

डॉ. प्राजक्ता पाटील
रात्री झोपताना वाय-फाय राऊटर बंद करावा का, किंवा मोबाईल डेटा बंद ठेवणे गरजेचे आहे का, हा प्रश्न तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकालाच सतावतो आहे. अनेक जण किरणोत्सर्गाच्या भीतीपोटी किंवा आरोग्यावर होणार्या विपरीत परिणामांमुळे रात्री ही उपकरणे बंद ठेवणे पसंत करतात. समाजमाध्यमांवर या विषयाबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी विज्ञानाच्या कसोटीवर याची वस्तुस्थिती जाणून घेणे रंजक ठरेल.
वाय-फाय आणि मोबाईल लहरींचा मानवी आरोग्यावर आणि विशेषतः मेंदूवर नेमका काय परिणाम होतो, यावर तज्ज्ञांमध्ये सखोल चर्चा सुरू आहे. वाय-फाय लहरी आणि आरोग्याचा संबंध तपासताना तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या लहरींमुळे मेंदूला थेट इजा होते, हे अद्याप कोणत्याही शास्त्रीय प्रयोगातून सिद्ध झालेले नाही. मात्र, मानवी मेंदू हा सूक्ष्म विद्युत लहरींच्या (ब्रेन इम्पल्सेस) माध्यमातून कार्य करतो आणि वाय-फाय सारखी उपकरणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डवर आधारित असतात. तर्कसंगत विचार केल्यास, या बाह्य लहरी मेंदूच्या नैसर्गिक लहरींमध्ये थोडा अडथळा निर्माण करू शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही. मेंदूतील पेशी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ज्या विद्युत-रासायनिक लहरींचा वापर करतात, त्यांना ‘अॅक्शन पोटेंशियल’ म्हटले जाते. या लहरींच्या माध्यमातूनच आपण स्पर्श, चव किंवा गंध अनुभवू शकतो.
रात्रीच्या वेळी वाय-फाय बंद करण्यामागचा मुख्य तर्क हा आहे की, दिवसा आणि रात्री शरीराची कार्यपद्धती भिन्न असते. रात्री मेंदू ‘स्लीप वेव्हज’मध्ये काम करत असतो आणि गाढ झोप शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. काही तज्ज्ञांच्या मते, रात्री वाय-फाय बंद केल्यास मेंदूला कोणत्याही बाह्य अडथळ्याविना पूर्ण विश्रांती मिळू शकते. मात्र, हे केवळ सल्ल्यापुरते मर्यादित आहे. वाय-फाय चालू राहिल्याने मेंदूचे थेट नुकसान झाल्याचा कोणताही पक्का पुरावा आजघडीला उपलब्ध नाही. तरीही कोणत्याही प्रकारच्या रेडिएशनचा संपर्क जितका कमी असेल, तितके ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
मोबाईल फोनबद्दल बोलायचे झाले, तर ते देखील रेडिएशन उत्सर्जित करतात. परंतु, त्यांचे प्रमाण हे आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक पार्श्वभूमीतील किरणोत्सर्गापेक्षा फार जास्त नसते. केवळ वाय-फाय किंवा मोबाईलमुळेच मोठा धोका निर्माण होतो, हे सांगणे कठीण आहे. आपल्या घरातील टीव्ही, फ्रीज आणि एअर कंडिशनर यांसारखी उपकरणे देखील कमी-अधिक प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी सोडत असतात. त्यामुळे केवळ एकाच उपकरणाला जबाबदार धरणे विज्ञानाला मान्य नाही.
तज्ज्ञांच्या मते, या विषयावर अद्याप अधिक सखोल संशोधनाची गरज आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा मानवी शरीरावर दीर्घकालीन काय परिणाम होतो, याचे ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरीही खबरदारी म्हणून काही साधे उपाय करणे केव्हाही चांगले. उदाहरणार्थ, वाय-फाय राऊटर आपल्या झोपण्याच्या खोलीत न ठेवता तो बाहेरच्या भागात लावावा. झोपताना मोबाईल उशीपाशी ठेवण्याऐवजी तो किमान पाच ते सात फूट लांब ठेवावा. तसेच, रात्री मोबाईल डेटा बंद ठेवल्यास केवळ लहरींपासून बचाव होत नाही, तर वारंवार येणार्या नोटिफिकेशन्समुळे मोडणारी झोपही टाळता येते.
एकंदरीत पाहता, रात्री वाय-फाय किंवा मोबाईल डेटा चालू राहिल्याने तातडीने कोणताही जीवघेणा धोका उद्भवत नाही, हे स्पष्ट आहे. मात्र, गाढ झोप आणि डिजिटल उपकरणांपासूनचा दुरावा हा मानसिक शांततेसाठी निश्चितच उपकारक ठरतो. अनावश्यक वेळी ही उपकरणे बंद ठेवणेही एक आरोग्यदायी सवय ठरू शकते.