नागीण : कारणे  आणि उपाय

Published on
Updated on

डॉ. मनोज कुंभार

अमेरिकेत गेल्या काही वर्षांत 45 लाख जणांना हार्पिस सिम्पेक्स व्हायर (एचएसव्ही) या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेत दरवर्षी या रोगाचे पाच लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. या रोगाविषयी विशेष बाब म्हणजे 80 टक्के रुग्णांना आपल्याला या व्याधीची बाधा झालेली आहे, हे कळतच नाही. या रोगाची जी लक्षणे जाणवतात, त्यावरून आपल्याला ही प्राणघातक व्याधी झालेली आहे, याचे निदान रुग्णांना होऊ शकत नाही. 

हार्पिस या नावाने ओळखल्या जाणार्‍या व्याधीचे दोन प्रकार आहेत. यातला पहिला प्रकार आहे एचएसव्ही-1.  ही व्याधी मुख्यतः चेहर्‍याच्या भागात होते. चेहर्‍याच्या भागात म्हणजे प्रामुख्याने ओठांवर या व्याधीचे परिणाम आढळून येतात. दुसरी व्याधी एचएसव्ही-2 ही व्याधी प्रामुख्याने माणसाच्या लैंगिक अवयवांना बाधित करते.

 ही व्याधी प्राणघातक असल्याचे वैद्यकीय संशोधनातून दिसून येत आहे. त्यामुळे या व्याधीवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. ही व्याधी रुग्णाशी थेट शारीरिक संपर्क आल्यास पसरते. म्हणजे ही व्याधी झालेल्या रुग्णाशी शारीरिक संबंध ठेवल्यास तसेच चुंबन घेतल्यास या व्याधीचा संसंर्ग होतो. तसेच ही व्याधी झालेल्या रुग्णाच्या कातडीवरून रोगाचा संसर्ग होतो. या व्याधीमुळे रुग्णांची प्रतिकारशक्‍ती चांगलीच कमी होऊन जाते. त्याचबरोबर या व्याधी झालेल्या रुग्णांना मानसिक ताणही येतो. अशा व्यक्‍ती लवकर भावनाशील बनतात, असेही दिसून आले आहे. एखाद्या विवाहित स्त्रीला बाळंतपणात ही व्याधी झाली तर तिच्या होणार्‍या बाळालाही या व्याधीचा संसर्ग होतो. तसेच, तिच्या बाळाची प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची अधिक शक्यता असते. ही व्याधी आईच्या पोटातूनच घेऊन जन्माला आलेल्या मुलांना मेंदूच्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. तसेच, अशी मुले जन्मतःच मृत निपजतात. जी मुले जगतात त्यांच्या चेहर्‍यावर मोठ्या प्रमाणावर रॅशेस आलेले दिसतात. तसेच त्यांना दृष्टीच्याही समस्या जाणवू लागतात. 

एचएसव्ही व्याधी झालेल्या रुग्णांना एचआयव्हीचे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. या व्याधीवर आयुर्वेदात उपचार सांगण्यात आलेले आहेत. ही व्याधी आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली नसल्यामुळे तसेच आपल्या आहाराकडे लक्ष पुरवित नसल्यामुळे उद्भवते, असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. शरीराला आवश्यक तेवढी झोप न घेणे, शरीराला आवश्यक तो आहार न घेणे यातूनच ही व्याधी उद्भवते, असेही आयुर्वेद सांगते. तसेच हल्‍लीच्या काळात वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारची विषद्रव्ये माणसाच्या शरीरात साठू लागली आहेत. या सर्व दोषांचा जेव्हा अतिरेक होतो, तेव्हा हार्पिस या व्याधीला आपल्याला सामोरे जावे लागते, असे आयुर्वेदात नमूद केले आहे. रक्‍त शुद्ध नसणे तसेच आपल्या पित्त दोषात असंतुलन होणे ही हार्पिस व्याधी होण्याची मुख्य कारणे आहेत. अन्नाचे व्यवस्थित पचन न होणे, आहाराच्या चुकीच्या सवयी, आहारात मसालेदार, तेलकट, तिखट अधिक प्रमाणात खाणे, मिठाचे प्रमाण अधिक असणे यामुळे आपली पचनशक्‍ती पूर्णपणे बिघडून जाते. असे झाल्यामुळे आपल्या शरीरातून जे स्राव पाझरत असतात त्याच्यावर विपरित परिणाम होतो. परिणामी, शरीरातील अन्न पचत नाही. अन्न न पचल्यामुळे त्यातून जो पौष्टिक भाग शरीराला पुरवला जाणार असतो, तो शरीराला मिळत नाही. अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे शरीरात आमवात निर्माण होतो आणि त्याचा परिणाम रक्‍त अशुद्ध होण्यात होतो. रक्‍त अशुद्ध झाल्याने आपल्या त्वचेवर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसू लागतात. 

आयुर्वेदात या व्याधीवर अनेक उपचार सांगितले आहेत. सर्वप्रथम शरीरातील दोषांचे संतुलन साधणे, ही उपचाराची पहिली पायरी आहे. आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ या दोषांचे संतुलन आपल्या आहारातील बदलामुळे साधता येते. तसेच शरीराला आवश्यक त्या पौष्टिक घटकांचा पुरवठा आहारातून केल्यास या तीन दोषांचे संतुलन साधता येते. तसेच यातून आपल्या रक्‍तात जी विषद्रव्ये साठलेली आहेत, तीही काढून टाकली जातात. शरीरातील विषद्रव्ये काठून टाकल्यावर आपल्या प्रतिकार शक्‍तीवर चांगला परिणाम होतो, आपल्या प्रतिकार शक्‍तीत हळूहळू वाढ होऊ लागते. ही व्याधी प्रामुख्याने मनुष्याची प्रतिकार शक्‍ती कमी झाल्यामुळे होते, असे दिसून आले आहे. आयुर्वेदात शरीराची प्रतिकार शक्‍ती वाढविण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यामुळे आपली प्रतिकार शक्‍ती कशी सुदृढ करतो, यावर या व्याधीला आपण कसे तोंड देणार, हे अवलंबून असते. यासाठीचा आहार आयुर्वेदात खालील प्रमाणे सुचविण्यात आलेला आहे. 

अन्न हे पूर्ण ब्रह्म, असे आपण म्हणत असतो; मात्र आपण कोणते अन्न खातो, याकडे आपले हवे तेवढे लक्ष असत नाही. त्यामुळे आपला आहार संतुलित, पौष्टिक असला पाहिजे. आपल्या शरीरातील कोणत्या दोषाचे असंतुलन झाले आहे, याचे निदान करून घेऊन त्यानुसार आहार घेतला पाहिजे. ताज्या भाज्या खाणे, भरपूर फळे खाणे, मासे, अंडी यासारखे पदार्थही ही व्याधी झालेल्या रुग्णांनी आपल्या आहारात समाविष्ट करायला हवेत. तसेच, ही व्याधी झालेल्या रुग्णांनी आपल्या झोपेकडेही लक्ष दिले पाहिजे. शरीराला पुरेशी झोप मिळाली तरच आपले मन आणि शरीर ताजेतवाने राहू शकते. गाढ झोप लागली तर शरीरातील अनेक हार्मोन्स पाझरू लागतात. या हार्मोन्समुळे आपली प्रतिकारशक्‍ती वाढीला लागत असते. गाढ झोप लागण्याकरिता आपण शरीराला तेवढा व्यायाम दिला पाहिजे. रात्री उशिरापर्यंत जागणे, तसेच कामानिमित्त सकाळी लवकर उठणे याचा परिणाम आपल्याला अपुरी झोप मिळण्यात होतो. म्हणून शरीराला आवश्यक तेवढी झोप आपण घ्यायलाच हवी. तसेच योगासने, प्राणायाम याच्या माध्यमातून आपण आपल्या प्रतिकारशक्‍तीत वाढ करू शकतो. प्राणायामात आपली प्रतिकारशक्‍ती मजबूत करण्यासाठी श्‍वासाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. शरीरावर आणि मनावर येणार्‍या ताणामुळेही ही व्याधी उद्भवू शकते. मनावर येणारा ताण हा प्राणायामाच्या माध्यमातून दूर करता येतो. तसेच शरीरातील चरबीचे प्रमाण वाढणे, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, साखरेचे प्रमाण वाढणे यामुळे आपली प्रतिकारशक्‍ती कमजोर होत असते. म्हणून साखर प्रमाणातच शरीरात गेली पाहिजे. चरबी वाढण्यासारखे पदार्थ अतिप्रमाणात खाऊ नयेत, व्यायामाद्वारे आपल्या शरीरातील चरबी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे याद्वारेही आपल्याला प्रतिकारशक्‍ती वाढवता येऊ शकते.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news