Calcium and Vitamin D | कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी एकत्रित घ्यावे का?

should calcium and vitamin d be taken together
Calcium and Vitamin D | कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी एकत्रित घ्यावे का?Pudhari File Photo
Published on
Updated on

डॉ. संजय गायकवाड

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे दोन्ही घटक मजबूत, निरोगी हाडे टिकवण्यासाठी आवश्यक पोषकतत्त्वे आहेत. हाडांच्या आरोग्यात प्रत्येकाचे कार्य वेगळे असले, तरी हे दोन्ही एकत्र घेतल्यास जास्त चांगले परिणाम मिळतात.

कॅल्शियम हा एक खनिज घटक असून तो हाडांना रचना आणि मजबुती देतो, तर व्हिटॅमिन डी हे जीवनसत्त्व असून ते हाडांच्या वाढीस मदत करते. साधारणपणे प्रौढांना दररोज 1,000 ते 1,200 मिलिग्रॅम कॅल्शियमची गरज असते, तर बहुतेक प्रौढांना दररोज 600 ते 800 आय.यू. व्हिटॅमिन डीची गरज असते. वय, त्वचेचा रंग किंवा काही आरोग्य स्थिती यांच्या आधारावर काहींना यापेक्षा अधिकही लागू शकते.

कॅल्शियम हाडांना त्यांची रचना आणि मजबुती देते. ते शरीराच्या इतर अनेक भागांतदेखील वापरला जाते. त्यामुळे जर आपण पुरेसे कॅल्शियम घेतले नाही, तर शरीर हाडांमधून कॅल्शियम खेचून घेऊ शकते आणि यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. हाडांच्या आरोग्याच्या बाबतीत व्हिटॅमिन डीचे मुख्य कार्य म्हणजे आतड्यात कॅल्शियमचे शोषण सुलभ करणे. पुरेसे व्हिटॅमिन डी नसल्यास कॅल्शियम आपले काम नीट करू शकत नाही. त्यामुळे कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व एकत्र घेतल्यास हाडे मजबूत करणारा लाभ अधिक मिळतो.

संशोधनानुसार व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंटस् एकत्र घेतल्यास हाडांच्या खनिज घनतेत वाढ होते आणि हे परिणाम फक्त एकाच घटकाची सप्लिमेंट घेतल्यापेक्षा अधिक चांगले असतात. विशेषतः वयस्कर व्यक्ती आणि रजोनिवृत्ती झालेल्या महिलांसाठी यांची गरज अधिक असते. अ‍ॅक्टिव्हेटेड व्हिटॅमिन डी आतड्यातील रिसेप्टरला जोडतो आणि अन्न किंवा सप्लिमेंटस्मधून कॅल्शियम शरीरात शोषून घेण्याची प्रक्रिया सुरू करतो. शक्य असेल, तर पोषकतत्त्वे अन्नातून घेणे हे नेहमीच सर्वोत्तम असते. कारण, अन्नातील पोषकतत्त्वे शरीराला अधिक सहज शोषता आणि वापरता येतात.

यासाठी दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, हाडांसह मासे (उदा. सार्डिन्स किंवा कॅनमध्ये मिळणारे सॅल्मन) असे कॅल्शियमयुक्त अन्न अधिक प्रमाणात घेणे आवश्यक ठरते. तसेच मासे, अंडी, मशरूम आणि फॉर्टिफाईड दूध हे व्हिटॅमिन डीयुक्त अन्न घेणेही महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी अन्नाचे स्रोत मर्यादित असून त्यातही कमी प्रमाणातच हे जीवनसत्त्व असते. त्यामुळे लोकांना पुरेसे व्हिटॅमिन डी मिळावे म्हणून सप्लिमेंटस् घ्यावे लागतात.

खरे पाहता सूर्यप्रकाश शरीराला नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत करतो; मात्र खूप जास्त प्रखर सूर्यप्रकाश घेतल्यास त्वचारोगासारखे इतर आरोग्य धोके उद्भवू शकतात. सबब सकाळच्या कोवळ्या उन्हात अर्धा तास थांबा. सप्लिमेंट घेण्यापूर्वी लक्षात ठेवावे की, प्रौढांसाठी व्हिटॅमिन डीचे कमाल प्रमाण दररोज 4,000 आय.यू. आहे. व्हिटॅमिन डी हे चरबीत विरघळणारे असल्यामुळे ते शरीरात साठू शकते आणि वेळोवेळी वाढू शकते. कोणतेही नवीन सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news