

वैद्य विजय कुलकर्णी
आपला एकूण दिनक्रम व्यवसायाला, वयाला अनुसरून ठरवावा लागतो, हे जरी खरे असले, तरीही काही गोष्टी त्यामध्ये अत्यावश्यक असतात. व्यवसायानुसार त्यामध्ये आवश्यक तो फेरबदल करता येतो.
सतत बैठे काम करावे लागणार्या व्यक्तींची खूप मोठी संख्या आहे. बसून काम करणार्या या मंडळींमध्ये शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, बँकांमधील, आयुर्विमा कार्यालयातील तसेच शाळा-महाविद्यालये, अन्य कार्यालये येथे काम करणारे कार्यालयीन कर्मचारी अशा फार मोठ्या संख्येत व्यक्ती बैठे काम करतात, असे लक्षात येते. दिवसातले साधारण सात-आठ तास म्हणजेच एकूण निम्मा भाग बसण्यात जातो. (येथे 24 तासांपैकी 8 तास झोप आणि एकूण 16 तास प्रत्यक्ष कार्यकारी दिनक्रम गृहीत धरला आहे.) असे असल्यामुळे शरीराची एकूण आरोग्यस्थिती चांगली ठेवण्यासाठी या मंडळींनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
बैठ्या व्यवसायात अनेकदा मन अस्थिर बनण्याचा संभव असतो. खरे तर शरीराला थोडी हालचाल आणि मनाला स्थैर्य नेहमी अपेक्षित असते. बैठ्या व्यवसायात मात्र याच्या नेमके उलट होत असल्याने शरीराप्रमाणेच मनाच्याही आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता असते. सतत बैठे व्यवसाय असल्याने निरुत्साह निर्माण होणे कधी कधी शक्य असते. त्यासाठीही सकाळी व्यायामाबरोबर योगासनांचा अवलंब आपण केला पाहिजे.
बसण्याची स्थिती : बैठे काम करताना आपण खुर्चीवर बसून काम करीत असल्यास आपल्या बसण्याची स्थितीही आरोग्यकारक असली पाहिजे. खुर्चीच्या पाठीचा कोन कंबरदुखी निर्माण करू शकतो. हे लक्षात घेऊन त्यासंबंधी योग्य ती काळजी घ्यावी. सतत लिहावे लागत असले, तर पाठ, मान भरून आल्यासारखी वाटतात, हात जड पडू शकतो. मणक्याचे विकार निर्माण होऊ नये म्हणून रोज अंघोळीच्या आधी अभ्यंग करणे क्रमप्राप्त ठरते. टेबलावर सतत काम करणार्या व्यक्तींनी टेबलाची उंची योग्य आहे ना, हेही बघावे. खुर्चीवर बसल्यावर पाय लोंबकळत राहणार नाहीत, याचीही योग्य दक्षता घ्यावी नाही तर पायदुखीचा त्रास निर्माण होऊ शकतो. पायाच्या रक्तभिसरनावरही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. बैठे काम करणार्यांच्या पोटात चरबी साठू नये म्हणून आहार योग्य तो घ्यावा लागतो. योगासनात पश्चिमोत्तानासनासारखे आसन यासाठी उपयुक्त ठरते.
बैठेपणाचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. आपण खाल्लेले अन्न नीट पचविण्यासाठी चाललेली शरीराची स्वाभाविक प्रक्रिया मंद होते. त्यामुळे अजीर्ण, आम्लपित्त, गॅसेसचा त्रास, मलावरोध असे त्रास होण्याची शक्यता बळावते. वाजवीपेक्षा जास्त वजन वाढून स्थूलता निर्माण होणे यामुळे संभवते. अशा शक्यता गृहीत धरून बैठे व्यवसाय असणार्या लोकांनी सकाळी फिरण्याचा तसेच सूर्यनमस्काराचा व्यायाम करायला हवा. हल्ली मधुमेहासारखे विकारही व्यायाम नसल्याने तसेच अधिक बैठे काम करणार्यांमध्ये वाढत चाललेले आहेत.