पुढारी ऑनलाईन डेस्क
गुप्तरोग झाल्यामुळे व्यक्तीला लैंगिक समस्या निर्माण होते का? असा एक प्रश्न सध्या अनेकांना सतावत आहे. याच विषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. राहुल पाटील सांगतात की, गुप्तरोगामुळे गंभीर अशी लैंगिक समस्या होत नाही. पण लैंगिक अवयवाला खाज येणे, वेदना होणे, जखम होणे, ताप यामुळे सेक्सची इच्छा कमी होणे, ताठरता जाणे अशा समस्या जाणवतात. गुप्तरोग बरा झाला की लैंगिक अवयव परत नीट काम करू लागतात. शरीरावर गुप्तरोगाचे काही डाग उठले असतील तर त्याने काहींना शरीर उजेडात बघून काम इच्छा होत नाही. असे वेगळे परिणाम दिसतात. अशावेळी त्वचारोग आणि लैंगिक समस्यातज्ञांना भेटून त्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
वेगवेगळे लैंगिक आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शन करताना डॉ. पाटील यांनी, असुरक्षित संबंध करून वेगवेगळ्या गुप्तरोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. पुढील व्यक्ती आजाराने पीडित आहे की नाही, हे त्याला नुसते पाहून समजत नसते. त्यामुळे पार्टनरचा लैंगिक इतिहास, त्याचे लैंगिक आरोग्य याचा अंदाज करता येत नाही किंवा घाईघाईत तपासणी केली जात नाही. बरेचसे गुप्तरोग योग्य प्रतीचा कंडोम नियमित वापरला तर टाळता येतात. यामध्ये दोघेही एकमेकांना सहज फसवू शकतात, हे विसरू नये. एका निरोगी व्यक्तीबरोबर सेक्स करणार असाल तर प्रोब्लेम नाही. पण अनेक व्यक्तींबरोबर करणार असाल तर फक्त आणखी एका निरोगी व्यक्तीबरोबर सेक्स आनंद घेता येईल. खरेतर सर्वांना हे शक्य होईल असे नाही. गुप्तरोग, HIV टाळण्यासाठी कंडोम नियमित वापरणे, चुंबन घेणे टाळणे, लैंगिक स्त्राव एकमेकांना लागू नये याची खबरदारी घेणे, हे पाळावे. आजाराची भीती वाटत असेल तर असे संबंध ठेऊ नये, असे सांगितले.
स्त्री-पुरुषांच्या कोणत्या लैंगिक समस्यांवर लगेच तपासणी करावी लागते? या विषयी बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, खरं तर बऱ्याच समस्येवर लगेच विविध प्रकारच्या तपासण्या कराव्या लागत नाहीत. काय होत आहे हे जेव्हा पेशंट सांगतो, तेव्हा त्याचे मूळ कारण शोधून काढताना केस टेकिंग महत्त्वाचे असते. त्यावरून समस्या मानसिक की शारीरिक हे समजते. ताठरता कमी आली असेल तर लगेच प्रत्येक वेळा रक्त तपासणी, सोनोग्राफी याची गरज नसते. तसेच स्त्रीची इच्छा कमी, वेदनायुक्त संभोग होत असेल तर संप्रेरके, रक्त तपासणीची गरज नसते. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, व्यसनाधीन अशा केसेसमध्ये तपासणी करावी लागते, तसेच अपघातात जननेंद्रियांना इजा झाली असेल तर सर्जन, मूत्ररोग तज्ञ हे उपचार करतात. यात काही वेळा स्कॅनिंग करावे लागते. निव्वळ लैंगिक अवयवाबद्दल शंका, गैरसमज असेल तर शारीरिक तपासणी आवश्यक असते.
निव्वळ लिंगावर घाण असल्यानं पुरुषाला लैंगिक समस्या येऊ शकते का? या विषयी डॉ. पाटील पुढे सांगतात की, शिश्नमल साठल्याने लिंगाला खाज सुटत असेल तर ताठरता आणि वीर्यपतन यात अडचण येते. फिमोसिस असेल तर शिश्नमल साफ करता येत नाही किंवा ते कसे साफ करायचे हे माहीत नसते. त्यामुळे ताठरता आली की लिंग दुखू लागते, लिंग दुखले की पुन्हा ताठरता कमी येते. पुन्हा पुन्हा असे घडले की पुरुष सेक्स करण्याचे टाळतो. वीर्यपतन लवकर होते. डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य उपचार करता येते. पण लिंग नेहमी स्वच्छ ठेवणेही गरजेचे आहे.