ट होते की सिटिंग-रायझिंग टेस्ट ही शरीराच्या एकंदर कार्यक्षमतेसह आरोग्याच्या दीर्घकालीन स्थितीचा योग्य अंदाज देऊ शकते.
या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चाचणी कोणत्याही उपकरणांशिवाय, अगदी घरच्या घरीही करता येते. यासाठी वेळ लागतो फक्त 30 सेकंद. ही चाचणी शरीराच्या नॉन-एरोबिक फिटनेसची तपासणी करते. यात शरीराची लवचिकता, स्नायूंची ताकद, शरीराचा समतोल आणि हालचालीतील समन्वय या सर्व गोष्टी एकाच वेळी तपासल्या जातात. यामध्ये दमछाक होणारी हालचाल नाही, त्यामुळे वृद्ध आणि अशक्त व्यक्तींमध्येही योग्य काळजी घेऊन ही चाचणी करता येते. पारंपरिक व्यायाम चाचण्या म्हणजेच जलद बसणे-उठणे, पुशअप्स किंवा धावण्याच्या चाचण्या अनेकदा प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित नसतात आणि त्या प्रत्येकासाठी शक्यही नसतात. पण सिटिंग-रायझिंग टेस्ट ही दैनंदिन हालचालींवर आधारित असल्यामुळे ती अधिक उपयुक्त आणि विश्वासार्ह ठरते. वृद्धांमध्ये तर ही चाचणी फारच उपयुक्त ठरते. कारण, वय वाढत गेल्यावर शरीराचे संतुलन, लवचिकता आणि स्नायूंची ताकद हळूहळू कमी होत जाते. या चाचणीतून भविष्यात पडण्याचा किंवा हालचाल करताना आधाराची आवश्यकता भासण्याचा धोका किती आहे, याची कल्पना येऊ शकते. स्कोअर कमी असेल, तर त्या व्यक्तीसाठी नियमित स्ट्रेचिंग, बॅलन्स व्यायाम, योगासने, वेट ट्रेनिंग अशा माध्यमातून कार्यक्षमता वाढवण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
ही चाचणी प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट किंवा योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी. ज्या व्यक्तींना सांधेदुखी, गुडघ्यांचे ऑपरेशन, मणक्यांचे आजार किंवा अलीकडे अपघात झालेला असेल, तर अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही चाचणी करावी. चाचणी करताना आजूबाजूला मोकळी जागा असावी, पडण्याचा धोका नसावा.
आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर फक्त तपासण्या करून उपयोग नाही, तर त्यातील निष्कर्षांनुसार कृती करणेही गरजेचे आहे.