पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रत्येक सजीव हा प्रजननाद्वारे अस्तित्वात आलेला असतो. मानवामध्ये प्रजनन लैंगिक पद्धतीने घडून येते. स्त्री-पुरुषांमधील शारीरिक संबंधाच्या सुखाच्या उच्च बिंदूला पुरुष लिंगामधून बाहेर उडणाऱ्या चिकट द्रव पदार्थाला वीर्य असे म्हणतात. आता कांदा, लसूण खाल्यास वीर्य वाढतं का? असा प्रश्न अनेकांना सतावत असतो, याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. राहुल पाटील सांगतात की, वयाच्या १३व्या वर्षापासून मुलाच्या वृषण ग्रंथीमध्ये सतत शुक्राणुची निर्मिती होत असते. ती काही रोगात कमी येते किंवा संपते. वीर्यनाश झाला की ताकद कमी येते असा गैरसमज असतो. तामस आहार घेतला की सेक्स वाढतो असे म्हंटले जाते. त्या आहारात कांदा, लसूण, मांसाहारचा समावेश आहे. म्हणून कांदा, लसूण खाल्ला की वीर्य ताकद वाढते असा समज आहे. विचार करण्यासारखं आहे की भारतात काही जाती-धर्मातील लोक कांदा लसूण खात नाहीत. त्यांच्यामध्ये वीर्यदोष जास्त आहेत का? त्यांचे कामजीवन वाईट आहे का?; खरंतर असं काही दिसून येत नाही.
डॉ. पाटील सांगतात की, वीर्यदोष निर्माण होण्यामागील कारणांमध्ये हायड्रोसिल, वेरीकोसिल, जन्मजात विकृती, सम्प्रेरकमधील कमी अधिक पातळी आणि व्यसनाधीनता यांचा समावेश आहे. त्याच बरोबर अति गरम हवामानात सतत काम करणे व राहणे ही कारणं आहेत. प्रत्येक वेळा वीर्यपतन होते त्यात प्रति मिली २०-१२० मिलियन (दशलक्ष) शुक्राणु असतात. त्यातील ५५ टक्के पेक्षा जास्त शुक्राणू चांगल्या प्रतीचे असावे लागतात. विटामिन सी, विटामिन ई, झिंक प्रोटीन यांची शुक्राणुला गरज असते. पुरेसे शाकाहार, मांसाहार, निरोगी शरीर आणि मन, नियमित व्यायाम हे शुक्राणुसाठी पुष्कळ आहे.
डॉ. पाटील सांगतात की, स्त्री-पुरुषांमधील शारीरिक संबंधाच्या सुखाच्या उच्च बिंदूला पुरुष लिंगामधून बाहेर उडणाऱ्या चिकट द्रव पदार्थाला वीर्य असे म्हणतात. यामध्ये गर्भधारणेला आवश्यक असणारी पुरुषबीजे म्हणजेच शुक्राणू असतात. स्त्रीच्या योनीमध्ये वीर्य सोडल्यानंतर त्यातील शुक्रजंतू गर्भाशयातून गर्भनलिकेत प्रवेश करतात. त्याच वेळी स्त्रीबीज तयार झाले असेल तर एका शुक्रजंतूचा स्त्रीबीजाशी संयोग होऊन गर्भधारणा होऊ शकते. वीर्यामधील शुक्रजंतूंची संख्या एका घन सेंटीमीटरमध्ये चार कोटी ते दहा कोटी इतकी प्रचंड असते. एका संबंधाच्या वेळी वीर्यपतनातून सुमारे तीन ते पाच घन सेंटीमीटर (साधारण एक चमचा) वीर्य बाहेर पडते. म्हणजेच दर वेळी एकूण बारा ते वीस कोटी इतके शुक्रजंतू स्त्रीच्या योनीमध्ये सोडले जातात. यातील फक्त एका शुक्राणूचा उपयोग गर्भधारणेसाठी होतो. उरलेले सर्व शुक्राणू थोड्या तासांतच मृत पावतात.